आई
आई

आई जन्मभर कष्टच करत राहिलीस ना तु ,
ऊन्हाच्या झळा सोसत , पदर मायेचा धरीला ..॥
राबराब राबलीस माझ्यासाठी तु आयुष्यभर ,
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
खरंच तुझ्या प्रेमात इतक सामर्थ्य होत ना आई ,
दुःखाचा डोंगरही तुझ्या चरणी नतमस्तक झाला ...
एकटीच संघर्ष करत राहिलीस माझी मायमाऊली
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
विधाता बनुन माझ्या आयुष्याच्या ताम्रपटलावर
तु सुवर्ण अक्षर गिरवलीत , जन्म तुझा वाहीला , ॥
स्वत: भुकेले राहुन लेकरास घास तु भरविला
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
रक्ताच पाणी अन् रात्रीचाही दिवस करायचीस ,
पदराआड लपवत मजला प्रेमपान्हा पाजीला ॥
आयुष्याची बाराखडी , पापपुण्याचा धडा गिरवला
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
जन्मांतरीचे ॠण तुझे गं , मी उतराई होवू कसा ,
जन्म देवूनी उपकार केला , अनमोल जन्म दिला .
विसावतो पदराआड तुझ्या , चेहर्याचा भाव वाचला
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
तुझ्या कपाळी कुंकू शोभते , गळ्यात हे मंगळसुत्र
शंभर ठिगळे जोडले , पण लुगड्याचा काट फाटला
तुझीच महती गाता गाता माये ,कंठ माझा दाटला
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
कसा असतो भगवंत मी तर कधीच नाही जाणला
तुच विठु माऊली माझी मी तुलाच देव मानला॥
दुःख लपवून मनात तु नेहमी मंजुळ स्वर गायीला
तुझ्या पायाच्या भेगातच आज मी देव पाहीला .॥
बनुनी माझी आई उभी असे तु ठायीठायी ,
आज तुझ्या चरणी मी माझा पंचप्राण वाहीला ..
हे आई जन्मोजन्मी ॠणी असेल तुझा मी
तुझ्या पायाच्या भेगात आज मी देव पाहीला .॥