STORYMIRROR

Namarata Pawaskar

Others

4  

Namarata Pawaskar

Others

आसरा (कविता)

आसरा (कविता)

1 min
317

न फुलणाऱ्या फुलांचा मोसम...

कळ्या बनून माझ्या दारात आला...

अन् त्याला पाहून माझ्या दारातली...

फुललेली फुलंही सुकून गेली...

वाटलं! हा कशाला आला?...

पण, त्याच्याकडे पाहिलं तर तोही उदास दिसला...

खिन्नपणे म्हणाला मला, " सारीच नाकारतात...

सारीच धुत्कारतात मला...

आसरा मागायला आलोय तुझ्याकडे...

देशील का थोडासा निवारा मला?"...

त्याचं ते बोलणं ऐकलं न् आत कुठेतरी गदगदलं...

वाटलं, असंही कधी का होतं?...

फुलणाऱ्या फुलांचं म्हणताम्हणता निर्माल्य होऊन जातं!...

ना उरतात मातीचे बंध...

ना उरतात स्पर्शांचे संग...

पाहता पाहता कसे, उडून जातात त्यांचे रंग?...

मी त्याला आसरा देऊ म्हटलं तर,

माझीच बाग सुकलेली...

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोही हसत निघाला...

म्हणाला, ' हे असलंच आमचं जिणं...

बेरीज कसली आलीय आता...

सारं आयुष्यंच झालंय उणं...

येईन कधीतरी परत असाच...

तुला भेटायला आवडेल मला...

तुझ्यासारख्यांची साथसोबत...

करायला आवडेल मला!'...

क्षणातच दिसेनासा झाला...

आता तो जाईल कुठे अन् राहील कसा?...

देवा! म्हटलं ही कशी करणी केलीस?...

त्या बिचाऱ्याला पसाभरसुद्धा धरणी नाही दिलीस?...



                


Rate this content
Log in