आठवतो भीम माझा
आठवतो भीम माझा
आठवतो भीम माझा
इतिहास घडवताना
मृत मानवी मनांचा
स्वाभिमान जागवताना ||0||
गर्वाचा अंश नाही
आईची प्रेमळ माया
रणरणत्या वाळवंटी
दलितांना झाला छाया
सम्राटापरी लढण्याची
सवय जडवताना ||1||
द्या बंधने झुगारून
अमानुष दानवतेचे
मनुवादी यंत्रणेला
तडे द्या मानवतेचे
चातुर्वर्णी रचना
पायदळी तुडवताना ||2||
गाळीत आसवे का
जीवन हे विष झाले
भीमाच्या लेखणीला
पुरेसे निमिष झाले
धाय मोकलून
जातीयवाद्यांना रडवताना ||3||
किती धूळ साचलेली
मेंदूवर शोषितांच्या
हातीही काही नव्हते
देवदूत प्रेषितांच्या
ती धूळ लाचारीची
ज्ञानाने उडवताना ||4||
शतकांची ही लाचारी
संपवण्या सिद्ध झाला
उद्धारण्या या देशा
तो वचनबद्ध झाला
मन जखमी अंत्यजांचे
मायेने मढवताना ||5||
