Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
सायकल
सायकल
★★★★★

© Alka Jatkar

Others

3 Minutes   1.3K    33


Content Ranking

मी लहान असताना दरवर्षी माझी आई उन्हाळ्याची सुट्टी लागली कि मला घेऊन मावशीकडे जात असे. मलाही फार आवडायचं तिथे जायला. एकतर मावशी खूप लाड करायची आणि खेळायला भरपूर मुलेही होती.

असेच आम्ही एकदा मावशीकडे गेलो असताना एक दिवस एक मुलगा त्याची नवीकोरी तीन चाकी सायकल घेऊन आला खेळायला. मी तीन चार वर्षीचीच होते... धावत गेले त्याच्याकडे आणि म्हणाले "अरे, कसली मस्त आहे सायकल तुझी. मला दे ना थोडी चालवायला." तो मुलगा एकदम मला झिडकारत म्हणाला " नाही. माझ्या सायकलला मी मुळीच हात लावू देणार नाही कोणाला."

झाले. मला रडू फुटले. मी रडतच आईजवळ गेले आणि म्हणाले "आपण घरी गेलो कि मला पण अशीच सायकल घे." आई पुटपुटत म्हणाली "बघू" मी आवाज वाढवत म्हंटल "बघू नाही. घ्यायचीच ."

आईला हो म्हणवेना. मी घरी गेल्यावर फारच हट्ट धरला तर .... ती काळजीत पडली. आमची ऐपत नव्हती नवीन सायकल घेण्याची.

जवळच हुस्नप्पा अंगण झाडत होता... "हुस्नप्पा" आमचा दोस्त. वर कामाला होता मावशीकडे. तीस पस्तीस वर्षाचा होता पण आमच्याशी खेळायचा मस्त. आम्हाला बागेत फिरवूनही आणायचा.

हुस्नप्पाच्या लक्षात आली परिस्थिती. तो मला जवळ घेत म्हणाला "मी देतो ना तुला नवीन सायकल बनवून. आत्ता आपण मापं घेऊ. तू परत पुढच्या वर्षी येशील तेव्हा तुझ्या मापाची सायकल तयार."

मी आनंदाने ओरडले "खरंच ?" त्याने आश्वासन दिले "हो अगदी खरं."

"मलाही नवीन सायकल मिळणार. तुझी नकोच जा." मी त्या मुलाला फणकारत म्हंटल.

माझे ते वर्ष अगदी आनंदात गेले. साऱ्या मैत्रिणींनाही सांगून झाले मला नवी सायकल मिळणार म्हणून. त्यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मी अगदी आतुरतेने वाट पाहत होते.

आम्ही मावशीकडे पोहोचताच मावशीने प्रेमाने स्वागत केले, पण मी शोधत होते हुस्नप्पाला. नवीन सायकल देणार होता ना तो मला.

लांबून भाजीच्या पिशव्या घेऊन येताना दिसला हुस्नप्पा. मी धावतच त्याच्याकडे गेले ."माझी सायकल?" मी उत्सुकतेने विचारले. हुस्नप्पा म्हणाला "अग, बनवायला घेतली मी खरी सायकल पण मला समजेचना तुला लाल रंग आवडेल का निळा ?" मी क्षणात उत्तरले "लाल". तो म्हणाला "होका ? मग आता लाल रंगाची सायकल बनवीन तुझ्यासाठी. घंटीही लावतो त्याला मस्त."

"चालेल " मी म्हणाले. वर्षभर मग मला घंटीवाल्या लाल सायकलची स्वप्नं पडत राहिली.

पुढच्यावर्षी मी परत त्याच उत्सुकतेने मावशीकडे गेले. मला पाहताच हुस्नप्पा म्हणाला "अग, किती उंच झालीस तू... मी केलेली सायकल पुरणार नाही तुला. आता परत माप घेतो आणि चांगली मोठी बनवतो सायकल." मी थोडीशी हिरमुसली होऊन बरं म्हणाले. विचार केला.. खरंच ना ...मोठीच हवी सायकल.

पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे पोहोचताच हुस्नप्पा चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत म्हणाला "अरे बापरे... किती मोठी झाली माझी बाय... आता तुला कसली तीन चाकी सायकल चालते ? मला दोन चाकीच बनवली पाहिजे तुझ्यासाठी."

मला आठवले... खरेच की... परवाच माझ्या एका मैत्रिणीने दोन चाकी सायकल घेतली होती. "हो, दोन चाकीच बनव. मी मोठी झालेय आता" मी हुस्नप्पाच्या बोलण्याला होकार देत म्हंटल.

परत मापे घेऊन झाली. पुढची तीन चार वर्ष तो अशाच काही सबबी सांगत राहिला.

मी दहा अकरा वर्षाची झाले आणि माझ्या लक्षात आले... हुस्नप्पा फसवतोय आपल्याला. तो बिचारा कशी देणार होता मला सायकल ? त्याची परिस्थिती तर आमच्याहूनही हलाखीची होती.

सायकल मिळाली नाही खरी... पण खरं सांगू... हुस्नप्पाने नवीन सायकलचे स्वप्न दाखवून माझे सारे बालपण आनंदी आणि सुखी करून टाकले.

सायकल बालपण आनंद

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..