ती
ती


ती आज सकाळी उत्साहातच उठली. आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे, काहीतरी नवीन करावे आजच्या दिवसात असे तिला उठल्या क्षणीच वाटले.ती रोजची चिडचिड करणारी, त्रस्त अशी वाटत नव्हती. ती आज स्वत:तच रमली होती. गालातल्या गालात हसत होती, काहीतरी आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलत होते. त्याला कारण होते रात्री तिला पडलेले स्वप्न... कॉलेज मधे मैत्रिणींबरोबर केलेली धमाल मस्ती, मनमौजी वागणे, भटकंती करणे.....घरी येऊन आई कडे खाण्याची फर्माईश करत लोळत पडणे.......किती आनंदी आणि हसरी होती ती ! तिचा हा दिनक्रम तिने स्वप्नात बघितला होता. ते पूर्वीचे मैत्रिणींबरोबर चे दिवस ती पुन्हा जगली होती म्हणून आज खरे तर ती अशी उत्साहात उठली होती नविन चैतन्य घेऊन जागे झाली होती.
पूर्वीच्या जोमाने ती भराभर कामे हाता वेगळी करत होती. ओठाने मैत्रीचें मधुर गाणे ती गुणगुणत होती, 'ही दोस्ती तुटायची नाय,ही दोस्ती तुटायची नाय'तशी अचानक ती थांबली, तिला छान मोगऱ्याचा सुगंध आला होता. ती लगेच मागच्या अंगणात गेली.तिथे टपोऱ्या फुलांनी मोगरा नुस्ता बहरला होता. तिला आश्चर्य वाटले..... हे तेच रोपटे होते जे तिने आवडीने माहेराहून आणले होते.... ते कधी येवढे मोठे झाले, असे बहारदार झाले तिला कळलेच नाही. तिने सम्पूर्ण बागेमध्ये नजर फिरविली, किती रंग- बिरंगी फुल झाडे होती तिच्या बागेत ! तीच तर रोज पाणी घालते मग तिला आज जे जाणवले ते या आधी का नाही जाणवले. याची तिला खंत वाटू लागली. ती विचार करू लागली हा मोगरा सुद्धा रोजच फुलतो मग त्याचा सुगंध असा थेट मनाला येऊन या आधी का नाही भिडला... तिने प्रेमाने त्याला कवटाळले तेव्हा तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.तिच्या ओठांवर नकळत हे गीत आले '
मोगरा फुलला, मोगरा फुलाला,
इवलेसे रोप लावियेले द्वारी,
त्याचा वेलू गेला गगनावारी.
हसतच तिने आपल्या पदरात काही फुलं तोडून घेतली.... घरात येऊन त्याचा छान गजरा गेला... आणि केसांमधे माळत आरशा पुढे उभी राहिली..... स्वतःकडे बघितल्या क्षणी तिला आश्चर्य वाटले. रात्री स्वप्नात बघितलेली ती आणि आत्ताची ती यात खुप फरक जाणवला... ती विचार करू लागली की सोळा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात आपण स्वत:कडे लक्षच दिले नाही का?. वय वाढत गेले तसे वजनही वाढले होते. चेहऱ्यावरची लाली केव्हाच लुप्त झाली होती. चेहरा निस्तेज आणि डोळ्यांखाली डार्कसर्कल स्पष्ट दिसत होती. कुणी बघितले तर स्पष्ट सांगेन की ही बाई चिडखोर आणि कटकट करणारी असेन म्हणून... ती लगेच कपाळावर हात ठेवत खुर्चीत बसली आणि स्वत:शीच बोलयलाच लागली.
"मी इतकी गुंतले का संसारात...मुलांचे, सासू-सासऱ्याचे,घरचे सर्व करण्यात की, माझे मी मलाच हरवून बसले." सर्वांच्या आवडी निवडींकडे लक्ष देता देता मला काय आवडते हे ही मी विसलले. काय आवडते मला...?
लग्नाआधी आईला म्हणायची "काय ग आई ,असे दिवसभर साडीमध्ये कसे ग वावरते तू? मी तर साडी वगैरे अजिबात नेसणार नाही. ड्रेसच घालत जाईन".पण आता स्वत: कडे बघीतले तर तिला आठवत देखील नाही की तिने शेवटचा ड्रेस कधी घातला होता. दोन -तीन वर्षा आधी तिच्या नवऱ्याने छान ड्रेस आणला होता तर केवढी चिडली होती ती ! म्हणाली होती, "तुम्हाला माहित आहे मी ड्रेस घालत नाही तरीही का आणला, गेलेत ना पैसे वाया, काही गरज होती का ड्रेस आणयची? " किती मन दुःखावले गेले होते त्यांचे आणि मुलीचे देखील, मुलीने ही समजून सांगितले होते. पण तिलाही चिडून गप्प केले होते.
सासू सासऱ्याने कधीच कुठल्या गोष्टीला मनाई नाही केली.कधी कशासाठी कुरकुर नाही केली. त्यांना हवे नको ते सर्व बघते.काही दिवस इथे तर् काही दिवस ते गावी राहून येतात........ विचार करता करता एकदम दचकली... माझ्या अशा चिडखोर स्वभावामुळे तर ते गावी जात नसावेत. तिला वाईट वाटले. माझीच माणसे जर माझ्या अशा स्वभावामुळे जर दूर जात असतील तर यापेक्षा दूर्दैवी गोष्ट नाही दुसरी. तिने लगेच फोन उचलला आणि गावी फोन लावला,"किती दिवस झाले तुम्ही गावी जाऊन यां ना आता परत खूप आठवण येते आहे तुमची" बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. असे फोन करून ती कधी त्यांच्याशी बोलली नव्हती.
आज पासून नव्या दिवसाची नाही तर नव्याने जगण्याची सुरूवात करणार होती ती...
तिने आज कपटातून तो ड्रेस काढला, छान तयार होऊन तो गजराही माळला आणि पुन्हा एकदा आरशापुढे उभी राहिली... मघाशीच्या चेहऱ्यात आणि आताच्या चेहऱ्यात खूप फरक जाणवला, ती आता चिडखोर, त्रस्त नाराज दिसत नव्हती. तर् आता चेहऱ्यावर तेज आणि समाधान दिसत होतो. ते बघून तिचे तिलाच अप्रूप वाटते... मुलगी आणि नवरा झोपेतून उठून बाहेर आले तेव्हा त्यांना आनंदाचा धक्का बसला, आश्चर्य वाटले त्यांना हा बदल बघून. मुलीने धावत जाऊन तिला मिठी मारली म्हणाली "मम्मा, कसली गोड दिसते आहेस गं!" तिने नवऱ्याकडे बघितले तर त्याच्याही ओठांवर एक गोड स्माईल होती.
इतक्या वर्षांची हरवलेली ती, आज तिला सापडली होती.
शोधियले मीच मला
माझ्या मनाच्या अंगणी
सापडले मीच मला
माझ्या किलबिलत्या अंगणी