'वर्तणूक'
'वर्तणूक'
जशी द्याल वागणूक दुसर्यास,
तोही वागवेल तसाच तुम्हास.
मानवाची 'वर्तणूक' हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. आज प्रत्येक मानवाच्या वागणुकीत मोठा बदल झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारची वागणूक मिळत असली, तरी ही मानव कोणत्या ही कारणाने आपली वागणूक बदलत नव्हते. सोपे उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळी गरीब-श्रीमंत खूप भेदभाव होता. सावकाराने कशीही वागणूक दिली तरी लोक सभ्यतेने, विनम्रतेने आणि आदराने सावकारास वागणूक देत होते. त्याला कारणेही तशीच होती. दादागिरी, गुंडागिरी किंवा आदरात्मक भीतीने मानवाच्या मनावर दडपण असायचे व त्या दृष्टीनेच तो वागत असे.
आज काळाबरोबर समाज, लोकांचे विचार, राहणीमान सर्व काही बदलले आहे. आधुनिक माध्यमांमुळे मानवाला स्वतःचे अस्तित्व कळत आहे. प्रोत्साहित अवतरणांमुळे मानवाला आयुष्य जगण्याचे रहस्य समजत आहे. त्यादृष्टीने मानव आज वागत आहे.
म्हणूनच आपण जसे दुसऱ्यांना वागवू तशीच वागणूक आपल्याला परत मिळत आहे. हिनतेने वागवल्यास क्रोधाची वागणूक मिळते. अहंकाराने अहंकारच परत मिळते. प्रेमाने वागवल्यास परत प्रेम, आदर, आपुलकी मिळते.
दुसऱ्यांच्या भावना दुखावण्यापेक्षा आपणासही त्याच भावनेने वागवले जाईल याची जाणीव मनात ठेवूनच समोरच्याला वागवले पाहिजे, कारण सर्वांनाच मान, सन्मान आणि स्वाभिमान आहे.
