STORYMIRROR

Sanjay Udgirkar

Others

3  

Sanjay Udgirkar

Others

विश्वास.

विश्वास.

7 mins
1.7K

खूप विचार केल्यावर मी ठरवले की तिला माझ्या भूतकाळाची इथ्यंभूत माहिती सांगून टाकावी. माझी व तिची भेट होण्यापूर्वीचा हा काळ. ती एक प्रकारची कबुलीच आहे म्हणा ना. ती ह्यापुढे ह्या माहितीचा माझ्या विरुद्ध उपयोग करू शकेल. माझ्या भूतकाळाची माहिती तिला माझ्याशिवाय इतरांकडून मिळाली असती तर तिचा माझ्यावरचा विश्वास कधीही संपूर्ण राहिला नसता. त्या विश्वासात शंका सदैव डोकावत राहिली असती. मला आमच्या नात्याची सुरूवात सत्याच्या भक्कम पायावर करायची होती. तिनेसुद्धा तिच्या भूतकाळाशी माझी ओळख करून द्यावी ही अपेक्षा नव्हती. हा काही सौदा नव्हता.


आम्ही एका सामायिक मित्राच्या लग्न समारंभात भेटलो. तीसुद्धा मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो त्याच महाविद्यालयात माझी ज्युनियर होती. एवढेच काय ते आमच्यात कॉमन होते. आम्ही दिसायला सर्वसाधारण माणसे जशी दिसतात तशी आहोत. फार काही सुंदर नाही पण ठीकठाक श्रेणीतले.


तिची ओळख झाली, आम्ही थोडा वेळ आमच्या महाविद्यालयीन काळाबद्दल बोललो, आमच्या प्राध्यापकांबद्दल व इतर असेच काहीबाही बोललो. प्रथमदर्शनी छान वाटली. आम्ही पुन्हा भेटायचे ठरवून एकमेकांच्या मोबाईलवर मिस्ड काॅल दिले. आम्ही दोघांनी आपापले मोबाईल नंबर सेव्ह केले व निरोप घेतला.


त्यानंतर एक आठवडा मी कामानिमित्त खूप व्यस्त होतो. तिला विसरून गेलो होतो. पुन्हा तिची आठवण एका मित्राच्या फोनमुळे झाली. त्या लग्न समारंभाचा विषय निघाला व त्या अनुषंगाने तिची आठवण झाली. मी तिला फोन केला, मला वाटले मी जसे तिला विसरलो तसे तीसुद्धा मला विसरली असेल पण तिने फोन उचलून बोलायला सुरुवात केल्यावर मला असे वाटले की बहुतेक ती माझ्या फोनचीच वाट पाहत होती. हा माझा भ्रमसुद्धा असू शकतो पण तिच्या बोलण्यात खूप उत्साह जाणवला.


जुजबी गप्पा झाल्या व आम्ही एकत्र चहा पिण्यासाठी भेटायचे ठरवले. तारीख, दिवस, वेळ व स्थान ठरवल्यावर निरोप घेतला.


ही खरी आमच्या प्रेमाची सुरुवात. ह्या फोनवरच्या संभाषणात माझ्या मनात तिच्याबद्दल आस्था उत्पन्न झाली, माझ्यातर्फे ती माझ्या प्रेमाची सुरुवात होती हे नंतर मला जाणवले. त्या संभाषणात आमच्या प्रेमाचे बी अंकुरीत झाले.


आम्ही दोघेही ठरल्या प्रमाणे अगदी वेळेवर जिथे भेटणार होतो तिथे पोहोचलो. आम्ही दोघेही ऊत्साहीत होतो. मला तिला पाहिल्याबरोबर छान वाटले. साधे स्वछ नीटनेटके नेसलेले कपडे. शिस्त व व्यवस्थित वाटली. चेहर्‍यावर खरेखुरे छान स्मित दिसत होते. समाधानी, प्रसन्न. माझे मन मला नकळतच तिच्या प्रेमात गुंतले.


ह्या भेटीत आमचे एकमेकांच्या माहितीचे अपडेटीकरण जवळ जवळ संपूर्ण झाले. थोडे खाणे व अर्धा अर्धा कप चहा दोनदा झाला. एक तास कुठे गेला कळलेच नाही. अर्थातच पुन्हा भेटायचे ठरले. भेटीच्या इतर बाबी सुद्धा ठरल्या व हे ही ठरले की बिलाचे पैसे एकदा मी व एकदा तिने भरायचे.


आम्ही ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा भेटलो होतो तेच ठिकाण आमच्या नंतरच्या सर्व भेठीसाठी निवडले. दरवेळेस भेटायची वेळ नक्की झाली. ती पण आम्ही दोघांनी मिळून दोघांची सोय पाहून ठरवलेली. दिवस नक्की झाला. आमच्या दोघांचा आम्ही एक व्हाटसअप ग्रुप तयार केला. तिला शिस्तीची फार आवड आहे. तिला सगळ छान नियोजन केलेलेच आवडायचे. वक्तशीरपणा हे तर तिचे ऑबसेशन होते.


ठरलेल्या प्रमाणे आम्ही भेटलो व नंतर भेटत राहिलो. हळूहळू आमच्या मैत्रीत घनिष्ठता निर्माण झाली. एकमेकांच्या कुटुंबियांची माहिती आम्ही एकमेकांना दिली. आमच्या सर्व आवडी निवडीच्या माहितीचे संपूर्ण आदानप्रदान झाले.


तिचा स्वभाव जरी शिस्तप्रिय असला तरी तिला भावगीते, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताची आवड आहे व त्यात बऱ्यापैकी ज्ञानही आहे. भरपूर वाचन आहे. इतिहास, नाटक, कादंबऱ्या. कविता हा प्रकार मात्र तिला अजिबात आवडत नाही.


तिचे बोलणे खूप छान वाटले. संथ प्रवाह असलेल्या एखाद्या नदीसारखे. मध्यम आवाजात, अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने शब्दांचे उच्चारण करीत, चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर स्मित सदैव नांदवीत. कधी वाटते आहे तर कधी नाही, फार कमाल आहे तिच्या स्मिताची. कोणत्याही विषयावर कामापुरते ज्ञान आहे. हळूहळू आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो असे वाटायला लागले.


ती ऐकताना सुद्धा कमालीची तल्लीन होऊन ऐकायची. तिचा तो तल्लीन व मंद स्मित बाळगणारा चेहरा पाहिला की मी काय बोलयचे हे विसरून जातो.


आम्ही एकमेकांच्या घरी जायला सुरुवात केली. आमच्या दोघांच्या घरातील लोकांनी आमच्या होणाऱ्या लग्नाला संमती व आशीर्वाद दिला. आम्ही दोघेही एकमेकांच्या आजोळी व वडीलांकडील नातेवाईकांच्या घरीसुद्धा भेट दिली.


माझी आई मला कळू न देता तिला सणासुदिला परस्पर फोन करून जेवायला व मदतीला बोलवून घ्यायची. मला ती अशी बरेचदा माझ्याच घरात मला आश्चर्यासारखी भेटली.


मी कधी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी गेलो असलो तर ती हक्काने घरी येऊन माझी खोली आवरून व नीट लावून ठेवायची. मला ह्याचे फार आश्चर्य वाटायचे.


आज संध्याकाळी आम्ही भेटणार आहोत व मी आज तिला प्रपोज करणार आहे. जवळपास एक वर्ष आमचे कोर्टशिप चालू आहे आणि आता आम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत आहोत. ती जर आज हो म्हणाली तर मी तिला माझ्या त्या भूतकाळाचा परिचय करून देणार आहे. त्यानंतर ती जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील.


मी वेळेवर आमच्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचलो. ती पण जवळपास त्याच वेळी आली. आम्ही बसल्या बसल्या मस्त गरमागरम कॉफी मागवली. मी तिला विचारून विषयाला सुरूवात केली. मी तिला प्रपोज केले. अगदी सरळ व सोप्या पद्धतीत मी म्हणालो, "माझे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करुन उरलेले आयुष्य तुझ्या बरोबर घालवायचे आहे. माझ्याशी लग्न करशील का?"


मी हे बोलत असताना माझे लक्ष तिच्या चेहर्‍यावर होते. मला तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसला व समंतीपण साफ कळून आली.


मला फक्त तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसले नाही. माझ्या आईने तिला ह्या घटनेची पूर्वकल्पना दिलेली असावी.


तिची व माझी कॉफी पिऊन झाली. ती म्हणाली जर तू तुझी कार आणलेली असशील तर चल कुठे तरी दूर फिरुन येऊया व या विषयावर कोठेतरी शांत ठिकाणी बसून बोलूया.


आम्ही गावाबाहेरच्या तलावाकाठी जायचे ठरवले. पंचवीस किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. आम्हाला तिथे पोहोचायला कमीतकमी पाऊण तास तरी लागणार होता.


गाडीत मी तिला माझी संपूर्ण माहिती दिली. माझा पगार, खर्च, बचत, स्थावरजंगम, जबाबदार्‍या, कर्तव्य व इतरही पैशाशी निगडीत माहिती दिली. एकंदर माझी आर्थिक स्थिती अतिशय चांगली म्हणण्यास काहीच हरकत नव्हती.


तिनेसुद्धा मला तिची सर्व आर्थिक माहिती दिली. तिची इच्छाही तिने सांगितली. तिला तिच्या आईवडिलांना आणखी पाच वर्षे तिचा पगार द्यायचा होता. हे मला सांगितल्यावर माझ्याकडे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिने पाहिले.


तिने तिच्या आईवडिलांना तिची पगार दिल्यास माझी काहीच हरकत नाही हे मी तिला सांगितले. मी तर हेही म्हणालो की तूझा पगार सदैव तुझ्या अधिकारातच राहील. तू त्या पगारीचा विनियोग कसा करायचा हेही तुझ्याच अधिकारात राहील आपण वाटल्यास ह्याचा लेखी करार करूयात.


ती म्हणाली हे एकून खूप छान वाटले. माझ्या भावंडांना अजून थोडा वेळ लागणार आहे स्थिर होऊन आईवडिलांची जबाबदारी घेण्यासाठी. एकदा का ते सेटल झाले की मी मोकळी होईन. माझ्यावर आईवडिलांचे खूप उपकार आहेत. आज मी जे काही चार पैसे कमवत आहे ते त्यांच्या मुळेच. म्हणून मला मनःपूर्वक वाटते की माझ्या पगारीवर त्यांचापण हक्क आहे.


आम्ही तलावाच्या काठावर येऊन पोहोचलो. मी गाडी पार्क केली व आम्ही एका निवांत ठिकाणच्या बाकावर बसलो. मी तिला विचारले की जर तिच्या आईवडिलांना तिला अजून काही मदत करावयाची असल्यास माझ्याकडे सेविंगस आहेत त्या ती घेऊ शकते. तिने त्यासाठी नकार दिला. मी तिला हे ही विचारले की तिच्या आईवडिलांवर कर्जाचे प्रेशर असल्यास त्याचीपण मी तरतूद करू शकतो. त्याला सुद्धा तिने नकार दिला.


मी तिला सांगितले की माझ्या घरात आईवडिलांच्या दुरदृष्टीमुळे भरपूर आर्थिक सुबत्ता आली आहे. माझ्यावर आईवडिलांची आर्थिक जबाबदारी नाही याउलट मलाच बाबांच्या सल्याने योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमुळे पगारी एवढेच पैसे दरमहा व्याज स्वरूपात मिळतात.


घरखर्च सगळा माझे आईवडिलच करतात. त्यामुळे माझ्यापण बर्‍याचश्या गुंतवणुकी छान झालेल्या आहेत. आम्ही बराच वेळ बोललो. बर्‍यापैकी अंधार होत आला होता. आम्ही परत फिरलो. येताना गाडीत असेच इतर काही विषयांवर बोलणे झाले. मी तिला विचारले की जेवायला होटेलमध्ये जायचे का? ती नाही म्हणाली. मी तिला सोडताना विचारल, "केव्हा कळवतेस?" ती म्हणाली, "आता अजून काय कळवायचे आहे" व लाजत पुढे म्हणाली, "माझा होकारच आहे. बाबांना मी तुमच्या घरी रीतसर बोलण्यासाठी पाठवते." 


मी तिला म्हणालो, "थांब आताच घरात काही सांगू नको, मला तुला माझ्या भूतकाळातल्या काही घटनांची माहिती देणे उरलेले आहे, आधी ते सर्व ऐकून, मग काय तो निर्णय घे." तिला ताबडतोब ह्या गोष्टीचे आकलन झाले नाही व ती हसून म्हणाली, "ठीक आहे." आम्ही पुन्हा भेटू त्यावेळी या विषयावर बोलायचे असे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.


मागच्या वेळी ठरल्या प्रमाणे आम्ही पुन्हा एकदा आमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी भेटलो. आज मी माझ्या बरोबर तिला दाखवायला माझी जन्मपत्रिका घेऊन आलो होतो. आमच नेहमीच खाणे व काॅफी पिणे झाल्यावर मला तिने विचारले की, "तुला मला जे काही सांगायचे आहे ते मी ऐकण्याची मनोमन पूर्ण तयारी करून आलेली आहे व मी तुला आधीच सांगून ठेवते की तू मला तुझ्याबद्दल काहीही सांगितलेस तरी तुझ्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय ठाम आहे." 


मी तिला माझी जन्मपत्रिका वाचायला दिली व सांगितले की अगदी शेवटी माझ्या सर्व जीवनाचा आराखडा लिहिलेला आहे व तेवढा वाचला तरी पुरेसे होईल.


तिने, दोन तिन मिनिटात तो आराखडा वाचला व जन्मपत्रिका मला परत दिली. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह असल्यासारखे करून माझ्याकडे पाहिले. मला विचारले, "तुला काय सांगायचे ते सांग ना." 


मी म्हणालो, "तू वाचल असशील की. माझ्या जन्मपत्रिकेत माझ्या अवेळी मृत्यूचा फार प्रबळ योग आहे व वयाच्या चाळीस ते बेचाळीस ह्या दरम्यान तो आहे, पत्रिका जाणणार्‍या लोकांनी ह्या संकटाला पन्नास टक्के होऊ शकण्याचे भविष्य वर्तविले आहे."


ती म्हणाली, "तुझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे का?"


मी म्हणालो, "खर बोलायचे झाले तर हो आहे आणि म्हणूनच मला ही गोष्ट तुझ्या निदर्शनास आणावी अशी वाटली कारण माझ जीवन आता हे माझ्या एकट्याचे नाही, ते तुझे पण आहे."


ती हसून म्हणाली, "तुझा ह्या गोष्टीवर विश्वास असेल पण माझा तुझ्यावर, माझ्या स्वतःवर जेवढा आहे त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त विश्वास आहे."


"मला वाटते जर आता सगळया शंका, कुशंका, किंतू व परंतू झाले असतील तर तुला माझ्याशी लग्न करायला काही हरकत नसावी."


मग आम्ही अगदी मनापासून ठरविले की लग्न करायचे.


Rate this content
Log in