Prasad Kulkarni

Others

4  

Prasad Kulkarni

Others

आठवणीतली दिवाळी

आठवणीतली दिवाळी

1 min
331


नवरात्र संपून दसरा उजाडायचा

आणि वेध लागायचे दिवाळीचे

मधला काळ पंधरा दिवसांचा

पटकन संपून जावा वाटायचे

चिवडा ,लाडू , चकली , शेव

सारेच तेव्हा घरी बनायचे

विकतच्या घरगुती फराळाचे पेव

तेव्हा बाकी होते फुटायचे

अप्रूप होतं नवीन कपड्यांचं

नवीन शर्ट आणि नवीन पॅंटच

आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं

तुमच्यासाठी काय घेतलं विचारायचं -

आनंदात नेहमीच राहून जायचं

फटाक्यांची भावंडात विभागणी व्हायची

मिळाले ना सारखे नजर असायची

हवेत मस्त थंडी फुलायची

भल्या पहाटे जाग फटाक्यांनी यायची

गोधडीत गुडूप्प झोपावं वाटायचं

कशाला इतक्या लवकर उठायचं

अचानक यायचा उटण्याचा सुवास

बंबात टाकलेल्या जळणाचा वास

डोळ्यांवरून झोप अलवार उडायची

झिरमिळ्या कंदीलाकडे सहज नजर जायची

सुंदर रांगोळी असायची पाटाभोवती

पाटासमोर तेल उटण्याची वाटी

आईचा हात उटण्याचा घमघमाट

मोरीत जाऊन उभं राहायचं

कडकडीत पाणी अंगावर घ्यायचं

थंडी पळून कुठच्या कुठे जायची

नजर नव्या कापड्यांकडे असायची

गोविंदा म्हणून कारीट फोडायचं

कडुढाण बोट जिभेला लावायचं

धूम पळायचं फटाके वाजवायला

अनार ,लवंगी , भुईचक्र लावायला

भूक वाढलेली असायची पोटात

फराळाची चित्र तरळायची डोळ्यात

पाटावर रांगेत सारी बसायची

ओवाळणी अन्नपूर्णेच्या हातून व्हायची

पोहे फराळ हाणायचे मस्त

तुडुंब तृप्तीने पोट व्हायचे सुस्त

सारेच एकत्र देवळात जायचे

जिथे पहावं तिथे प्रसन्न वाटायचे

शेवटचा दिवस भाऊबीज यायची

दिवाळी संपल्याची जाणीव व्हायची

आणि आठवायचा अभ्यास सुट्टीतला

दिवाळीच्या आनंदात विस्मृतीत गेलेला

आता हे काहीच होत नाही

पहाटेचं अभ्यंगस्नान दिसतच नाही

फराळ कंदील सारेच विकतचे

साच्यातून काढलेले एकाच चवीचे

व्हॉट्सअँप वर हॅपी दिवाळी म्हणतात

मेसेज फॉरवर्ड करत रहातात

असो ! जीवनाच्या वाटेवर चालायला हवे

बदलत्या वातावरणाबरोबर बदलायला हवे

तरी त्या दिवाळीची आठवण होते अनावर

का हो काहीच उपाय नाही का यावर.


Rate this content
Log in