आजचा विषय- सामाजिक विषय
आजचा विषय- सामाजिक विषय
जाऊया गावाकडे एकदा
पाहू गावाकडली ही जत्रा
हौशे गवशे नवशे सारे येती
होती गावात भानगडी सतरा
गाव येरळेच्याच तीरावर
नाथबाबाचे आहे देऊळ
त्याला हे मोठे प्रवेशद्वार
वाटतंय जणू एक राऊळ
मुंबई-पुण्याचे चाकरमानी
गोळा होती गावच्या जत्रंला
लागतात नाना दुकानं तिथं
सजून येती बायाबापं यात्रंला
कुस्त्या तमाशाचे लागे फड
छंदीफंदी जमतात गावगुंड
बक्षिसांची होतीया खैरात
आजूबाजूच्या पोरांची झुंड
पालखी फिरतीया गावातनं
गुलालखोबरे टाकती उधळून
माहेरवाशिणी फेडती नवसं
नैवेद्य पुरणपोळी ओवाळून
लागती दुकानंच सत्राशेसाठ
शेव फरसाण कुरमूरे बत्ताशे
पोरीबाळी होती खरेदीत दंग
पोरं वाजवती पिपाणी ताशे
दोन दिवसांची जंगी ही जत्रा
चांगभलंचा देती सगळे नारे
पुढल्यावर्षीही येऊच फिरून
आठवण घेऊन परतती सारे
