विमान
विमान


मी बाल्कनीत उभा होतो एक विमान अक्षरशः 'घोँघावत' गेलं वरून मी पाहात राहिलो आ वासून! अर्थात्, आभाळात सूर मारला होता त्याने! त्यामुळे आवेशही तितकाच बुलंद हवा!
काय महत्वाकांक्षी आहे हे विमान! भारी कौतुक वाटलं मला त्याचं; त्याचा एकसुरी आवाज कसलीतरी खोल जाणीव करून गेला. च्यायला मी रात्रीचं जेवण वगैरे उरकून निवांत बसलोय गाणी ऐकत, गार वारा खात बाल्कनीमधे पण, माझ्यापासून काही हजार उंचीवर अशी काही माणसं आहेत, जी स्वतःचं घर पाहण्यासाठी आसुसल्येत! निघाल्येत जगाच्या पाठीवरुन घराच्या ओढीने त्यांना माझी जाणीव नाही, मलाही त्यांची नाही. असण्याचं काही कारणही नाही पण माझ्याचसारखा एक मर्त्य जीव आकाशातून माझ्याच डोक्यावरुन, प्रवास करतोय आणि त्याच वेळी मी इथे बाल्कनीत बसून त्यांचं अस्तित्व अनुभवू शकतोय, ही कल्पना फार सुखावून गेली मला.
त्यांच्याच सोबत एक माणूस आहे. तो त्याचं त्याचं काम करतोय हे खरं. पण तरी सगळ्यांसाठी तो 'खास ' आहे सगळ्या प्रवाशांचा त्याच्यावर विश्वास आहे. विमानातला प्रत्येक जण त्याच्यावरच्या विश्वासामुळे स्वतःची मान मागे कुशनला टेकवून आराम करतोय. तो माणूस म्हणजे विमानाचा pilot. माझ्याचपासून काही हजार उंचीवर असणाऱ्या याच्या मनात आत्ता काय चालू असेल? त्याला दडपण असेल त्याला काळजी असेल त्याच्याही डोळ्यांत स्वप्न असतील, स्वतःचं घर पाहण्याची विमानातल्या इतर प्रवाशांप्रमाणेच, त्याच्याही मनात हुरहुर असेल घरच्या दाराची चौकट त्यालाही खुणावत असेल
तो प्रवाशांमधे असून त्यांच्याहून भिन्न!
त्याचं त्याचं स्वतःचं असं एक वेगळं जग त्याच्या cockpit मधे असेल, जसं माझं माझ्या बाल्कनीमधे आहे जसं प्रवाशांचं, त्या कुशनच्या मऊ स्पर्शात सामावलंय!
पटकन मनात विचार आला
मी, विमानात बसलेला प्रवासी आणि विमानाचा pilot.
म्हटलं तर एकाच ठिकाणी आहोत पण किती तफावत आहे आम्हा तिघांच्या स्थितीत
तिघांची परिस्थिती वेगळी मनःस्थिती वेगळी स्वर वेगळे! नव्हे स्वर कसले, पुऱ्या बंदिशीच भिन्न आम्हा तिघांच्या! तरीही आम्ही एकाच ठिकाणी आहोत एकाच परिघात आहोत!
एकाच जगात, तीन जगं!
भन्नाट आहे ना कल्पना?
मी विचार करत राहिलो
विमान कुठल्याकुठे जाऊन पोहोचलं होतं!