आले आभाळ भरून
आले आभाळ भरून
1 min
647
आले आभाळ भरून
दाही दिशा काळोखल्या
पडलेल्या भेगातून
बाई धरणी हासल्या
नभ आनंदून गेला
सरीवरी सरी धाडे
सोबतीने सईनाई
विजबाई कडकड़े
धरतीच्या अंगावरी
ऊन पिवळे पडले
वाटे नव्या नवरीचे
अंग हळद माखले
भेटे तिचा भरतार
कंठ मातीला फुटला
फुटे अत्तराची कुपी
गंध मोकळा सुटला
भुमी ओली चिंब झाली
नव्या भेटीने लाजली
शालु नेसून हिरवा
गोड गुलाबी हासली
पिऊनिया रानवारा
सांड चौखुर उधळे
त्याला बांधून ठेवाया
दावा कमजोर पडे
