अभंग मायबोली
अभंग मायबोली
माय मराठीची । गोडी हृदयात ।
शब्द कोंदणात । रेखीयले ।।१।।
' म 'पासून माया । ममता ममत्व ।
तिचे खरे सत्व । ठायीठायी ।।२।।
मराठी महान । रांगड्या मातीची ।
खुल्या ती मनाची । सर्वांसाठी ।।३।।
प्रसन्न पहाट । तेवे दीपमाळ ।
शब्दांचे श्रीफळ ।अर्पूनिया ।।४।।
लोभस मधाळ । मराठीचा आरसा ।
समृद्ध वारसा । जगजेठी ।।५।।
नऊवारी साडी । मराठीचा बाणा ।
लडिवाळ खुणा । सालंकृत ।।६।।
जोजवी अंगाई । माझी मायबोली ।
ती पुरणपोळी । मऊसूत ।।७।।
पहिला प्रयत्न । साधा झोकदार ।
भाषा कसदार । लेखणीत ।।८।।
त्रिभुवनी कीर्ती । शब्दरत्न खाण ।
जन्मदिनी शान । वाढतसे ।।९।।