स्वप्न सत्य झाले
स्वप्न सत्य झाले
स्वप्न पाहणे माणसांचा शौक असतो. नुसती स्वप्न पाहणे काही उपयोगाचे नाही. कधी कधी हालाखीच्या परिस्थितीतली ही माणसे स्वप्न पाहतात. येईल त्या परिस्थितीवर मात करून, स्वप्न उराशी धरुन, ती पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात व त्याप्रमाणे त्यांचे प्रयत्न ही चालूच असतात.
अगदी लहान असताना मला शाळेत फी भरली नाही म्हणून वर्गातून बाहेर काढले होते. माझे शिक्षण घरीच शाळे शिवाय चालले होते. नंतर मला दुसऱ्या शाळेत घातले. हळूहळू वयाने वाढल्यावर समजून चुकले की पैशा करता शाळेपासून वंचीत झाले. तेव्हापासून मला एक सवय लागली होती. मला जे काही समजले ते मी माझ्या बरोबरच्या मैत्रिणींना, ज्यांना समजले नव्हते त्यांना, समजावून सांगत होते. शाळेत सर्वच जण असे करत होतो. त्यात काही वेगळे नव्हते.
पण अकरावी नंतर, कॉलेज मध्ये, हे दुसऱ्यांना समजावणे जास्तच फोफावलं. त्याच कारण म्हणजे कॉलेज मध्ये इंग्रजी माध्यमाची मुले कमी व व्हर्नाकुलर म्हणजे मराठी, गूजराथी, हिन्दी माध्यमाची मुले जास्त होती. त्यांना इंग्रजी बरोबर जमत नव्हतं. तेव्हा त्यांना समजवण्याचे काम मी करू लागले. म्हणतात ना, वासरात लगंडी गाय शहाणी, तशी माझी स्थिती होती.
त्यामुळे शिकवण्याची, दुसऱ्यांना पटवून देण्याची कला अवगत झाली व ती मला आवडू ही लागली.
कॉलेजमध्ये एक आंधळा मुलगा ही होता. त्याच्या करता लायब्ररीची पुस्तकं वाचायचं काम ही करू लागले. कॉलेजचे तास संपल्यावर आम्ही सगळी मुले जिन्यावर बसून एक एक जण त्या मुलाकरता वाचत होतो. तो ऐकत होता आणि त्यातच आमचा अभ्यास होत होता.
तेव्हा मनात एक स्वप्न रेखाटले, आपण शिक्षिका व्हायचे आणि शिकवायचे. गरिबांना मदत करायची. हे मी मनाशी बाळगुन होते. शिक्षण झालं, लग्न झालं, मुलगीही झाली, पण म्हणतात ना "इच्छा तेथे मार्ग" तसेच झाले. माझी इच्छा दांडगी होती. ती पूर्ण करायची नामी संधी आली. मी बी.एड. केले. शिक्षिका झाले. माझ्या शाळेतल्या गरीब मुलांना शिकवणीही देऊ लागले. जी मुले शिकवणीची भारंभार फी देऊ शकत नव्हते ती सारी माझ्याकडे येऊ लागली व मी जमेल तसे सगळे विषय त्यांना शिकवू लागले.
त्या मुलांमध्ये सुखवस्तू मुले ही येत होती. ती मला फी देत होती. अशा बऱ्याच मुलांना मी शिकवले. आज जगाच्या पाठीवर ती चौफेर पसरलेली आहेत. मोठ्या हुद्यावर कामे करतात. पण मी त्यांना विसरले नाही आणि ती मुले ही मला विसरली नाहीत. माझे स्वप्न साकार झाले. मला शिक्षण घेण्यास अतिशय त्रास झाला होता. एवढ्या त्रासाने आत्मसात केलेले ज्ञान मी दुसऱ्यांना देवून माझे ज्ञान वाढलेच पण स्वप्न साकार होऊन मनःशांती ही मिळाली.