समाधान
समाधान


ही गोष्ट आहे एका गावातील शिक्षिकेची. लग्न झालं तिचं. दोन मुली पण झाल्या. मुली हुशार, समजूतदार. पण छान चाललं असतांना कुठंतरी माशी शिंकली. तिचा नवरा राहत नव्हता तिच्याबरोबर. मुली रोज विचारायच्या बाबा कधी येणार? आईकडे उत्तर नसायचे या प्रश्नाचे. अचानक हुक्की आली की यायचा तिला आणि मुलींना भेटायला. जसं मुलींना कळायला लागलं काहीतरी बिनसलंय घरात आपल्या, तेव्हा त्यांनी साऱ्या गोष्टीचा नादच सोडून दिला. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
मोठीचं नाव मीरा आणि शकू होती धाकटी. दोघींनी दहावीची जय्यत तयारी करून चांगले मार्क्स मिळवले. बारावीनंतर इंजिनीयरिंग केलं. चांगल्या पगाराच्या नोकरीत होत्या दोघी. आयटी इंडस्ट्रीमध्ये. दोघींची लग्न लावून दिली आईने. आईला खूप हायसं वाटलं. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपण मुलींना मोठं केलं, शिकवलं ह्याचं समाधान होतं तिला. शकू तर परदेशात स्थायिक झाली. तिच्या बाळांचे संगोपन करायला तिने आईला परदेशी बोलवून घेतले. परदेशगमनाची तिची इच्छा पण पूर्ण झाली. मीराला इकडे दोन मुली झाल्या. तिचे सासू सासरे काळजी घेत होते. मुलींची ती नोकरी करायची म्हणून. पण दुर्देवाने पुढे तिची नोकरी गेली आणि घरात खटके उडायला लागले.
शेवटी तिने नवरा आणि मुलीबरोबर घर सोडण्याचा निर्णय घेतला. कंटाळा आला होता तिला आपल्या गरीब स्वभावाचा कोणीतरी फायदा घेतंय ह्याचा. थोडी आर्थिक चणचण जाणवू लागली घरात तेव्हा. तिला चार महिन्यांनी परत नोकरी मिळाली. संसाराची गाडी परत हळूहळू रूळावर येऊ लागली. मीराचं नीटनेटकं चाललं म्हटलं की आईला परत हायसं वाटलं. चिंता दूर झाली तिची. एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर आलं होतं. आपली मेहनत सफल झाल्याचं...