आर्त हाक लेखणीची
आर्त हाक लेखणीची
ती रात्र चांदण्याची
कोमल कौमुदी शरदाची
केले सायास कितीसे परि
निद्रा हरवली सुखाची
आस नव्हती कुणाची
नसे सावली दुःखाची
उमगेना त्या क्षणी
ही व्याकुळता कशाची
धडधड वाढली हृदयाची
धुंडाळली वाट मनाची
उठले तरंग खोल तळाशी
खूण असे ती आविष्काराची
घेतली बैठक भावविश्वाची
असाधारण उत्कट ऊर्जेची
झाली वाट हळुवार मोकळी
अंतरातल्या लेखणीची
झरझर लाट शब्दांची
येतसे कोठून भरतीची
भावना शब्द अनंतरमनाने
साद घातली विचारांची
उसळणाऱ्या भाव शब्दांची
रेखाटली नक्षी अक्षरांची
प्रसन्न झाल्या चित्तवृत्ती
अलगद उतरवून साची
