संघर्ष संकटांचा
संघर्ष संकटांचा


सटवाईच्या दिवशी म्हणे आपलं भविष्य लिहिलं जातं. खरं खोटे देव जाणे पण आपण बघतो काही माणसांना सहज यश मिळून जातं तर काही जणांना महा प्रर्यत्नांनी ते मिळवावं लागतं.
काहीच्या नशिबात संकटे एकावर एक कोसळतात. एकाच निवारण करावे तर दुसरे हजर अशा वेळी तो माणूस त्या संकटांची पर्वा करत नाही. ती संकटेच त्याल खंबीर बनवतात. आणि आलेल्या प्रत्येक संकटाला तो धैर्याने सामना करतो आणि जय मिळवतो.
माझे नशीब ही तसेच म्हणा. लहानपणी शिक्षणापासून वंचित केल्याने महा लढा देऊनच अत्यंत कष्टमय बालपण गेले. ज्या वयात खेळायचे बागडायचे त्या काळी वयाला न झेपणारी सुध्दा कामे केली. मोठ्या जिद्दिने मॅट्रिक परीक्षा पास झाले. त्या नंतर कॉलेजला मुलीना जायची गरज नाही ह्या हुद्यावरुन तंटा वाद निमाण झाले तरी त्यावर मात करुन बी. ए. ची पदवी मिळवली. वडील सांगेल त्या मुलाशी लग्न गाठ बांधून घेतली. लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असे मानून पदरी पडलं पवित्र झालं. लग्ना नंतर तरी सुख कमी त्रासच जास्त जुन्या काळचे परंपरा सोवळं ओवळं जीव नकोसा झालेला. त्यावर ही मात केली.
नोकरी सहज मिळाली पण तेथे खूपच अडचणी आल्या पण पर्वा केली नाही देवावर विश्वास व कर्तबगारीच्या दृढ विश्वासाने त्यावर ही मात केली. मुलीनी मात्र सुख दिले आणि त्या एकाच आनंदाने आज पर्यंत धग धरलेली आहे. मोठी दहवीला असतानाच नवऱ्याची नोकरी म्हणजे कंपनी बंद पडली. दुसरी शोधली नाही आज ना उद्या कंपनी सुरू होईल ह्या आशेवर राहीले.
माझ्या एकटीच्या कमाईवर म्हणजे शाळा आणि शिकवणीवर सगळे निभावले. पोरी ही गुणी कधी हट्ट नाही की काही मागणे नाही देईल त्यात समाधानी. दोघी मुली हुशार निघाल्याने एक डॉक्टर तर दुसरी आर्किटेक्चर झाली. येईल त्या संकटांचा सामना करत दोन्हीची लग्न लावली. ती ही कुंडली पत्रिका जुळवा जुळवीने.
एक सारखी संकटें येऊ लागली की देव सुध्दा परीक्षा घेत असतो असे वाटते. मी सगळ्या त्याच्या परिक्षा पास झाले. आता म्हातारपणी ही संकटाची माळ चालूच आहे पण मी त्यांची अजिबात पर्वा करत नाही. ती नाही आली तर चुकल्या सारखे वाटते. आहे त्यात आनंदी राहायचे आणि जमेल तेवढे सत्कार्य करायचे पुढचा जन्म असेल तर त्यात संकटे अजिबात नसतील असे समजायचे.