Shobha Wagle

Others

4.5  

Shobha Wagle

Others

सर्वोत्तम संकल्प

सर्वोत्तम संकल्प

2 mins
739


लहानपणी माझी फी द्यायला दिरंगाई झाली म्हणून शाळेतून मला जबरदस्तीने घरी पाठवले होते. त्याचा राग म्हणून माझी शाळा बाबांनी बंद केली. ते मला घरीच शिकवू लागले. नंतर थेट मला पाचवीच्या वर्गात बसवले. गावात शाळा नव्हती म्हणून मला दुसऱ्या गावात शाळेला पाठवले. मी एकटीच मुलगी व बाकीचे मुलगे होते. अधून मधून मी पैसे वाचवण्या करता चालतच घरी यायचे. ती पोरं असायची पण कधी कधी ती रस्ता बदलून मला चुकवून जायची.


मग बाबांनी मला तालुक्याच्या मोठ्या शाळेत, आल्मेदा मध्ये, फोंडा गोवा येथे घातले. तेथे माझे सगळे ठीक होऊ लागले. सगळे गुरुजन आणि सहपाठी ही चांगले होते. त्यावेळी मोजक्याच मुली शाळेत जायच्या. त्यात माझा ही नंबर लागला. बाबांना मला खूप शिकवायचे होते. अकरावी झाल्यावर मला मुंबईला भाऊ वहिनीकडे पाठवले. वहिनीने मला तिच्या हाताखाली काम करायला म्हणून बोलवले. मी मात्र माझ्या पुढील शिक्षणाची स्वप्ने पाहू लागले.


पण नियतिने वेगळेच ताट मांडले. मी नापास झाले. पण बाबांनी जिद्दिने अभ्यास करायला लावला. मी ही जिवाच्या आकांताने अभ्यास केला आणि ओक्टोबर मध्ये उत्तम गुणांनी पास झाले. राहिलेल्या सहा महिन्यात मी टायपिंग शिकून चाळीस शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट व शॉर्ट हॅन्ड चे १२० शब्द प्रति मिनिट हे ही हाशील केले. तीन वेळा एस.कुमार या कंपनीत स्टेनोच्या पदासाठी मुलाखती दिल्या पण मला ग्रेजुयेट व्हायचेच होते. माझा रस स्टेनोच्या नोकरीत नव्हता. नोकरी पक्कीच होती पण मी डिग्रीला जास्त महत्त्व देते हे त्यांना कळून चुकले. नंतर पार्ले कॉलेज मधून बी ए. डिग्री घेतली.


शाळेतुन मला बाहेर काढले होते त्यावेळी मला काही समजले नव्हते कारण चार वर्ष हे वय काही समजण्याचे नव्हते. पण बाबांची मला शिकवण्याची जिद्द मला बऱ्याच उशीरा कळली. सगळ्या माझ्या बरोबरच्या मुली शाळेत जास्त जात नव्हत्या. लांबच्या शाळेत तर मुळीच नाही. जेव्हा बाबांचा उद्देश लक्षात आला तेव्हा मला शाळेतून फीच्या कारणाने हाकलले हे कुठेतरी मनात टोचू लागले आणि मनाने निर्णय घेतला की आपण शिकून शिक्षकच व्हायचे आणि मुलांना शिकवायचे. बी.ए.च्या शेवटच्या वर्षी लग्न झाले. एका वर्षाच्या मुलीला चुलत सासू साऱ्यांकडे सोपवून सांताक्रुजच्या गांधी शिक्षण भवन मधून बी.एड.केले.


मी बी .ए. झाले तेव्हा बाबा पेढे घेऊन माझ्या सासरी आलेले होते. माझ्या पेक्षा बाबांनाच आनंद जास्त झाला होता. बी.एड.च्या फायनल परिक्षेच्या वेळी बाबा गेले पण जिद्दी मुलीला भरपूर आशीर्वाद देऊन गेले. त्याच्या पुण्याईनेच मी शिक्षण क्षेत्रात कार्य केले. बऱ्याच होतकरू हालाखीच्या परिस्थितीतल्या मुलांना ज्ञानार्जन केले.

आता निवृत झाले तरी शिक्षणाच्या कार्याशी जोडून ज्ञानार्जन करतच आहे. माझा संकल्प ज्ञानार्जनाचा सर्वोत्तमाचा सिध्दीस गेला. अजूनही होईल तितका मी तो देतंच राहीन.



Rate this content
Log in