ठेच
ठेच
पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी खरसुंडी (ता आटपाडी) येथलं बालपण मला आठवते.श्री सिद्धनाथाच्या मंदिराजवळ डवरी गल्लीत भोसल्यांच्या धाब्याच्या वाड्यात आम्ही रहायचो.गावात वीज नसल्याने सायंकाळी कोतवाल रस्त्यावरच्या कंदील-खांबाची दिवाबत्ती करायचा. पिण्याच्या पाण्यासाठी देवाची विहीर १९७२ चे दुष्काळात देखील आटली नव्हती.
पंचक्रोशीतील सारे भक्तगण सिद्धनाथाचा वार रविवार,पौर्णिमा अन चैत्र व पौष जत्रेस भक्तिभावाने दर्शनासाठी गर्दी करत.या काळात साऱ्या पेठेत जागोजागी गुलालाने रंगलेल्या नारळाच्या केसराचे साम्राज्य असायचे.याच दिवसांत कोणाच्या ना कोणाच्या घरात हमखास प्रसाद म्हणून 'गोड-भांग' प्यायला मिळायची.सांगली किंवा आटपाडीसाठी फुफाटा उडवत जाणारी एखाद-दुसरी एसटी लांबूनच नजरेस पडायची.
हा भाग कोरडवाहू असल्याने सर्वत्र बाभळी,करंज,कडुलिंबाची झाडे असायची.गल्लीत खेळताना किंवा शाळेला जातांना आम्ही सारेजण अनवाणीच असायचो. मधल्या सुट्टीत घरी येताना सर्वत्र पांढरी माती असल्याने फुफाट्याने तळपाय भाजायचे. त्यामुळे धावत रस्त्यावरच्या झाडाच्या सावलीत थाबत यावे लागे.सर्वत्र पांढऱ्या मातीचे साम्राज्य असल्याने अगदी गुडघ्यापर्यंत धुळीने पाय माखायचे. गल्लीत प्रत्येकाच्या घराजवळ रस्ताच्या कडेला सरपण म्हणून काटेरी बाभळीची मोळी किंवा मोठा ढीग(फेस) पडलेला असायचा. त्यामुळे काटे किंवा काट्याची फांदर वाऱ्याने रस्त्यात हमखास पडलेली असायची.ठराविक कालावधी नंतर कितीही काळजी घेतली तरी खेळताना पायात काटा हमखास मोडायचा. शक्यतो स्वतः किंवा जोडीदाराच्या मदतीने पायात मोडलेला काटा काट्यानेच काढण्याचा प्रयत्न केल्याने 'काट्याने काटा काढणे' ही म्हण जणू आमच्याकडुन सत्यात उतरवली जायची.जर काटा काढण्यात यश आले नाही तर मात्र घरात पाऊल टाकताच केवळ आमच्या चालीवरुन ते घरच्यांना आपोआप लगेच समजायचे.मग रस्त्याने नीट बघून चालता येत नाही का?कुठं लक्ष होते? अशी बोलणी खात सुईने काटा काढण्याचा कार्यक्रम असायचा.पण काटा निघताच त्या जागेला जखम बरी व्हावी म्हणून सुईच्या टोकाने गरम गुळाचा चटका दिला जायचा.मात्र हा सारा प्रकार नकोसा वाटाला तरी त्याला पर्याय नसायचा.
कच्चा रस्ता असल्याने खेळताना किंवा चालताना आळीपाळीने एकतर कोणत्याना कोणत्या पायाच्या आंगट्यास हमखास ठेच लागायची किंवा गुडघा फुटायचा.त्यावेळी रस्त्याच्या कडेला कोणाच्याही अंगणातील रांजनाचे पाण्याने जखम धुणे किंवा दगडी पाल्याचा किंवा तुळशीचा रस चूरघळून जखमेवर लावला जायचा.दोन-तीन दिवस जखम ओली असल्याने लंगडत चालायचं. बऱ्याचदा बरी होत आलेल्या जखमेवर मार बसून किंवा खपली निघाल्याने रक्त भळभळायचे. दवाखान्यातील कम्पाउंडर कापसाने जोरात जखम पुसून काढताना व त्यावर आयोडिन टाकताच होणारी झनझन तो कोणत्या जन्माचा वैरी आहे असे वाटे.अगदी भीक नको पण कुत्रं आवर असे वाटून जायचं.त्याने बांधलेले ब्यांडेज दिवसभर सावरताना नाके नऊ येई.हे सारे असं असलं तरी पावलो-पावली ठेच ही बसणारच असे जणू अंगवळणी पडायचं.चुकून कधी जत्रेत चप्पल किंवा रबरी बूट घेतलाच तर मुळात वापरायची सवय नसल्याने बाहेर जाताना एकतर पायात घालायचच विसरायचं नाहीतर बाहेर जिथे चप्पल काढली तेथेच विसरुन येण्याची दाट शक्यता असायची.
पण तेच आजच्या पिढीकडे बघितलं तर जन्मल्या पासून ड्रेस नुसार आकर्षक सॉक्स तर असतात. पण बाळ पाऊले टाकायला लागण्या आधीच 'पिं-पिं' किंवा 'चिव-चिव' आवाज करणारे बूट,सँडल चे जोड तयार असतात.बालवाडीलाच लेदर-शु, स्पोर्टससाठी किंवा पीटी साठी वेगळे शूज तर कार्यक्रमास ड्रेस म्याचिंगप्रमाणे शूज मुलांना मिळतात.रस्त्यावर ना माती ना काटा शिवाय खेळाची मैदाने सुद्धा टर्फची,मग कुठली बसणार ठेच नी कोठे मोडणार काटा?
या पार्श्वभूमीवर आम्हाला वेळोवेळी बसलेली ठेच, ठोकर पुढील आयुष्यातील ठक्के-टोनपे खाण्यास उभारी देऊन गेले हेच खरे. पण आताच्या पिढीचे काय?
