आत्मनिर्भर
आत्मनिर्भर


एकदा नर म्हणे नारायणा
सांगा कोणत्या उपाये
नांदेल सुखे मम ललना?
विटलो ऐकूनि रडगाणी
होईल केव्हा समाधानी
माझी ही राणी?
दिली रेशमी वसने
नाना रत्ने आभूषणे
तरी ही ऐकवी दुषणे!
व्रत तरी सांगा
मी करु कोणते?
म्हणे तयासी हरी
आहे समस्या ही खरी
अरे कोणतीच नारी
नसते सुखी आपुल्या घरी!
काय मी सांगू वत्सा
आहे माझीही तीच व्यथा
ऐकिलीस ना लक्ष्मीची कथा
जाहलो पद्मावती कारणे
मीच रे कर्जबाजारी!
प्रेमे येती भक्तगण द्वारी
देती गुप्तदान हुंडीत तरी
होईना माझी सुटवण खरी
>
चालले आहे असे युगानुयुगे!
मान यातच समाधान
दिले आहेत तुज कान दोन
एका कानी ऐकोनि
सोडूनि द्यावे दुसरे कानी!
पाहा पुसोनि शिवशंकरा
आहे तो तरी का बरा
का बरे दक्षाच्या यज्ञी
घेतली उडी उमेने?
आणखी तशातच
मिळाले आहे वरदान
बऱ्याच सावित्रींना
साता जन्मांचे यमाकडून!
असावे आपुले आपण
सदैव आत्मनिर्भर
नसावे अवलंबून कोणावर
देईल तुज शिकवण
कलियुगी एक मान्यवर
हा हा म्हणता पसरला
मग विषाणू जगभर
नर झाला आत्मनिर्भर
आणि घडे चमत्कार
सुखावल्या की ललना!