वेळ
वेळ
वेळ हा फुकट आहे का हो?
नाही वेळ हा अमूल्य आहे.
वेळ विकत घेता येत नाही.
पण वेळ मिळवता मात्र येतो बर.
हाच वेळ जपून ठेवता येत नाही. पुढे या वेळेचा वापर करावा असेही होत नाही.
वेळ घालवता येतो मात्र नक्की.
वेळेची साठवणूक ही करता येत नाही.
पण वेळ अत्यंत चांगला जगता मात्र येतो बर का.
एकदा जर आपण वेळ गमावला तर पुन्हा संधी नाही.
म्हणून आलेली वेळ वाया घालवू नका. आलेल्या संधीचा उपयोग करा. आनंदाने जीवन जगा. सुखाच्या वेळेला सुख उपभोगा. दुख आलेत दुःखाशी चार हात करा.
माणूस म्हणून जन्माला आपण सारे तर माणसाशी माणसासारखं वागा.
परत हे जीवन नाही ना परत हे क्षण नाही.
मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर करून घ्या.
मनसोक्त मनातल्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या करून घ्या.
नंतर असं व्हायला नको की माझं हे जगायचं राहून गेलं. जे जगायचं राहून गेलं हो ते राहूनच जातं.
मग देवाचं बोलवण आलं की वेळ झाली म्हणून वर जावं लागतं.
तर या साठी आपण आलेल्या प्रत्येक क्षणांचा उपभोग घ्यावा.
समय तू धीरे धीरे चल... असं तर आपल्याला म्हणता येत नाही. घड्याळातल्या काट्याप्रमाणे आता हल्ली आपले जीवन चालू झालेले आहे. काटा फिरायचा थांबत नाही. घड्याळातला काटा फिरतो तसं माणूस हा त्या काट्यावरती जीवन जगतोय.
सकाळी उठा, आवरा, नोकरीसाठी घराबाहेर पडा, घरी आलं की परत काही काम असतात ती काम करा. त्यातून जमलं तर फॅमिलीला वेळ द्या. झाला दिवस संपून जातो.
आठवड्याच्या सुट्टीच्या दिवसामध्ये मस्त एक दिवस फिरायला जायचं. आठवड्याचा आनंद एकत्र करायचा. आणि परत सोमवार पासून शनिवार पर्यंत तेच जीवन जगायचे.
नोकरी करणाऱ्या बायकांची तर कसरत असते. लवकर उठा, लवकर आवरा, मुलांचे डबे भरा,मुलांना तयार करा. घरातील कुटुंबासाठी स्वयंपाक बनवून ठेवा. स्वतःचे आवरून नोकरीला पळा.तेथील टेंशन वेगळेच असते.
संध्याकाळी घरी या आणि पुन्हा परत घरातील कामाला झोकून घ्या.दिवस कसा संपतो हे देखील या माऊलीला कळत नाही.
तसे पाहता हल्ली प्रत्येकाकडे मोलकरीण असतेच. पण काही अजूनही बायका अशा आहेत की घरातल्या सगळं काम करून त्या नोकरीला जातात.
जरी घरातील ही कुटुंबाची जबाबदारी असली तरी देखील, आपण आलेली संधी,आलेली वेळ वाया घालवायची नाही. त्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा.
कधी कधी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात आपल्याला मनातून पण आपण म्हणतो वेळच नाही माझ्याकडे.
आणि मग वेळ निघून गेल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो बरं. मनात येतील त्या गोष्टी त्या त्या वेळेला करायला शिकले पाहिजे.
मग ते लहान मुलांसारखा उड्या मारणं असू दे, नृत्य करणे असू दे, गाण गुणगुणणं असू दे, अगदी घसरगुंडी, झोपाळे खेळणं असू दे, जे मनात येईल ते करून घ्यावे. लहान मुलात लहान मूल होऊन वागावे.आनंदाने जगावे. वयोवृद्धांना जपावे.
अजून एक सांगावेसे वाटते. आपण आपली तब्येत वेळेवर सांभाळावी. हल्ली तब्येतिच्या कुरबुरी फार दिसायला लागलेल्या आहेत. याचेही कारण वेळ असेच म्हणावे लागेल. काही जण अगदी हेल्थ कॉन्शियस असतात. ते वेळेवर आपली तब्येत छान चेक करून औषधपाणी घेऊन तंदुरुस्त राहतात. वेळेवर व्यायाम करतात चौरसाहार घेऊन छान तब्येत ठेवतात.
काही जणांकडे हे करायला वेळच मिळत नाही. आणि मग डायबिटीस,थायरॉईड, बीपी अशा इतर आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. का तर डॉक्टर कडे जायला वेळ आहे. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करायला वेळ नाही. चौरस आहार कसा घेऊ भाजी आणायला वेळ नाही. अशी अनेक कारणे असतात आपण वेळ मारून नेतो. त्यासाठी हे मानवा स्वतःच्या शरीराची काळजी घे. गाडीचा जसा मेंटेनन्स करतो, त्याप्रमाणे शरीराचा मेंटेनन्स वर्षातून एकदा कर. याचा अर्थ वर्षातून एकदा पूर्ण बॉडी चेकअप झाली पाहिजे.
योग्य व्यायाम केला पाहिजे. उत्कृष्ट घरातलं जेवल पाहिजे.
घरी यायला वेळ झाला चला आपण हॉटेलमध्ये खाऊन येऊ, असे या मुलांचा हलल्ली खूप होतंय. मग पोट दुखीचा त्रास सुरू होतात. अन्नाचे पचन नीट होत नाही.
म्हणून म्हणते घरातलं चवदार खा. वेळेवर जेवण करा. वेळेवर नाश्ता घ्या. आणि रात्रीचे कमी जेवा. यामुळे आपल्या जेवणाचे पचन चांगले होईल.
म्हणून वेळ ही पाळली गेली पाहिजे. वेळेवर कोणते काम केले असता ते छानच होते..
वेळ आहे छान जगण्याची
आनंदाने जीवन व्यतीत करण्याची
आनंद द्यावा अन घ्यावा
