Pandit Warade

Others


4  

Pandit Warade

Others


ती वाट बघत्येय -२ (स्वप्न)

ती वाट बघत्येय -२ (स्वप्न)

4 mins 23.7K 4 mins 23.7K

 शुभम आणि शुभांगी लग्नाचा वाढ दिवस साजरा करून त्या दिवशी बालम टेकडीहून संध्याकाळी परतले. तिथल्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊनच. रात्री झोपतांनाही शुभांगीच्या डोळ्या समोरून तिथले ते नयन मनोहर निसर्ग सौंदर्य जात नव्हते. ड्राइविंग करून थकलेला शुभम बेडवर पडल्या बरोबर झोपी गेला.


    दुसऱ्या दिवसापासून त्यांचे जीवन पुन्हा पहिल्या सारखे सुरू झाले. शुभम नेहमी प्रमाणे ऑफीसला गेला. तिथे सर्व जण त्याच्या भोवती जमा झाले. त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या दुसऱ्या वर्षात करत असलेल्या पदार्पणाच्या शुभेच्छाही दिल्या. शुभमने तिथला सारा वृत्तांत कथन केला. 


    "काय? तुम्ही काल बालम टेकडीला जाऊन आलात?" एक सहकाऱ्याने आश्चर्य चकित होत विचारले. 


     "तुम्हाला तिथे काही वेगळा अनुभव नाही ना आला?" दुसऱ्याने विचारले. 


     "आमचा प्रवास अगदीच सुरळीत झाला. कुठेही काही अडचण नाही आली. फार मजा आली तिथे. तिथला तो निसर्ग खूपच सुंदर आहे. निघावसंच वाटंत नाही तिथून." शुभम प्रसन्नतेने सांगत होता.


     घरी आल्यावर शुभमच्या उत्साहात कमतरता नव्हती. शुभांगी जवळ बोलतांना त्याला ते मंदिर, तिथली मूर्ती, त्याने स्वच्छ केलेला परिसर डोळ्यासमोर जसाच्या तसा दिसायचा. शुभांगीला मात्र ती सुंदर स्त्री, तिच्यासोबत केलेल्या गप्पा आठवत होत्या. 'ती तिथे एकटी कशी रहात असेल?' हा प्रश्न सतावत रहायचा. शुभमला विचारून तिने एकदोन वेळेस शंका निरसन करून घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु शुभमला ती स्त्री दिसलीच नव्हती, शुभांगीला काहीतरी भास झाला असेल असे समजून तो तिला उडवून लावायचा.


    असे गोड आठवणीत दिवस भराभर निघून जात होते. शुभम ऑफिस कामात व्यस्त असायचा, मात्र शुभांगीला काहीही काम नसल्यामुळे बालम टेकडीची फारच आठवण यायची. विशेषतः त्या स्त्रीविषयी कुतूहल कधीही उफाळून यायचे, आणि ती बेचैन व्हायची. तिला पुन्हा त्या स्त्री कडे जावे असे वाटायचे, तिच्या सोबत बोलत बसावे वाटायचे. तो ऑफिसला गेल्या वर एक दिवस तिला करमेनासे झाले. त्या स्त्री ची आठवण खूप सतावू लागली. जेवणही गेले नाही तिला. संध्याकाळी शुभम घरी आल्यावर तिने चेहऱ्या वर हसू दाखवायचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्या वरची निराशा मात्र त्याच्या नजरेतून सुटली नाही. जेवण झाल्या वर त्याने विषय काढलाच. 


    "खूप दिवस झाले आपण वाडीला गेलो नाही." लालवाडी शुभांगीचे माहेर. भाऊबीजेहून आल्या पासून तिचे माहेरी जाणे झालेच नव्हते. तिला आता आठवण आली असेल असं वाटून शुभम म्हणाला.


    शुभांगीला काय करावे काही सुचत नव्हते. माहेरी जाऊन आल्यावर जरा बरे वाटेल असे वाटून तिने संमती दर्शक मान हलवली. येणाऱ्या शनिवारी, रविवारी वाडीला जायचा बेत पक्का करून दोघे बेडवर आडवे झाले. 


    रात्री उशिरा कधी तरी शुभमला जाग आली. उठून पाहतो तर शुभांगी शेजारी झोपलेली असूनही कुणाशी तरी गप्पा करत होती. स्वप्नात बरळत असेल असे समजून त्याने दुर्लक्ष केले. एक दोन दिवस ऑफिसला गेल्यावर शनिवारी दोघेही वाडीला मुक्कामी पोहोचले. सर्वांना आनंद झाला. पाहुण्यांना पाहुणचार झाला, आणि रविवारी सायंकाळी शुभम परत फिरला.


    शुभांगी माहेरी बऱ्यापैकी रमली होती. आठ दहा दिवस झाले होते. रात्री अचानक तिच्या आईला, शुभांगी कुणाशी बोलत असल्याची जाणीव झाली. आई कान देऊन ऐकत होती, परंतु तिथे फक्त शुभांगीचाच आवाज ऐकू येत होता. 


    "मला पण तुझी खूप आठवण येतीय गं. कधी एकदा तुला भेटेन असं झालंय गं मला." शुभांगी म्हणत होती.


    "....................."


    "हो ना. त्यालाच घेऊन येईल ना. एक दोन दिवसात मी त्याला बोलावणार आहे मला घ्यायला."


     "....................."


     "काय? येत्या पौर्णिमेला? काही विशेष आहे का तिथे?"


      "....................."


    "अस्सं? मग तर नक्कीच येईन. खूप खूप आवडेल मला तुझ्या लग्नाच्या वाढ दिवसाच्या त्या सोहळ्यात सामील व्हायला." शुभांगी अतिशय उत्साहित होऊन सांगत होती. 


    शुभांगीच्या आईने तिला न उठवता निघून गेली. ती जेव्हा उठली तेव्हा आईने चहा घेतांना रात्रीचा विषय काढला तेव्हा ती थोडी गडबडली, पण लगेच सावरली. 


    "अगं आई! मला काही आठवत नाही, पण कदाचित एखादं स्वप्न पडत असेल." तिला त्या स्त्री विषयी कुणा जवळ काहीच बोलायची इच्छा नव्हती.


    "पण तू स्पष्टपणे बोलत होतीस. कुणाला तरी कुण्या सोहळ्याला यायचं आश्वासनही दिलंस तू." आई बोलली.


     "नाही बाई, मला तरी नाही आठवत काही. जाऊ दे ना! 'रात गयी बात गयी' स्वप्नाच्या मागे कुठे धावत बसायचं?" ती त्या विषयावर चर्चा करू इच्छित नव्हती. हे आईच्या लक्षात आलं. आणि कपातल्या चहा बरोबर तो विषयही संपला.


    ठरल्या प्रमाणे एका शनिवारी शुभम तिला घ्यायला आला. रविवारी दोघेही तिथून निघाले. निरोप देतांना आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. 


    "जावई बुवा! काळजी घ्या माझ्या लेकराची. यावेळेस फारसी प्रसन्न नाही वाटली ती इथं राहातांना." सासूबाईंनी जावयाला हळूच एकांतात सांगितले. त्या दिवशीच्या स्वप्नाबाबतही सांगितले तेव्हा शुभमही विचारात पडला. तिथेही असंच काहीसं घडलं होतं, पण सासूबाई आणखी चिंता करत बसतील म्हणून तो त्यावर काही बोलला नाही.


    "ठीक आहे मामी! काही काळजी करू नका. तिथे गेल्यावर तिला एखाद्या डॉक्टरला दाखवून घेतो." सासूबाईला आश्वासित करून तो तिला घेऊन निघाला. 


    आई बराच वेळ चिंतायुक्त चेहऱ्याने अंगणात उभी होती. 'लेकीच्या भविष्यात काय काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक? कुंडलीत सांगितल्या प्रमाणे तर घडणार नाही ना काही?' तिची चिंता वाढली होती. नक्की काय सांगितले होते कुंडलीत? 'उद्या महाराजां कडे जाऊन यायला पाहिजे. तेच याचा उलगडा करू शकतील.


Rate this content
Log in