संक्रांत
संक्रांत
आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण मोठा असतो अगदी घरोघरी तो साजरा केला जातो. छान थंडीचे दिवस असतात धुंधुरमास चालू असतो शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी गुळपोळी, तिळगुळाचे लाडू ,अंगाला उटणे लावायला तीळ, आंघोळीच्या पाण्यात तीळ ,आंघोळ करताना तिळकूट अंगाला लावायचं फार छान आणि स्मुथ त्वचा होते .
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी नावाचा प्रकार असतो त्याचा मेनू पण खूप छान असतो तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, म्हणजे या सीझनमध्ये येणाऱ्या साऱ्या भाज्या ओले वाटाणे, हरभरे, गाजर, पावटा ,पापडी, बोर ,वांगी साऱ्यांची एकत्र भाजी करायची आणि त्यात तिळकूट घालायचे, सोबत मुगाची डाळ घातलेली खिचडी आणि वर तुपाची धार असा अप्रतिम मेनू असतो .
त्या दिवशी एखाद्या सवाष्णीला आपल्या घरी बोलावून न्हाऊ ,माखू घालायचे वरील सार्या मेंन्युचे जेवण वाढायचे व जाताना विडा बनवून द्यायचा म्हणजे थोडक्यात सवाष्ण स्त्रियांनी त्या दिवशी वरील गोष्टींचा उपभोग घ्यायचा. शिवाय भोगी आणि संक्रांत या दोन्ही दिवशी विडे घेणे हा प्रकार असतो ते कुणाचे पाच असतात ,कोणाचे सात असतात ,म्हणजे एका चादरीवर पानाचे विडे मांडायचे त्यावर खारका सुपारी खोबरं बदाम असं ठेवायचं आलेल्या सवाष्णींची डाळ-तांदूळाने ओटी भरायची आणि प्रत्येकीच्या ओटीत एकेक विडा घालायचा. मग दुसर्या दिवशी संक्रांत, संक्रांतीला सकाळी गुळ पोळीचा नैवेद्य आणि दुपारी गावातील झाडून साऱ्या बायका विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडत . त्याला देवाला "ओवसणे" असे म्हणतात या दिवशी पाच छोटी मडकी त्याला "सुगड "असे म्हणतात त्याच्यावर छोटी-छोटी पाच बोळकी(मातीची एकदम छोटी भातुकलीच्या खेळा सारखी मडकी) त्यामध्ये प्रत्येक मडक्यात शेतात आलेला रानमेवा भरायचा, म्हणजे जसे की हरभऱ्याचे घाटे, वाटाण्याच्या शेंगा, ओल्या भुईमुगाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, वांग्याच्या फोडी, गाजर, तीळ आणि गुळ ,उसाचे कापलेले बारीक बारीक तुकडे ,ज्याला मुंबईत "गंडेरी "तर गावाकडे उसाचे "करवे "बोलतात. असं सर्व भरायचं आणि पदरामध्ये दोन सुगडी एकावर एक ठेवायचे त्याच्यावर पणती ठेवायचे व त्याच्यावर छोटे बोळके ठेवायचे आणि देवाला यायचे ते ते सुगड देवापुढे ठेवायचं आणि तिथे असणारा दुसरा उचलून घ्यायचं किंवा दोन सवाष्णींनी एकमेकीच्या सुगडाची आदलाबदली करायची एकमेकीला हळदी कुंकू लावायचं डोक्यावरती अक्षदा
टाकायच्या आणि
" सक्रातीचा ववसा
जलमभर ववसा"
याचा अर्थ तू जन्म भर सवाष्ण रहा असा आशीर्वाद एकमेकीला द्यायचा
पांडुरंगाच्या देवळापासून ते खाली पारा पर्यंत पूर्ण रस्त्यावर बायकांची झुंबड आणि रस्त्यावर कुठेही त्या एकमेकीला हळदी कुंकू लावत उभ्या असायच्या, हे दृ
श्य बघायला खूप छान वाटायचे
त्यातून एखादी माहेरवाशिण जर पहिल्यांदा संक्रांतीला माहेरी आली असेल तर तिच्या सासरहून वोवसा यायचा त्या ओवशात हळदी कुंकू, गुळाच्या पोळ्या, वरील सर्व भाजी चे सामान, तिळगुळाचे लाडू व नवीन नवऱ्यामुलीला हलव्याची साडी व हलव्याचे दागिने पाठवतात.
या काळामध्ये काळे कपडे आवर्जून घातले जातात .हलव्याची साडी म्हणजे काळी साडी व तिच्यावर काटेरी हलव्याची सारखी नक्षी , शिवाय पहिल्या संक्रांतीला त्या मुलीची हौस म्हणून तिला अंगावर मुगुट, बिंदी, कंबर पट्टा ,वाकी, बांगड्या, मंगळसूत्र नेकलेस ,कानातले, अंगठी हे सर्व दागिने हलव्या पासून बनवले जातात व ते तिच्या अंगावर घालतात हे पाहण्यासाठी इतर स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलावतात, आणि त्या मुलीचे कौतुक करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे नव्या नवरीने पहिल्या वर्षी हळदीकुंकू दुसऱ्या वर्षी आरसा- कंगवा ,तिसऱ्या वर्षी नारळ , चौथ्या वर्षी खिचडी चे सामान आणि पाचव्या वर्षी बांगड्या अशी वाणे किंवा सोभाग्य वायने सौभाग्यवती स्त्रियांना वाटली जातात. त्याला वाण लुटणे असे म्हणतात इतर स्त्रिया देखील त्या दिवशी सौभाग्य वायने किंवा काही एखादी उपयुक्त वस्तू लुटतात
लहान मुलांची देखील पाच वर्षापर्यंत संक्रांत साजरी केली जाते त्याला बोरन्हाण असे म्हणतात . त्यामध्ये लहान मुलाला मधी बसवायचे , त्याच्याच वयाची इतर मुले बोलवायची त्या मुलाच्या डोक्यावरून लाह्या, बत्तासे, बोर, चॉकलेट ,शेंगदाणे रेवडी इत्यादी वस्तूने त्याला नहाण घालायचे व त्या वस्तू बाकीच्या मुलांना खाऊ म्हणून वाटायच्या. तसेच त्या लहान मुलांना हलव्याची वाडी देखील घालायची म्हणजेच मुगुट ,मनगट्या, गळ्यातील हार ,इत्यादी कधी कधी ती लहान मुले त्यातील हलवा दाताने तोडून तोडून खातात ते बघण्यास मजा येते.
त्यादिवशी पर्वकाळ असतो तिर्थक्षेत्रा वरती लोक स्नानासाठी जातात. जपजाप्य करतात संक्रांतीचे वाचन करतात ती कोणत्या वाहनावरून येते ,काय खाते ,कोणत्या दिशेला पाहते, तरुण आहे की वृद्ध आहे, की लहान मूल आहे यावरून काही आडाखे बांधले जातात पैकी ति ज्या रूपात येते हे त्या लोकांवर संक्रांत असते एखाद्यावर संकट येणार असले, की त्याच्यावर संक्रांत झाली असे म्हटले जाते. ती जे वस्त्र परिधान करते ते महाग होते ती ज्या दिशेला बघते त्या दिशेला अतिवृष्टी अवर्षण भूकंप इत्यादी गोष्टी होतात असा समज आहे.
हा सण देखील तीन दिवसाचा आहे आदल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत त्यादिवशी भोगीची ठेवलेली भाकरी खातात मात्र त्यादिवशी कोणतेही शुभ काम करायचे नाही त्याला कर असे म्हटले जाते तसेच त्यादिवशी तिळगूळ देत नाहीत पुढे रथसप्तमीपर्यंत वरील हळदी-कुंकवाचा प्रकार चालतो