विषय - स्त्री : एक प्रेरणा
विषय - स्त्री : एक प्रेरणा




आमराईतून फेरफटका मारताना ऐकले कोकिळेचे कुजन सुंदर वृक्षलतिका आपापला पर्णसंभार सांभाळत सुखवित होत्या निस्तेज अशा या डोळ्यांना. काय नि कुठे चुकले? पारतंत्र्याच्या बेड्या उपटून स्वतंत्रतेच्या शिखरावर जाण्यासाठी केलेला प्रयत्न तोही समाजाला मान्य नाही. का अशी स्त्रीवर्गाची दुर्दशा? आईच्या गर्भात पोटाच्या अंतर्भागात सुरक्षितपणे विश्रांती घेत असताना आईच्या नि गर्भाच्या जोडलेल्या नाळेतून भरणपोषण तर होत गेले त्याबरोबरच संस्कारांचे बीजही रुजत गेले. तेव्हा कुठे माहित होते बाह्यदुनियेचे वेगळेपण? कुठे कळत होते की स्त्रीजन्म मिळणार आहे. बाबांच्या प्रगल्भ बुद्धीचे कण न कण आपल्या रक्तात नसानसांत भिनले असताना कुठे माहीत होते की जन्मल्यावर रस्त्यात खाचखळगे असतील.
हॉस्पिटलमधील चौथ्या खोलीतील कॉटवर आईच्या उबदार कुशीत स्वस्थपणे पहुडतांना कुठे कळले होते फुलासारख्या जीवनात काट्यांशी टक्कर करावी लागेल. एवढेच नव्हे तर आईच्या वेण्णा चालू असताना होत असलेली बाबा आणि आजीआजोबांची घालमेल काय दर्शित होती? इवलाला जीव जन्मताच आईने कुठे विचारले मुलगा की मुलगी? ती इतकेच उसासली माझ्या लेकराकडे आधी बघा मग मला. कुठे कळले होते तेव्हा की पारतंत्र्याच्या शृंखला मुलीच्या जन्मासोबतच तिच्या पायांशी जखडल्या जाणार.
स्त्रीजन्म हा मनुष्यजातीसाठी श्रापासम आहे. पण सगळे हे विसरतात की शिवाजीमहाराज गांधीजी नि भगतसिंग देखील आईच्याच उदरातून जन्मले. पण या प्रश्नाचे उत्तर द्यायला समाज थोडीच बांधील आहे? समाजचक्र असेच चालू राहणार. स्त्रीला वंचितांचे जिणे जगावे लागणार. तिला मानाचे स्थान मिळणारच नाही भले ती कितीही बुद्धिमान असो. खूप प्रयत्न केले झाशीच्या राणीने रझिया सुलतानाने नि जोतीरावांच्या सावित्रीने. पण समाज अंगावर शेणगोळे फेकणारच. सनातनी लोकांच्या डोळ्यावर जशी काही झापडे लावली आहेत. जसे पिकलेले पान झाडाच्या फांदीवरून अलगद खाली पडून मातीत मिसळते. कुठे राहते अस्तित्व त्याचे? तसे स्त्रीचेही आहे तिचेही स्वतंत्र अस्तित्व कुठे दिसते? पिकल्या पानासारखी तीही गळून जाणार मातीत मिसळण्यासाठी........