आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याच्या संध्याकाळी
मागे वळून बघतांना
अश्रू येती माझे डोळा
आईकडे पाहतांना!!१!!
एकेकाळी गरिबीची
घोर रात्रं दिसतसे
अंधारात झोपतांना
पोट खपाटीला असे!!२!!
विचारांची खलबल
मनामध्ये चालतंसे
आई कडे बघतांना
डोळे भिर भिरतसे!!३!!
सूर्य उगवण्या आधी
आई मात्र उठतसे
कामा वरून येतांना
डोई भारा दिसतसे!!४!!
कमाईच्या पैशाने त्या
बाळा दूध आणतसे
आई तूं जेवली कां गं
विचारता बोल नसे!!५!!
आणलेल्या सिद्यातून
जेवू घाली परिवारा
पोट मात्र खपाटीला
डोळ्या मधी नित्य धारा!!६!!
कसे गेले दिस सारे
कळलेची मज नाही
बाबा स्वर्गी जातांनाही
म्हणे बाळा करा काही!!७!!
संतदासा सांगतसे
होता तोची रे आसरा
डोळ्यामधी अश्रूधारा
माझ्या चिमणी पाखरां!!८!!
