STORYMIRROR

सानिका कदम

Others

4  

सानिका कदम

Others

आठवणींचा पाऊस......

आठवणींचा पाऊस......

1 min
415

आठवणींच्या हिंदोळ्यावर

मन माझे झुलत राहते,

स्वप्नांमध्ये विहार करुनी

जागेपणीचे स्वप्न पाहते.


काळ थांबला ना जरी

सूर नाही झाले जुने,

आजही मी गुणगुणते

त्याच्या ओठांतले गाणे.


चिंब भिजून जाई मन माझे

तेव्हा ओलेत्या धारांनी,

आज ही ते गोड क्षण नाचती 

थेंब होऊन अंगणी.


आठवणींचा पाऊस हा

बरसत राही क्षणोक्षणी,

डोळ्यांतून दिसण्याआधी

वाहे हृदयाच्या कप्प्यातुनी.


एके काळी त्या पावसांत

मन माझं हिरवळलं होतं,

चाफ्याच्या सुगंधात तेव्हा

प्रेम नव्याने दरवळ होत.


आठवणींच्या त्या रानांत

माझा नेहमीचं रुसवा असायचा,

त्याच्या झालेल्या मोहक स्पर्शाने

राग ही देहावरुनी घसरायचा.


आज ही ओठातल्या ओठांमध्ये

वाजते त्याची शीळ,

आठवांच्या सांजवेळी ऐकताना

बसे हृदयास माझ्या पीळ.


पावसाचे तुषार छेडती

मम ह्रदयाचा तारा,

मनमोहक वाहे स्पर्शूनी

आठवांचा तो गार वारा.


कितीदा भिजून गेले

ह्या आठवणींच्या पावसांत

अश्रू ही मग नाही थांबले

ओघळणाऱ्या डोळयांत.


ओथंबल्या घनाने

भिजवली भूमी सारी,

प्राजक्ताचा सडा पडे

आज ही माझ्या दारी.


आठवांच्या पावसाने 

ओंजळ माझी भरावी,

त्याने एकदाच वाचावी

अशी कविता मी स्फुरावी.



Rate this content
Log in