Pandit Warade

Others

4.0  

Pandit Warade

Others

ती वाट बघत्येय - भाग ३

ती वाट बघत्येय - भाग ३

3 mins
12.2K


  भाग -३

        *(शुभांगीची कुंडली)*

 

    लिलाबाई! शुभांगीची आई, भल्या पहाटे उठून स्नानादी कर्म उरकून कुंडली घेऊन महाराजांकडे जायला निघाली. काल शुभांगीला शुभम सोबत पाठवले, परंतु मागच्या आठवडा भरात घडलेल्या काही घटनांनी ती रात्रभर झोपू शकल्या नव्हती. एकुलत्या एक मुली सोबत हे काय घडत आहे? याने ती खूप चिंताग्रस्त झाली होती. तिच्या सुखी संसारात हे काय नवीन विघ्न येऊ पाहत आहे? तिच्या जीवाला काळजी लागून राहिलेली होती. 


     लीलावतीला लग्नानंतर खूप दिवस मुलबाळ नव्हते. खूप नवस सायास, व्रत वैकल्ये, उपास तपस केलेत, आणि एका कन्या रत्नाचा जन्म झाला. पण तिला पुन्हा अपत्य होणार नव्हते. सर्वांना आनंद झाला. मुलगी तर मुलगी पण तिच्या नावा वरचा 'वांझोटी' शिक्का पुसला जाणार होता. शुभांगीला जन्म देऊन तिला कृतकृत्य वाटत होते. शुभांगी सव्वा महिन्याची झाली की लगेच तिची जन्म कुंडली रामदास महाराजां कडून बनवून घेतली होती. कुंडली प्रमाणे सर्व काही व्यवस्थित होते. फक्त लग्नानंतर एक विचित्र योग आहे, काही विचित्र घटना घडतील असे महाराजांनी सांगितले होते. ज्या वेळेस विचित्र काही घडेल त्या वेळेस कुंडली घेऊन यायला महाराजांनी सांगितलेले होते. म्हणूनच ती महाराजां कडे निघाली होती. 


    महाराज नेमकेच पूजा करून उठले आणि आपल्या बैठकीत आसनस्थ झाले. लीलावतीने आदर भावाने महाराजांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार केला अन् शुभांगीची कुंडली त्यांच्या समोर ठेवली.


    महाराजांनी कुंडलीचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलत होते. त्यांनी एक वेळ लीलावती कडे तर एक वेळ कुंडली कडे बघितले. सध्या घडत असणाऱ्या घटनांबद्दल विचारणा केली. लिलावतीने स्वप्नाबद्दल सांगितले. त्यावर..


   "अजून काही झाले नाही. घाबरण्या सारखे काही नाही. एक प्रेतात्मा स्वतःची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्या साठी तिच्या शरीराचा ताबा घेण्याची शक्यता आहे त्या मुळे तिच्या संसारात विघ्न येऊ शकतं, काळजी घ्यावी लागेल." असं महाराजांनी सांगितल्यावर लिलावतीचा चेहरा मुलीच्या काळजीच्या काजळीने काळवंडला.

    

   "घाबरण्याचे काही कारण नाही. आपण त्याचा बंदोबस्त करू. त्यासाठी मला तुमची जरा मदत लागेल. तुमच्या जावयाचे संपूर्ण नांव आणि जन्मदिनांक, जन्मवेळ लागेल आपण आत्ताच तयारी करू." महाराजांनी लिलावतीच्या चेहऱ्याकडे बघून तिला आश्वस्त करण्या साठी सांगितले. 


   "महाराज, माझ्याकडे तर सध्या ही माहिती नाही. कसं करावं?" लीलावती काळजी युक्त स्वरात विचारती झाली. 


   "आज मुहूर्त चांगला आहे. कुंडलीत आज शुभयोग आहे. आपल्याला चांगले यश मिळू शकते." म्हणत महाराज त्यांच्या जुन्या दप्तरात काही तरी शोधू लागले.


     शुभांगीच्या लग्नाच्या वेळेस मुहूर्त काढण्यासाठी ही सारी माहिती लिलावतीने महाराजांना दिलेली होती. कदाचित तो कागद सापडला तर आजचा मुहूर्त सार्थकी लागेल, असे महाराजांना वाटत असावे.


    कोणत्याही शुभकार्या साठी गावातील सर्वच लोकं महाराजां कडेच येत असत. लग्न, मुंज, बारसे, जावळ,यांचे मुहूर्त तसेच कुंडली काढणे यासाठी महाराज सर्वांना मदत करत. त्या साठी लागणारी माहिती लोकं एक कागदावर लिहून आणत असत, महाराज तो कागद जपून ठेवायचे. म्हणून महाराज आज शुभांगीच्या लग्नाच्या वेळेस लिलावतीने आणलेल्या माहितीचा कागद त्यांच्या दप्तरात शोधत होते.


    ती माहिती मिळाली तर काम मार्गी लागण्या साठी लागणारे बाकीचे साहित्य महाराजां कडे तयार होते. 

   

    असे काम करण्या साठी एक वेगळी खोली महाराजांनी बनवून घेतली होती. त्या खोलीत एक कालीमातेची मूर्ती बसवलेली होती. कवड्याच्या माळी, अंगावर घालण्या साठी भगवी कफनी, त्रिशूल, यज्ञासाठी यज्ञकुंड इ. साहित्य या खोलीत उपलब्ध होते. कागद सापडला की महाराज पूर्ण तयारीने कामाला लागणार होते. बघत बसण्यावाचून लीलावतीकडे दुसरे काहीही उरलेले नव्हते. महाराजांना हवा असलेला कागद सापडला. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाची झलक उमटली. महाराज जय्यत तयारीला लागले.


Rate this content
Log in