STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

आठवणी

आठवणी

1 min
292

आयुष्य म्हणजे आठवणींचा आंबट-गोड मुरंबा आहे |

आठवणींची सुंदर संदूक, आयुष्य एक अचंबा आहे ||


वर्षामागून वर्षे सरती, आठवणी परी कधी ना विरती |

मनातल्या त्या तळघरामध्ये, आठवणींना कविता स्फुरती ||


कधी आठवे रम्य बालपण, कधी षोडस चंचल यौवन |

नको कितीही म्हटले तरी ते, आठवते प्रौढत्वाशी भांडण ||


कधी स्मरते गावातील माती, कधी शाळेतील प्रेमळ नाती |

कॉलेजातील दिवस आठवून, कधी तनूवर रोमांचही फुलती ||


आठवतो तो पहिला स्पर्श, नववधूचा निखळ हर्ष |

बाळाची चाहूल लागता, आनंदातच सरले वर्ष ||


आज परी त्या मधुर आठवणी, मनात गाती फेर धरुनी |

आयुष्याची रांगोळी रेखुनी, रंग भरती माझ्या जीवनी ||


काही रसाळ, काही रुचकर; काही मधाळ, मधुर निरंतर |

गोडी वाढते मुरंब्याची, फळांमध्ये जशी तद्रुप साखर ||


आठवणींच्या मुरंब्याने काठोकाठ भरली ही बरणी |

कधी न जावा तडा तिजला, अशी घडो देवाची करणी ||



Rate this content
Log in