वर्ल्ड टूर
वर्ल्ड टूर
"काय मेली कटकट आहे डोक्याला. आमच्या नशिबात हेच वाढून ठेवलंय. लग्न करून या घरात आले..तेव्हापासून सगळेच दिवस सारखेच. कुठे जाणं येणं नाही कि कसली हौस मौज नाही. अजून किती वर्ष 'राहणार' आहेत ...कोण जाणे. हे ही सुटत नाहीत आणि आमची ही सुटका नाही."
अनिता स्वतःशीच बडबडत गेली चार वर्षे अंथरूणाला खिळून असलेल्या सासऱ्यांना स्पंजिंग करत होती...
"पैसा असता गाठीला तर एखादा माणूस तरी ठेवला असता यांच्यासाठी..पण नाही..आमच्याकडे सगळ्याचीच ओढाताण.
कमावतं माणूस एकच आणि त्यातलाही बराचसा भाग यांच्या औषधांवरच जातो...
मलाही कामासाठी बाहेर पडणं अशक्य यांच्यामुळे. नशीबच मेलं फुटकं त्याला कोण काय करणार.
देवा! काय रे! यांच्या घराशीच गाठ घालायची होती? "
कातावलेल्या अनिताची बडबड ऐकून सासरेबुवा विषण्ण हसले.
"हो ग बाई! तुझ्या नशिबात माझं करणं आणि माझ्या नशिबात हे असं जगत रहाणं... नकोस तरीही जगावंच लागणारं." मनातल्या मनात बोलून त्यांनी डोळे मिटले तरीही त्यांचं असहाय्य पण डोळे मिटल्या बरोबर अलगद डोळ्याच्या कोपऱ्यातून निसटलंच.
"देवा खरच अशी वेळ वैऱ्यावर ही येऊ नये. मला माझ दु:ख आहेच पण माझ्यामुळे या दोघांना ही त्रास. माझ्या या अशा कटकटीमुळे पाळणाही लांबवला यांनी. अजून किती दिवस करायचं त्यांनी तरी..कळतं मलाही..माझ्या अशा अवस्थेमुळे त्यांनाही कुठले आनंद साजरे करता येत नाहीत की मोकळेपणा मिळत नाही. सतत घरभर एक आजारी वातावरण भरून राहिलेलं असतं.
खरंच देवा! सोडव रे यातून..
सगळ्यांनाच. " .......
ते विचार करत असतानाच अनिताचं लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे गेलं आणि अश्रूंच्या रूपाने ओघळलेल उदासपण तिच्या मनात कालवाकालव करून गेलं. न बोलताही बरंच काही बोलत होते ते डोळे. कसंतरीच झालं तिला.
"आपण पण ना...कधीकधी फारच रिऍक्ट होतो. खरंच हे असं जगणं कोण स्वतःहून मागून घेईल..हे परावलंबित्व...
सासुबाई होत्या तोवर आपल्याला याची झळही लागू दिली नाही. छोट्याशा आजाराचं निमित्त झालं.......
जातानाही जीव अडकला होता त्यांचा.
'ह्यांनी' वचन दिलं बाबांना बघेन.. काळजी घेईन...आपणही शब्द दिला..तेव्हा कुठे डोळे मिटले त्यांनी. ©®दीपाली थेटे-राव
तसही घरी असतात तेव्हा 'हे' च तर बघतात बाबांचं.
उगाच बोललो आपण. उगाच चिडचिड करतो. "
तिनं मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तसा तिचा हात हातात घेऊन ते म्हणाले, "असा नव्हतो ग पूर्वी. खूप कष्ट केले आयुष्यात. आईवडिलांमागे बहिणींना सांभाळलं.. त्यांचे संसार मार्गी लावले. लग्न झालं तसं यमुनेनंही खूप साथ दिली. ओझं वाहून वाहून मी अधू झालो..एकटीनं मुलाला वाढवायचं..मोठं करायचं..शिकवायचं..यासाठी फार झटली ग. कुठल्याही कष्टाला मागेपुढे पाहिलं नाही तिनही.
अपार कष्ट केले.. भूक मारून जगलो..म्हणून मग आता हे असं अंथरुणाला खिळणं नशिबात आलयं.
मला फिरायची तर फार हौस..
आवडायचं..
मित्रांनी कधी प्लॅन ठरवले, ते बाहेरगावी फिरायला गेले की मी त्यांच्या कडून आवर्जून माहिती घेत असे.
एकच आशा....कधीतरी यमुनेला घेऊन मी ही जाईन. .
कधी कुठे जाताच आलं नाही. विचार केला..मुलगा मोठा होईल, शिकेल, चांगला नोकरी करेल, मग
आपल्या आरामाचे दिवस येतील तेव्हा खूप फिरू, जग बघू , वर्ल्ड टुरला जायचं होतं..तिच्या सोबत देश बघायचे वेगवेगळे.. वाचलेलं, ऐकलेलं सारं सारं अनुभवायचे.. मनसोक्त हिंडायचं, विदेशी पदार्थ चाखून बघायचे. सगळ्या चिंता बाजूला सारून चैन करायची.
सगळाच प्रवास अधुरा... स्वप्नच राहिलं सगळं
मरायच्या आधी मला कुठेतरी फिरायचय गं! बाहेरचं... घराबाहेरचं... या गावाबाहेरचं जग अनुभवायचंय. या चार भिंती लांधून एकदा तरी पलिकडे भरारी मारायचीय. सुखानं डोळे मिटेन मग.....
पण मी हा असा... लाचार..
तुमची ही जाणीव आहे मला,
काय करू मी तरी ... " ते थकून शांत पडले.
"थांबा मी तुमच्यासाठी गरम गरम पेज घेऊन येते खायला."
झटकन आनिता उठली. डोळ्यातलं पाणी त्यांच्यासमोर दिसू नये म्हणून त्यानिमित्ताने स्वयंपाक घरात निघून आली.
गरमागरम पेज वाटीत घेऊन त्यांना भरवता भरवता एक निराळीच कल्पना सुचली तिला.
दुसरे दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर ती बाहेर पडली. चॉकलेट्स, आईस्क्रीम, वेफर्स, पॉपकॉर्न, वेगवेगळी बिस्किटे, केक...असे काही तर- तर्हेचे जिन्नस थोडे थोडे खरेदी केले. दुकानात जाऊन तिला हवी ती सी.डी. खरेदी केली. घरी जाता जाता शेजारच्या नरेशकडून सीडी प्लेअर मागितला आणी त्याच्या मदतीने टी. व्ही ला जोडला. संध्याकाळी नक्की परत देते असं सांगून त्याचे आभार मानले. मग दोघांसाठी थोडं खायला बनवून ती बाबांच्या जवळ आली. ते ही तिची धावपळ बघत होते.
"चला बाबा आवरूया पटापट. आज बाहेर जायचय आपल्याला. चला आज जरा चांगले कपडेही घालू."
"अग पण मी असा... तू एकटी... कसं जाणार. नको अशी थट्टा करु ग. "
रया गेलेला, कधीकाळी भक्कम असलेला अन् आता आजारानं पार काडी झालेला जीव बघून गलबलली ती. आवरून त्यांना नरेश च्या मदतीने तिने उशीला टेकवून बसवलं
"चला बाबा! विमान चालू झालय...एवढ्यात उडेल आकाशात..." म्हणत घरातला कमरेचा पट्टा त्यांच्या कमरेला लावत कॉटच्या बार मधे अडकवला.
आता अचंबित होण्याची पाळी बाबांची होती.
"अग काय करतियेस? कुठे नेणारेस मला असं कॉटला बांधून? चंदू ला तर येऊ दे घरी. "
"नाही बाबा आज आपण दोघच जाणार फिरायला
चला आटपा तयार आहात ना"
"पण..पण हे असं? " अशुभाच्या कल्पनेनं घाबरले ते.
तिनं ताडलं. पटकन त्यांना जवळ घेतलं, " घाबरू नका बाबा. तुमचा जीव घेण्याइतकी कोत्या मनाची नाही मी.
बस! तुमची फिरायला जाण्याची इच्छा पुरी करण्याचा प्रयत्न करतीये. उरका आता..."
डोळ्यातले पाणी पुसत तिने वर्ल्ड टूरची सी.डी. प्लेअर मधे सरकवली आणि बाबा आज वर्ल्ड टूर करायचीये आपल्याला..म्हणत त्यांच्या शेजारी बसली. कदाचित आता कधीही घराबाहेर पडणं अशक्य असलेल्या त्यांना, टीव्ही मधे का होईना विदेश वारीचा अनुभव ती देत होती....कधी चॉकलेट, कधी वेफर्स तर कधी पॉपकॉर्न खायला घालत हौस पुरी करत होती.. पाण्याने भरून आलेले समाधानाने फुललेले दोन चकाकणारे डोळे उत्सुकतेने समोरच्या टीव्हीत गुंतून वर्ल्ड टूर ला निघाले होते.
त्या दोन उत्सुक... नेत्रांतून ओघळणारे समाधान ती हरवल्यासारखी पहात राहिली. ते पुसायचे भानही तिला उरले नाही.