सणाची आठवण
सणाची आठवण


माझं शाळेय शिक्षण गोव्याला झाले. पुढील शिक्षणास मी मुंबईला आले. नंतर कॉलेज, लग्न आणि नोकरी सगळं मुंबईतच. परत कधी योग आलाच नाही की गणेश चतुर्थीला गोव्याला जाऊ.
मी लहानपणी अनुभवलेला गणेश चतुर्थी सण अजुनही आठवतो. गावी सगळं कसं शांत असायचं. पण गणेश चतुर्थीला सर्वांच्या आनंदाला उधाण यायचे.
बहुतेक दिड दिवसाचा बाप्पा आसायचा. सार्वजनिक वगैरे हे शहरात असायचे पण गावात प्रत्येक घरा घरांत बाप्पा बसायचे. दिड दिवसाच्या सणाला मात्र तयारी भरपूर असायची. घराची, घरासमोरील अंगणाची साफ सफाई असायची. रंगिबेरंगी पताका व सुशोभित आसन सजावट बाप्पा करता,माटोळीची तयारी वगैरे असायची. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी ओझी, वेगवेगळे खाद्य पदार्थ फळे,भाज्या,फटाके वगैरे पाठवणे असायचे. अजुनही प्रथा चालत आहे म्हणा. दिवाळीत जेवढे फटाके वाजवत नाहीत त्याहुन जास्त फटाके गणपतीला लावतात. नैवेद्याला गोड गोड पदार्थ असायचे. नारळाची खिरापत तर असायचीच.
सकाळ संध्याकाळ सगळीकडे बाप्पाच्या आरतीचा गजर. सगळा गाव बाप्पाच्या सणाने आनंदी अन् उत्साही असायचा. पाहुण्यांचे एकमेकाकडे येणे. सगळीकडे आनंदी आनंद आणि प्रसन्न वातावरण. दिड दिवसांचा सण पण आनंद द्यायचा संपुर्ण वर्ष पूरेल इतका.
विर्सजनचा सोहळा शांत आणि भक्तीमय असायचा. बाप्पाचा नामाचा गजर पुढच्या
वर्षी लवकर या म्हणून आळवणे खरंच एक भावूक दृष्य असायचे.
एवढी वर्षे मुंबईत घालवली तरी मनाच्या कोपऱ्यात गावचा गणपती घर करून राहिलाय आणि तो कायम राहील. बालपणातले ते सुखद क्षण गणेश चतुर्थीला घालवलेले विसरणे अशक्यच आहे.