Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Dr.Smita Datar

Others Drama


1.0  

Dr.Smita Datar

Others Drama


त्या चौघी

त्या चौघी

4 mins 10.2K 4 mins 10.2K

 तश्या त्या चौघी कितीतरी वर्षांपासून माझ्या आयुष्यात आलेल्या. माझं आयुष्य त्यांच्याशी बांधलं गेलेलं . किंबहुना त्या नसतील तर माझं आयुष्य विस्कळीत होऊ शकत होत.काही वर्ष अशीच गेली. स्वतः च्या वाऱ्या पावसात , मनाच्या टीपकागदाने त्यांची मने टीपलीच नाहीत. संसाराच्या रहाटगाडग्यात त्यांच्याकडे वळून बघायला वेळच मिळाला नाही, असं असेल. कधी मला त्यांच्या नदीत आपली घागर बुडवावीशी वाटली नसेल . पण सहवासाने त्या चौघी माझ्या खूप जवळ आल्या. त्या माझ्यासारख्या नव्हत्या, मी त्यांच्यासारखी नव्हते.पण हळूहळू त्या माझ्यात डोकावत गेल्या. कोणी बिनदिक्कीतपणे , कोणी दबकत, दबकत., कोणी आल्या आणि उलट्या पावली परत जाऊ ही पहात होत्या.

           एकाच प्रसंगावर प्रत्येक माणूस वेग वेगळ्या पद्धतीनी प्रतिक्रिया देतो, तसाच काहीसा हा प्रकार. त्या चौघी होत्या, मला मदत करणाऱ्या माझ्या मदतनीस. माझ्या भारवाहक. कदाचित त्यांच्याच मुळे मला मिळत होता माझ्या घरातला माझा चौथा कमरा, माझी स्पेस , माझं अस्तित्व. मी व्यवसायात ,समाजात घरात रुजले, फुलले, त्यांच्या जीवावर...त्या चौघी .

                                                     शकुंतला

          अंगाने आडमाप, हसरी , नेहमी उत्साही. तिच्या शरीराला तिचं बोलण मुळीच शोभायचं नाही. बोलण भलतंच लाडीक. लहान मुलीसारखी शब्दफेक . त्या लाडे लाडे वागण्यातूनच मी ताडलं होत, ही हिच्या नवऱ्याची खूप लाडकी असणार. नवरा हिचा शब्द झेलत असणार. आणि खरच ठरलं ते. मी सहज चौकशी करताना कळल. मला म्हणाली एकदा लाजत, “ आमचे हे सकाळी माझ्या आधी उठतात. झाडलोट करतात, चहा करतात , मग मला उठवतात. कामावर पण मी रिक्षाने येते ताई. सात आठ घरची पोळी भाजीची काम करते, रिक्षानेच घरी जाते. एक वाजेपर्यंत सगळ आटपते.जेवण ह्यांनी करून ठेवलेलं असतं. जेवते आणि दुपारी चार तास झोपते. “ मी थक्क . नखशिखांत बघत राहिले तिच्याकडे. कदाचित तिच्या भाग्याचा हेवा केला, जळफळाट झाला मनातल्या मनात . त्यांचं सेक्स लाईफ पण सुखी असणार. तिच्या झक्क लाजण्यावरून मी ताडलं. म्हणून ती अतिशय घाबरट, हळवी राहिली होती का ? कोणताही कठीण प्रसंग आला की मुळूमुळू रडूच यायचं तिला. नवऱ्याच्या अति प्रेमाने पंगु बनत चालली होती का शकू ?

                                                  जयश्री

         डूमडूमत डमरू ये , खणखणत शूल ये, शंख फुंकत ये, येई रुद्र ...

असं तिला बघूनच वाटायचं. अंगाने किडकिडीत पण काटक, काळी सावळी, उंच...चेहऱ्यावर सगळ्या समाजाचा राग , चालण ..झपाझप म्हणायला कमी पडेल इतकं फास्ट . तिच्या दोन ढांगात दोन एक मीटर अंतर ती सहज पार करत असेल. घरात घुसणार पण वाऱ्यासारखी . आल्यावर दोन चार भांडी दणादण पाडवणार . टिपेच्या आवाजात नवऱ्याचा उद्धार करणार. ही म्हणजे जहाल लवंगी मिरची. बोलण, वागण , विचार ..सगळंच तिखट . सासूपासून भांडून वेगळी झालेली. प्रसंगी नवऱ्यावर पण हात उगारणारी . तिच्या चाळीत पण सगळे टरकून असायचे तिला. स्वतःच्या मुलांवर माया करणारी, त्यांच्या साठी खस्ता खाणारी..पण त्यांच्याशी दोन गोड शब्द तरी बोलायची कि नाही . कुणास ठाऊक ? सतत ढोर मेहनत करण्यात आणि पैसे मिळवण्यात गुंतलेली. चाळीतले दुसऱ्या बायकांचे नवऱ्याबद्दलचे प्रोब्लेम्स ही एकाच वाक्यात सोडवायची , “ दोन चढवून दे त्याला, आणि गप्प बसव. “ कोणालाच न ऐकणारी, साक्षात चंडिका आणि कामाला वाघ. तरुण वयातल्या सगळ्या भावना कोमल तिच्या कर्तव्यभावनेपुढे जळून कोळसा झाल्यात की काय , अशी शंका यायची मला.

      सांगू का तिला , बाई ग..थोडे कोवळे कोंब तरारायला हवेत तुझ्या मनात..नुसता खडकाळ माळ काय कामाचा? थोडी हिरवाई जप ग बाई..

                                                       पार्वती

           ही पण शिडशिडीत , काळी सावळी , मिचमिच्या धूर्त डोळ्यांची. अंगाकाठीच्या मनाने संथ चाल. शिकार बघून शांत पावलं टाकणाऱ्या मांजरीसारखी, प्रसंग बघून बोलणार . पटकन रिअक्शन न देण्याचा स्वभाव. सगळीकडे आपला फायदा आहे का , याचा अंदाज घेणारी, अखंड सावध.

          हिचा नवरा बेवडा. पण त्याला एक ठराविक रक्कम देऊन तो गप्प बसेल अशी चोख व्यवस्था तरुणपणातच केलेली. आपली सर्व प्रकारची सोय कधीच लावून ठेवलेली. आतापर्यंत दोन तीन जणांशी घरोबा झाला होता तिचा.त्यातून घरखर्च चालवण्यापासून चापून चोपून सुंदर साड्या नेसण्यापर्यंतची चैन करणारी. मुली दहा जणांबरोबर फिरतात तिथे दुर्लक्ष करणारी, पण एखादा मुलगा गब्रू असेल तर सरळ तिचा त्याच्याशी पाट लावून मोकळी होणारी. चौघीना तिने असंच उजवल होत. मेहनत, प्रेम, राग, लोभ सगळंच मोजून मापून करणारी, हिशोबी.

       आयुष्य एक अधिक एक असं नसत, कधीतरी सौदा घाट्यात झाला तर काय करशील ? तोपर्यंत मुल बाळ तराजूच्या हलक्या पारड्यात टाकतील तुला . आताच शहाणी हो गे माये.

                                       मीना

         सगळ्यात तरुण , सुरेख , अल्लड आणि बिनडोक पण. वोट्स अप आणि फेसबुक च्या गैरवापराने नादावलेली. घरच्यांनी ज्याच्याशी लग्न लावून दिलंय, तो हिला आवडत नाही. पण जगण थेट अंगावर घ्यावं , इतकी हिम्मतही नाही. सतत कन्फुजड..कुठलीच निर्णय क्षमता नसलेली. प्रत्येक प्रसंगात रडण्याचा स्वभाव. झडझडून अंगमेहनत , अक्कलहुशारी काहीच वापरण्याची मानसिकता नसलेली रडूबाई. सगळ्या जणींमध्ये सर्वात प्रामाणिक पणे काम करणारी . माझी थोडी जास्तच काळजी घेणारी.

       नवा मित्र केलाय, तो आपला नक्की कोण आहे , हे ही आकलन न होणारी, भिरभिरलेली पण मनाने निर्मळ असलेली. हिच वागण , बोलण सगळच निस्तेज, फिक्कुटलेलं . हिला हात दिला मदतीचा, तर तो पकडण्याची सुद्धा कुवत नाहीये हिच्यात. कसं होणार हिच ? 

        हे कोकरू कुठे काट्या कुट्यात अडकायला नको. रोज सूर्यास्ता नंतर सुरक्षित कोंडवाड्याकडे परत गेलं तरी खूप झालं म्हणायचं.

          त्या चौघींनी माझ्या मनात फेर धरला होता. चौघींच विश्लेषण करत होते.त्यांच्या वागण्याची संगती लावता लावता कुठेतरी मी च त्यांच्याशी” गोफ विणू बाई गोफ विणू” खेळायला लागले होते. माझ्याशी सगळ्या चांगल्याच वागत होत्या. तरी व्यक्तिश : माझ्या मनात प्रत्येकीच स्थान वेगळ होत. शेवटी माझ्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या स्त्रिया होत्या. त्यांना कदाचित नसेल पण मला त्यांची नितांत गरज होती. 


Rate this content
Log in