श्रीमंत भिकारी
श्रीमंत भिकारी
कोणे एकेकाळी राजा अमरसिंह प्रतापनगर राज्यावर राज्य करत होता. तो त्याच्या राज्यातील गोर-गरीबांना नेहमीच दान करत असे. राज्यातील कुलदैवतेच्या मंदिरात तर राजा नेहमीच स्वहस्ताने शिधा वाटप करी. राजाच्या सात पिढ्यांपासून हा वारसा चालत आला होता जो राजा आता पुढे चालवत होता. राजा या कामात अजिबात खंड पडू देत नसे. पण राजा हे दानधर्माचे कार्य खूप गर्वाने करत असे. आपल्या पूर्वजांची परंपरा आपण चालवतो या अहम् पुढे तो गरीबांना कस्पटासमान लेखत असे.
एकदा झाले असे की गणेश चतुर्थीच्या दिवशी राजा कुलदैवतेच्या मंदिरात दान करत होता. एका गरीब बाबांच्या पुढ्यात अन्नाची थाळी ठेवून राजा निघणार तोच त्या गरीब बाबांनी राजाच्या चरणांना हाताने स्पर्श करत धन्यवाद दिले. ते गरीब बाबा राजाला अनेक वर्ष दानाचे पुण्याचे काम करताना बघत होते आणि त्यांनी राजाला देव मानले होते. पण गर्विष्ठ राजाला हे सहन झाले नाही. त्याला त्या स्पर्शाची शिसारी आली आणि तो ताबडतोब तिथून निघून गेला. त्याने गरीब बाबांची राज्यातून हकालपट्टी केली. प्रकांडपंडीत बोलावून त्याने शरीरशुद्धीचा घाट घातला.
पुढे अनेक वर्षांनी प्रतापनगरावर शत्रूने हल्ला केला आणि राजा अमरसिंह पराभूत झाला. निर्दयी शत्रूने राजपरिवाराला अक्षरशः हाकलून दिले. राजाचा रंक झाला होता. पण करणार काय. कित्येक मैल प्रवास करुन राजा एका गावात पोहोचला. पहिल्याच घरात आसरा मागू लागला. आतून एक माणूस बाहेर आला. राजाने त्याला आपण कोण, कुठून आलो वगैरे सांगितलं. तो माणूस हसला आणि त्याने राजाचे स्वागत केले. त्याच्या बायकोने सुग्रास स्वयंपाक बनवून राजाला आणि परिवाराला वाढले. जेवणं उरकून राजा व तो मनुष्य ओटीवर बोलत बसले होते. राजा त्या माणसाने जे काही सांगितले ते ऐकून हादरला.
तो माणूस तोच गरीब बाबा होता. राज्यातून हकालपट्टी झाल्यावर तो शेजारच्या राज्यात जाऊन राहिला. मोलमजुरी करुन काबाडकष्टात दिवस काढले. पै न् पै जोडून घर बांधलं. लग्न झालं. मुलं झाली. हे सर्व ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी तरळलं. आपण किती चुकीचं वागलो हे त्याला कळून चुकलं. राजाने त्या माणसाची पाय धरुन माफी मागितली. त्या माणसाने राजाला थांबवत म्हटले की, मला तुमचा राग कधीच आला नव्हता. उलट मी तुम्हाला नेहमीच देव मानले आहे. तुम्ही इतक्या काटेकोरपणे दानधर्म निभावलात.
