Sarita Sawant Bhosale

Others Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Others Tragedy

वाटा या वेगळ्या

वाटा या वेगळ्या

6 mins
797


आज समीर आणि निशाच लग्न होत. नाही हो म्हणत अखेर समीर लग्नाला तयार झाला...आता निशाही दिसायला सुंदर आणि थोडंफार शिकलेली मुलगी भेटली त्यात ती गरीब स्वभावाची आणि जवळच्याच नातेवाईकांमधली...त्यात कुंडली एकदम ३६ गुणांनी जुळली. संसार अगदी सुखाचा होईल असं ब्राह्मणाने सांगितलं....मग समीरच्या आईने काय समीरचा पिच्छा सोडला नाही. आणि समीरही निशाला बघताच हो म्हणाला.

निशा समोरून मंडपात आली, समीर तिच्याकडे पाहतच राहिला. नवरी म्हणून वेगळंच रूप तिच्या चेहऱ्यावर आज झळकत होत. तिनेही चोरनजरेने हळूच समीरला पाहिलं आणि लाजून पुन्हा खाली मान घातली. लाजून तिचा चेहरा आणखी खुलला आणि समीरची नजर तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावरुन हटतच नव्हती. डोक्यावर पडणाऱ्या अक्षदांनीच दोघे भानावर आले. चोर नजरेने एकमेकांकडे बघत बघत लग्नसोहळा पार पडला.

नवीन घरात निशाने गृहप्रवेश केला. स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने आणि स्मित हास्याने निशाने सगळ्यांची मन हळूहळू जिंकली. समीर आणि तिच नातही हळूहळू फुलत होत, बहरत होत. एकमेकांना ओळखायला दोघेही वेळ देत होते. फिरायला जात होते. समीर तिची खूप काळजी घ्यायचा. बघताक्षणी प्रेमात पडलेला तो तिच्या प्रेमात आकंठ बुडालाच होता म्हणा ना. तीही समीरला आवडेल तस राहायची. त्याच्या आवडीनिवडींना जास्त महत्व द्यायची. कधी माहेरी गेली तर दोघानाही करमत नसायचे. निशा मग चार दिवसासाठी गेली असली तरी दोन दिवसातच परत यायची. एवढं प्रेम दोघ एकमेकांवर करायला लागलेले. लग्नानंतरचे गोड गुलाबी दिवस सरत होते तस प्रेम वाढतच होत. कधी अधेमध्ये रुसवेफुगवेही खूप व्हायचे. पण दोघांच्या एका प्रेमळ शब्दाने राग विरघळून जायचा. जास्तकरून निशा समीरवर रागवायची कारण समीर रोज कसल्यातरी गोळ्या खातो हे लग्नांनंतर काही दिवसात तिच्या लक्षात आलं होतं. त्याला विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तर द्यायचा. ताप, कणकणी कधी डोकेदुखीची गोळी खातो अशी कारणे द्यायचा.

डॉक्टर कडे दोघेही जाऊ बोलल्यावर तो टाळाटाळ करायचा किंवा मी कामावरून येता येता आलो अशी कारण द्यायचा. या कारणावरुनच खूपदा दोघांमध्ये अबोला व्हायचा पण समीरने प्रेमाने मिठीत घेतल की ती पाघळून जायची. समीरवरचा तिचा राग गेला असला तरी तिच्या डोक्यातून त्याच्या गोळ्यांचं प्रकरण काही जायचं नाही. पण प्रेम आंधळं असत अस म्हणतात. त्याच्यावरच्या प्रेमामुळे तिला वाटायचं की समीर खोट नाही बोलणार तिच्याशी. असेलही त्याला डोकेदुखीचा त्रास....अशी स्वतःची समजूत घालून पुन्हा ती त्याला माफ करायला तयार व्हायची. असा थोडा आनंदात थोडा रुसव्यात दोघांचा सुखी संसार चालू होता. काही दिवसांनी मेहुण्याचा वाढदिवस होता म्हणून समीर निशाला घेऊन तिच्या माहेरी पोहचला. निशासाठी हे खास सरप्राईज होत त्याच्याकडून. निशाही खूप खुश झाली आणि तिच्या माहेरचेही. निशाचा भाऊ समाजकार्य करणाऱ्यातला असल्यामुळे त्याने त्याच्या वाढदिवसादिवशी रक्तदान शिबिर आयोजित केल होत. निशाने स्वतःची रक्तदानासाठी नाव नोंदणी केली आणि ती समीरचही नाव नोंदवत होती तोवर समीरने नकार कळवला. निशा त्याला खूप विनवण्या करत होती की या चांगल्या कामात तुम्हीही योगदान द्या पण तो रक्तदानासाठी तयार होत नव्हता. खूपदा विनवण्या करून समीर तयार झालाच नाही आणि निशा थोडी हिरमसूनच परत सासरी आली.

घरी आल्यापासून समीरच रक्तदान करण्यासाठी नकार देण तिला खटकत होत. थोडी कणकण आहे असं सांगून त्याने रक्तदान केलं नाही पण घरून निघताना तर तो नीट होता आणि अचानक कशी कणकण येऊ शकते या विचाराने तीच डोकं बधिर झालेलं. त्याच त्या रोज गोळ्या खाण, कधीकधी कणकण येण, काल रक्तदान न करण हे सगळं तिला संशयास्पद वाटू लागलं. तिने याचा शोध घ्यायचा ठरवलं.

समीर बाहेर असताना तिने त्याच्या बॅगमधून काही गोळ्या घेतल्या. दुसऱ्यादिवशी थोडा वेळ बाहेर जाते अस सासूबाईंना सांगून निशा तिच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे गेली. त्या गोळ्या डॉक्टरांना दाखवून कसल्या आहेत ते विचारले. डॉक्टरांनी गोळ्या चेक केल्या आणि निशाला विचारले नक्की कोण घेत या गोळ्या....."माझा नवरा" निशा उत्तरली. निशाचे ओळखीचे डॉक्टर असल्याकारणाने तिने त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. गोळ्या बघुन डॉक्टरांचा चेहरा गंभीर झालेला. निशाने डॉक्टरांकडून जे ऐकलं त्यानंतर काही क्षण तिला काहीच सुचत नव्हतं. खूप रडायला लागली. डॉक्टरांनी काही वेळ तिला तिथेच आराम करायला लावून मग तिला घरी पाठवलं.

निशाने घरी जाऊन सरळ बॅग भरली आणि माहेर गाठलं... कोणालाही काहीही न सांगता....समीरचीही वाट न बघता.. समीर घरी आल्यानंतर निशा काहीही न सांगता माहेरी गेल्याच कळलं. तो तसाच तडक तिच्या माहेरी पोहचला. निशा सोबत तिच्या घरचेही समीरवर रागावले होते. निशाचा भाऊ तर हात उचलत होता समीरवर पण निशाच्या वडिलांनी त्याला आवरलं....समीरला काही कळतच नव्हतं की अचानक अस काय झालं ज्याने निशा घरच सोडून आली आणि तेही कोणाला न सांगता...इथेही हे सगळे माझ्यावर एवढे का चिडलेत...तो निशाला भेटुद्या म्हणून विनंती करत होता पण निशाच त्याला भेटायला तयार नव्हती. खूप गयावया केल्यानंतर निशा त्याला भेटायला तयार झाली.

निशाचे डोळे रडून रडून सुजलेले आणि रागाने लालबुंदही. समीर नेहमीप्रमाणे तिच्याजवळ गेला तिला समजवायला तशी तिने त्याच्या कानशिलात लगावली. समीर दोन मिनिट स्तब्ध. निशाने त्या गोळ्या त्याच्यासमोर फेकल्या आणि विचारले आता तरी खरं सांग कसल्या गोळ्या खातोस तू रोज? समीरला निशाच्या उचललेल्या हाताने आणि त्या गोळ्यांनी सगळी उत्तर मिळाली होती. काय झालं याचा अंदाज त्याला आता आलाच होता. समीर ढसाढसा निशासमोर रडायला लागला. मला माफ कर, मी तुला सगळं सांगणार होतो बोलू लागला, " निशा जेव्हा एड्स सारखा कधीही बरा न होणारा रोग मला झालाय हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी पुरता हादरून गेलेलो ग. मी कोणाशी संबंध वगैरे ठेवले आणि त्यातून हा रोग जडला असा प्रकार नाही ग. इंजेक्शन मधून किंवा कोणाच्या रक्तातून तरी या रोगाने मला जवळ केलं.

चार वर्षे झाली मी या आजाराशी झुंजतोय. रोज गोळ्या खातोय जगण्यासाठी. सुरुवातीला जीव देण्याचाही प्रयत्न केला पण तिथेही हरलो. एड्सग्रस्त लोकांसाठी ज्या संस्था असतात तिथे गेलो. तिथे बघितलं माझ्या पेक्षाही खराब अवस्था असलेली लोक या आजाराशी हसत सामना करतायत. मरायचं तर प्रत्येकाला आहे ग पण मग अस रडून का म्हणून मी आनंदाने जगायचं ठरवलं पण माझा आजार सगळ्यांपासून लपवून अगदी माझ्या कुटुंबापासून सुद्धा. कारण त्यांनी मला कधीच अस स्वीकारलं नसत आणि मी कधीच हसत जगलो नसतो. समाज अजूनही हा आजार संसर्गजन्य रोग समजतो. असा आजार झालेल्या व्यक्तीला तो वाळीत टाकतो. मला तस जगायचं नव्हतं ग. सांगना माझी काय चुकी होती? आम्हाला प्रेमाची,मायेची गरज असते. आमच्यामुळे कोणाला काही त्रास नसतो. हा आजार स्पर्शाने,संसर्गाने पसरत नाही ग. पण हे समाजाला किती समजावलं तरी तो आमच्या सारख्याना त्यांच्यासोबत जगायची परवानगी देतच नाही. आमचीही काही स्वप्न असतात. आम्हालाही उरलेलं आयुष्य भरभरून जगायचं असत. सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात.

मला तुझ्या आयुष्याशी खरच खेळायचं नव्हतं. तुझ्याआधी मी लग्नाला तयार नव्हतोच पण आईने मला खूप भावुक केलं आणि तुला जेव्हा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तुला सत्य सांगण्याचा लग्नाआधीही खूपदा प्रयत्न केला पण हिम्मत नाही झाली. तू नाही म्हणालीस तर...मी एकटाच राहिलो तर आयुष्यभर... मी जेव्हा या आजाराने खंगुन जाईन... अंथरुणावर खिळलेला असेन तेव्हा माझीही प्रेमाने सेवा करणार कोणीतरी असावं असा स्वार्थी विचारही मी केला. लग्न झाल्यावरही खूपदा वाटलं सांगावं सगळं पण परत तू मला सोडून जाशील या भीतीने आजपर्यंत गप्पच राहिलो. तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला गमवायच नाही मला निशा. समाज नाही मला स्वीकारणार पण तुही तशी वागू नको. मी तुला फसवल माहीत आहे पण माफ कर. खूप प्रेम आहे तुझ्यावर या प्रेमासाठी तरी माफ कर..

निशाच प्रेम आहे समीरवर पण त्याच खोटं वागणं ती विसरू शकत नाही. तिची झालेली फसवणूक ती विसरू शकत नाही. आजही ती एकटीच राहते. समीरला ती विसरून पुढे जाऊही शकत नाही आणि त्याला तो खोटं बोलला म्हणून स्वीकारूही शकत नाही.समीर तिच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय.

वाचकहो, नेहमीच लग्न जुळवताना कुंडली आधी जुळवतो मग लगेच लग्नच. पण कुंडलीच्याही आधी रक्ततपासणी मुलाची आणि मुलीची केली तर मला वाटत अशा बऱ्याच निशा आणि समीरची आयुष्य उद्धवस्त होता होता राहतील. त्याचबरोबर समीर सारखे एड्सग्रस्त बरेच असतील ज्यांना समाजानं स्वीकारलं तर अस खोटं बोलण्याची,फसवणुकीची वेळ त्यांच्यावर येणार नाही आणि तेही उरलेलं आयुष्य मुक्तपणे जगतील. कथा सत्य घटनेवर आधारित आहे. एड्स सारख्या सामाजिक विषयावर जनजागृती अजूनही हव्या त्या प्रमाणात होत नाही त्यामुळे निशासारखे निष्पाप या प्रकारात बळी ठरतात. सोबतच कुंडलीला महत्व कितपत द्यावं हाही सामाजिक प्रश्न झालाय सध्या. कथा वाचून ठरवा कोणत्या गोष्टीला कितपत महत्व द्यावं. कशी वाटली नक्की सांगा आणि सावध राहा,सावध वागा आणि प्रेमाने वागा😊🙏. लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही🙏😊


Rate this content
Log in