वसंतऋतूतील निसर्ग बहार
वसंतऋतूतील निसर्ग बहार


पाच मार्चची प्रसन्न सकाळ. शिशिरातली थंडगार, आल्हाददायक, बोचरी हवा. आम्ही तिघी निघालो निनाई मंदिराच्या दिशेने, माहेरच्या शिवारातला वसंत ऋतूत बहरलेला निसर्ग सोहळा अनुभवायला.
अतिशय प्रसन्न वातावरण होते. सकाळच्या कोवळ्या, सोनेरी रविकिरणांनी सारे शिवार न्हाउन निघाले होते. गवतावर, ऊसांच्या पानापानांवर टपोरे दवबिंदू चमचमणाऱ्या मोत्यांप्रमाणे भासत होते. जागोजागी रायवळ आंबे मोहरून गेले होते. त्यांचा सुवास अहाहा! त्या सुवासाने मंत्रमुग्ध झाले. तिथे पुढच्याच वळणावर विशालकाय पिंपळ वृक्षाने आमचे जणू स्वागत केले. उंच, रूंद, विस्तीर्ण असा तो उंच दगडी तोडींनी बनलेल्या पारावर वर्षानुवर्षे उभा आहे, तो एखाद्या अनुभवी वयोवृद्ध आजोबांप्रमाणे मला वाटला. त्याच्या आजुबाजुचा शिवार हिरव्यागार पिकांनी बहरुन वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर डोलत होते.
सभोवतालच्या रानातील झाडे-झुडपे, लता-वेली नानाविध फुलांनी बहरुन गेल्या होत्या. चारोळी, वासनवेली भरगच्च घोसांनी लगडलेल्या, लालबुंद रानचेरी जाळींची शोभा वाढवत होत्या.
करंज, हिरव्यागार अडूळशाची पांढरी शुभ्र फुले नजरेस पडली अन त्यातला मकरंद चाखायचा मोह आवरता आला नाही. समोरच बाभळीच्या झाडावर चढलेला वल्लरीचा वेल पांढऱ्या शुभ्र फुलांनी लगडलेली वल्लरीची फुले, झाडावरून लोंबकळत आपल्या सौंदर्यानं लक्ष वेधून घेत होती. कुसरीचा मंद सुवास आसमंतात भरुन राहिला होता. मधूनच पानापानातून रविकिरणे डोकावत होती. माॅर्निंग ग्लोरी निळ्या रंगाची पखरण करत फुलली होती.
सारे शिवार लाल, गुलाबी, केशरी फुलांनी बहरुन गेले होते. पुढच्याच वळणावर मखमली, गुलाबी फुलांचा नखशिखांत संभार ल्यायलेल्या काटेसावरी अनं तो नजारा पाहुन भान हरपुन गेले.
'गळून पडता पानांचा बहर,
सावरीला येते फुलायची लहर'
काटेसावरीच्या झाडावर फुलातील मधुरस चाखायला अनेक पक्ष्यांचे जणू संमेलन भरले होते. साळुंकी, बुलबुल, कोतवाल, हळद्या अन शिंजीर असे एक ना दोन अनेक पक्ष्यांची लगबग सुरू होती. फुलातील मधुरस चाखायला. जणू त्यांचं 'ज्युस सेंटर' होतं ते. फुलपाखरे अन भुंग्यांनीही हजेरी लावली होती फुलांभोवती गुंजारव करायला. काही पक्षी फुलातील मधुरस चाखण्यात एवढे दंग होते की, डोकं वर काढायलाही तयार नव्हते. ही मनोहारी दृश्य कॅमेरात माझी बहिण शितल कैद करत होती.
सर्वदुर शिवारात, समोरील सह्याद्रीच्या रांगात, गुलाबी, लाल अन केशरी रंगांची उधळण सुरू होती. काटेसावर, पळस, पांगेरा फुलला होता. साऱ्या शिवाराचा, अन सह्याद्रीच्या पर्वत रांगांचा कोपरा न कोपरा वळणा-वळणावर सुंदर नयनमनोहारी रंगांची उधळण करत वसंतोत्सव साजरा करतोय.
सृष्टीतील झाडाझुडपांचा, लतावेलींचा रंगोत्सव पाहायला नक्की घराबाहेर पडून शिवारात आणि रानावनात भटकंती करुन घेतलेला आनंद काही औरच असतो.
डोळ्याचं पारणं फेडणारा वसंत ऋतुतील निसर्ग बहार अनुभवायला निसर्गातच जायला हवं. महाशिवरात्रीला काटेसावर (शाल्मली), पळस अन पांगेरा पूर्ण नखशिखांत फुलतात, हा पूर्ण बहर पंधरा दिवस झाडावर असतो अन हे अनुभवणे म्हणजे नेत्रसुखद, अपार आनंददायी, हा शिशिरातला सोहळा मन प्रफुल्लित करून गेला.