Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

तुला काही सांगायचे...

तुला काही सांगायचे...

3 mins
212


"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" च्या

गजरात बाप्पाचे पृथ्वीवरती आगमन झाले. ढोलताशांच्या तालात आणि डिजेच्या भल्या मोठ्या आवाजात बाप्पा आले होते. ज्यावेळेस मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेले आणि भक्तिभावाने नमस्कार केला. बाप्पाच्या भव्य मूर्तीकडे बघू लागले. मूर्ती खरोखरच खूप छान होती. पण हे काय? बाप्पांनी आपल्या भल्या मोठ्या सुपासारख्या कानांनी कान तर झाकून घेतलेच होते आणि डोळे देखील. ते पाहून मी म्हणाले-"बाप्पा! हे रे काय? कान आणि डोळे झाकून घेतल्यावर तुला कसे दिसणार? कसे ऐकू येणार? कसा दिसणार पृथ्वीवरती पडलेला दुष्काळ, कधी पाण्या अभावी तर कधी अतिवृष्टीमुळे तडफडणारे जीव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कसा दिसणार हा चाललेला भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, कसा ऐकू येणार साऱ्यांचा आक्रोश. "


   बाप्पा! हा तुझ्या मागचा पडदा सरकवून बघ ना. तुझ्या भक्तांचा पत्त्यांचा रंगलेला डाव, बाजूला पडलेल्या मद्याच्या बाटल्या, सिगारेटचा धूर, हे निरर्थक गाणे. तू तर विघ्नहर्ता, बुद्धीदाता मग हे रे काय?

बाप्पा किंचित हसला आणि म्हणाला -" ते त्यांची बुद्धी गहाण टाकणार, स्वतःच विघ्ने ओढवून घेणार, त्याला मी तरी काय करणार? मला हे दहा दिवस कसे पार पडतील असे झाले आहे. हो पण आता लवकरच घटस्थापना. आदिशक्ती जगन्मातेचे पृथ्वीवरती आगमन होणार. तिनेच कित्येक वेळा असुरांपासून

देवांचे सुध्दा रक्षण केले आहे. असुरांना ठार केले आहे. ती तर जगन्माता. आईपेक्षा लेकरांची काळजी जास्त कोण घेणार? तुझ्या मनातील तिला सांगितल्यावर सारी संकटे ती नक्कीच दूर करणार एवढे मात्र खरे. "

मी बाप्पाला नमस्कार केला. पण बाप्पाचे बोलणे मनातून जाईना.

    आता घटस्थापना उद्यावर येऊन ठेपली. मीआदिशक्ती जगन्मातेची प्रार्थना केली.

" ||सर्व मंगल मांगल्ये

 शिवे सर्वार्थ साधिके |

शरण्ये त्र्यंबके गोरी

नारायणी नमोस्तुते ||"


   दिवसभराच्या श्रमाने मी झोपेच्या आधिन झाले. स्वप्नात आदिशक्ती जगन्माता सिंहावर आरूढ होऊन आली. गोड हसली आणि म्हणाली - 

"मी दरवर्षी येते. सर्व भक्तांचे मागणे पूर्ण करते. तू देखील माग काय हवे ते."

मी पटकन म्हणाले -

" छे छे मला काहीही मागायचे नाही. फक्त तुला काही सांगायचे."

माता म्हणाली -

"तू मला सांगणार?" 

मी हो म्हणाले आणि सांगायला सुरुवात केली. 

  माते! तू जगन्माता, आदिशक्ती, साक्षात शक्तीचे रूप. देवांचे सुध्दा असुरांपासून रक्षण करणारी. नऊ दिवस नऊ रात्री युद्ध करून महिषासुराला ठार मारणारी. पण कधीकाळी सिंहावर आरूढ होणारी आदिशक्ती, जगन्माता, कालीमाता, रणचंडिका, दूर्गामाता होती हे खरेच वाटेनासे झाले आहे. तू अष्टभुजा नारायणी. पण तुझ्या आठही हातातील शस्त्रे आता शोभेची वाटायला लागली आहेत. दरवर्षी येतेस, भक्तांचे मागणे पूर्ण करतेस आणि निघून जातेस. पण पृथ्वीवरती माजलेले तीन असुर तुला कधी दिसलेच नाहीत. माता आश्चर्याने म्हणाली -

"पृथ्वीवरती असुर आणि तेही तीन."

"हो माते! तीन असुर. त्यांना आवर तुच घालू शकतेस. त्यांना आवर घालणे सामान्य माणसांच्या शक्तीपलीकडचे काम आहे. आता त्यांच्याशी युद्ध करायची वेळ आली आहे. हे तीन असुर म्हणजे -

 भ्रष्टाचारासुर, अत्याचारासुर, बलात्कारासुर


भ्रष्टाचारामुळे सामान्य जनता पिळून निघते आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार होतो आहे. अगदी क्षुल्लक कामासाठी सुध्दा पैसा चारावा लागतो. एकाच कामासाठी शंभर चकरा मारूनही काम होत नाही. भ्रष्टाचार करून साठवलेला पैसा कुठे दडवून ठेवला हे मात्र कधीच कळू शकत नाही.


अत्याचारासुरामुळे सुध्दा सारी जनता एका दडपणाखाली जगत आहे. खून, मारामारी, लुटमार, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यामुळे माणसे किडामुंगीसारखी मरत आहेत.


सर्वात माजलेला असुर म्हणजे बलात्कारासुर. उन्मत्त होऊन थैमान घालतो आहे. तुझेच रूप असणाऱ्या स्त्रीजातीवर

दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. स्त्रीची इज्जत वेशीवर टांगली जात आहे. त्यात दोन वर्षाच्या मुलीपासून तर प्रौढ स्त्रिया कुणीच सुटत नाही. बलात्कारासुर बलात्कार करूनच थांबत नाही तर त्यांना ठार मारून फेकून द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. ज्या दिवशी बलात्कार झाला नाही असा एक सुध्दा दिवस उजाडत नाही. रोज दैनिकात एक दोन तरी बातम्या असतातच. एवढा भयानक आहे हा बलात्कारासुर.

   

हे सारे ऐकतांना मातेच्या चेहऱ्यावर चिंता आणि क्रोध दिसू लागला.

"खरेच हे तीन असुर एवढे माजलेत आणि आपल्या लक्षातही आले नाही. आता परत रणचंडिका होऊन यावेच लागणार. या असुरांचा नाश आता अटळ आहे. त्यांच्याशी युद्ध करावेच लागणार."


सिंहारुढ अष्टभुजा नारायणीची मुर्ती ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत येत असताना दिसू लागली. मी मनोभावे हात जोडले. अचानक विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज कानावर पडला. सिंहाने दाही दिशा भेदून टाकणारी डरकाळी फोडली आणि जगन्मातेने विराट रूप धारण केले. तिच्या आठही हातातील शस्त्रे उन्हाने तळपू लागली आणि हातातील त्रिशूळ असुरांचा नाश करण्यासाठी आतूर होऊन पृथ्वीकडे झेपावला.


Rate this content
Log in