आऊटिंग
आऊटिंग
त्या मातीचे सौंदर्य दिसतेय मला.
नदीच्या खळखळण्यात गीत भासतय मला.
बैलाच्या गळयातल्या घंटीचा आवाज भूल घालतो.
आणि वावरात हसत उभं बुजगावणं, ऐका मला काय सांगतो.
लहरणाऱ्या शेताचं ऐश्वर्य, शेतकऱ्याच्या हातची कला.
काळजाच्या पिलांसाठी भाकर, उरी त्याचा जीव पेटला.
आत्मघात करतात शेतकरी, गळ्या भोवती जंजीर.
अन्नाच्या दाण्या दाण्यात भासतात त्या मृत चेहऱ्यांची मंजीर.
पैलतीरी मी उभा जरी, सौंदर्य पारखत आहे त्या दाण्यांचे.
बळीराजा झुंजतो आहे, दाह भोवती अंगारांचे.
त्याच्या माथ्यावरी वाहणाऱ्या घामाचा, तू त्याचा ऋणी.
पावसाच्या धारांना धान्यरुप देणारा, ऐक, तो तुझा धनी.
बुजगावण्याचे बोल संपले, गायब झाल्यात सौंदर्याच्या लेणी.
मी भानावर आलो, शहरी परतलो, जड पावलांनी.
