श्रावणातील आठवणीचा पाऊस
श्रावणातील आठवणीचा पाऊस
नमस्कार!
आयुष्यात प्रत्येकाने पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद तर अनुभवलाच असेल. पावसाळा म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी शाळेतील लहानमुलांपासून, वयस्कर व्यक्तिपर्यंत ते बळिराजापर्यंत पाऊस हा सर्वांना प्रिय असतो. आपल्या आयूष्यात पण पावसाचा खूप मोठा वाटा आहे. पावसाचे आणि धरणी मातेचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे पहिल्या पावसाची चाहूल लागताच उन्हामुळे रखरखीत तापलेली भूमी पावसाच्या एका थेंबाने सुद्धा सुखावते. पावसामुळे झाडे, वनस्पती, वेली, नद्या पण सुखावतात हे काय वेगळे सांगायला नको! पावसात गरमागरम कांदाभजी, मक्याचे कणीस भाजून खाणे, टपरीवरचा चहा पिणे यांसारखे दुसरे स्वर्गसुख काय असते!
पावसाची आतुरता प्रत्येकाच्या मनात असते अगदी बेडूक दादाच्या सुद्धा! पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध मनाला मोहित करतो. प्रत्येकाची पावसाची काही ना काही सुंदर आठवण असते तशीच माझी पण आहे. बालपणापासून पावसाळ्यातील तशा भरपूर आठवणी आहेत पण काही आठवणी आपल्या मनात घर करून जातात व सुखद क्षणांची आठवण करून देतात.
लहानपणी आमच्या घराशेजारी तलाव होता त्यामुळे पावसाळ्यात तो ओसंडून वाहत होता व सर्व पाणी रस्त्यावर आले होते आणि त्यात काही मासे पण होते. आम्ही लहानग्यांनी मिळून इवल्या इवल्या हाताने ते मासे पकडले होते व घरी घेऊन आलो होतो. पावसाळ्यातील एक न विसरणारी आठवण म्हणजे गावी रानातली. दोन वर्षांपूर्वी मी, माझी आई व बहिण गावी गेलेलो. माझ्या आईचे जमीनीचे थोडे काम होते व आजोबांना पण खूप वर्ष भेटलो नव्हतो म्हणून पहायला गेलेलो.
७-८ तासांच्या एसटीच्या प्रवासानंतर आम्ही सकाळी ६ वाजता गावी पोहचलो. एसटीमधून सकाळचे दृष्य पाहण्यासारखे होते. रिपरिप पाऊस पडत होता ज्याचे थेंब काचेवर जमा होत होते. थंडगार वारा वाहत होता म्हणून बोचरी थंडी वाटत होती पण त्या गार वाऱ्याने एसटीमध्ये माझी छान डुलकी निघाली. माझे गाव सातारामध्ये येते त्यामूळॆ पावसाळ्यात विचारूच नका एवढी हिरवळ असते. थोडया थोडया अंतरावर लहान कौलाची घरे, विहिर, ऊसाची, भुईमूगाची, धान्याची पिके. कूठे छोटा ओढा, पाट, नदी अगदी विलक्षण देखावा!
गावी पोहचल्या पोहचल्या आजोबांकडे गेलो. आजी आजोबांसोबत मस्त कडक आल्याचा चहा घेतला. वातावरण पावसाने थंड झाल्याने मी व माझी बहिण गोधडीत शिरलो. आजीने स्वताच्या हाताने बनवलेले ते कपडयाचे पांघरून अतिशय मऊ व उबदार होते ज्याने थंडी कूठच्या कूठे पळून गेली.
थोडया वेळॆत आम्हाला जाग आली. दुपारचे जेवण वैगरे करून मनमुराद गप्पा मारत बसलो. मी विचारले, "आबा आता आम्ही गावी आलोच आहोत तर रान पहायला जाऊया का? " मी असे विचारल्यानंतर बहिणीने पण मागून सुर ओढला. तिलाही आमचे शेत पहायची खूप ईच्छा होती. आमच्यामूळॆ आईने पण रान पहायचा हटट् धरला. तर अशाप्रकारे आमचा रानात जायचा विचार पक्का झाला.
संध्याकाळ होत आलेली. ४ वाजताच्या सुमारास आम्ही घराबाहेर पडलो. आईने सोबत छत्री घेतलेली तर आजीने रानात बसून खायला थोडया भूईमूगाच्या शेंगा, लहान लहान कवळॆ मक्याचे कणीस, सोबत लाल चटणी, दही आणि भाकरी. आता हे सर्व आठवून माज्या तोंडाला पाणी सुटले. गावी रानात जेवण करायची मजाच काय वेगळी असते.
आम्ही सर्व चालत चालत गावाच्या वेशीजवळ आलो तिकडून रान काही अंतरावरच होते. काही ओळखीच्या लोकांना नमस्कार केला. आजोबांनी सोबतीला पाळलेली एक म्हैस आणि तिचे रेडकू घेतलेले. आजोबा त्यांना चारा खाण्यासाठी घेऊन आलेले. आजोबांनी जाताना माझ्या लहान बहिणीला त्या म्हशीच्या पाठीवर बसवले होते व ती खूप घाबरत होती जे आठवले की मला आताही हसू येतं. चालता चालता माझे अचानक वर लक्ष गेले आणि पाहते तर काही झाडांवर काळ्या पिशव्या लटकल्या आहेत पण आणखी जवळ गेल्यावर लक्षात आले की त्यावर वटवाघळॆ उलटे लटकलेली.
थोडे अंतर पार करत करत आम्ही शेताच्या दिशेने पोहचलो. गावच्या भाषेत त्याला वावर असे म्हणतात. पाऊस तसा पडत नव्हता पण ढग दाटून आलेले पावसाची शक्यता वाटत होती. शेताजवळ आल्यावर समोर पाहून मी तोंडाचा चंबू केला. मी व बहिण रान तोंड आ वासून पाहत होतो. चोहीकडे शेत बहरून आलेले. शेतात झेंडूची पिवळी व नारंगी फूले उमललेली. काही शेतात ऊस, हरभरा, भुईमूग, कांदे इत्यादी भाज्यांची पिके होती. बाजूलाच मोठे वडाचे व जांभळाचे झाड होते. जांभळाच्या झाडाखाली भरपूर जांभळॆ पडलेली जी आम्ही टोपलीत जमा केली.
आम्ही सर्व मग त्या वडाच्या झाडाखाली बसलो. चालून खूप भूक लागलेली म्हणून आजीने घरून आणलेली चटणी व भाकरी काढली. तूम्हाला विश्वास नाही बसणार कदाचित पण ती चटणी भाकरी व त्या चटणीत थोडे दही टाकलेले खूपच चविष्ट लागत होते. अजूनही त्याची चव माझ्या जिभेवर रेंगाळतेय. रानात झाडाखाली बसून खाल्लेल्या त्या चटणी भाकरीची चव कूठल्याच बर्गर, चायनिस, पिझाला येणार नाही.
चटणी भाकरी फस्त करून आम्ही ऊस पण तिकडेच बसून खाल्ले. थोडया वेळॆत सुर्यास्त होऊ लागला. आकाशात वीज चमकू लागली व ढगांचा गडगडाट होऊन सरी बरसू लागल्या. आम्ही त्वरीत घरी जाण्यास निघालो. रानात असल्याने पावसामूळॆ मातीचा खूप सुगंध येत होता जे मी आता शब्दात वर्णन करू नाही शकत.
घरी आल्यानंतर आईने व आजीने मिळून चूलीवर जेवण केलेले ज्याची चव पण अफलातून होती. अशाप्रकारे दोन दिवसांनी पावसातील त्या आठवणी सोबत घेऊन आम्ही घरी परतलो. माझी पावसाळ्यातील सर्वात सुंदर आठवण म्हणजे मी कॉलेजला असतानाची. मी इंजीनीयरिंगला दुसऱ्या वर्षाला असताना मी आणि आमचा ग्रुप कॉलेज जवळच्या धरणावर गेलेलो. तर झाले असे नेमके त्याच दिवशी आमचा तिसऱ्या सेमिस्टर्सचा निकाल लागणार होता त्यामुळे काही जण खुश होते तर काहींच्या मनाला केटी लागेल याची धाकधूक लागलेली.
शेवटी निकाल लागला व सर्वजण पास झाले त्यामुळे सर्वांनाच आनंद झालेला. आम्ही एकमेकांचे अभिनंदन करत कँटिनमध्ये बसलो व गरमागरम झणझणीत मिसळ पावावर ताव मारला व अशाप्रकारे सर्वांनी धरणावर जायचा प्लॅन बनवला. माझे कॉलेज तसे शहरापासून थोडे लांब असल्याने तिकडे गावच्यासारखे निसर्गरम्य वातावरण होते. सगळीकडे हिरवी झाडे, छोटी छोटी पाऊलवाट, डोंगर पण जवळूनच दिसायचे. पावसाळ्यात जणू वाटायचे डोंगराने हिरवळीची शाल पांघरली आहे. तर त्या दिवशी लेक्चर जास्त झाले नाहीत त्यामुळे सर्वजण लवकर निघाले होते. आम्ही सुद्धा बॅग उचलून पटापट कॉलेजच्या बाहेर पडलो व थेट रस्ता दरीच्या पायथ्याशी गाठला. आमच्या ग्रुपमध्ये तसे 6 जण होते.
धरणाजवळ पोचण्यासाठी लहान लहान पाऊलवाटा होत्या व रस्ता नागमोडी वळणावळणाचा होता. पूर्ण वाट पावसामुळे निसरडी झाली होती त्यामुळे आम्हाला संभाळून चालाव लागत होते. रिमझिम पावसाची सरी बरसत होती, मंद गार वारा सुटलेला. आम्ही ती सरी झेलत पुढे पुढे चालत होतो. काही गावातील रहिवासी मंडळी गाय, म्हैस, बकऱ्या चरायला घेऊन जात होते . शेवटी १५ मिनिटाच्या आत आम्ही धरणाजवळ पोहचलो. व समोरचे मन मोहून टाकणारे दृश्य पाहून मी भारावून गेले.
चोहीकडे उंच उंच हिरवेगार डोंगर व दऱ्या. मध्येच कुठे बाजूला पावसामुळे ओढा वाहत होता तर मध्येच ओहोळ.त्यानंतर आम्ही धरणाजवळ पोहचलो जो एकदम दुधासारखा फेसाळ व पांढराशुभ्र होता जो मी भान हरपून पाहत होते, त्यात काही गावातील लहान मुले मजा लुटत होते तर काही पोहत होते. आम्ही धरणात पाय बुडवून पाण्यातूनच कट्ट्यावरून एका रांगेत आणखीपुढे चालत गेलो व टेकडीवर पोहचलो. खरे सौंदर्य तर इथे लपलेले! टेकडीवरून खाली पाहतानाचा देखावा खूप सुंदर वाटत होता जणू काही स्वर्गच!
पाऊस धो धो कोसळू लागला होता त्यासोबत सोसाट्याचा वारा सुटलेला त्यामुळे दुरवचे काही डोंगर पुसट दिसू लागले होते जसे काही धुक्याने त्यावर पांघरून घातले आहे. या टेकडीवर आम्ही मनसोक्त भिजलो वेगवेगळ्या पोजमध्ये, काही विचित्र वेडेवाकडे फोटोस काढले. थोड्या वेळेत सूर्य मावळतीला आल्याने आम्ही घरी जाण्यास निघालो.
पावसात भिजल्याने आम्ही सर्वजण थंडीने कुडकुडत होतो मग टेकडीवरून खाली येताच जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गरमागरम कडक आल्याचा चहा प्यायलो, त्यामुळे सर्व क्षीण कुठच्या कुठे पळून गेला व नंतर आम्ही टमटम (तेथील एक वाहनाचा प्रकार) पकडली व त्यात अंताक्षरी खेळत ,गाणी म्हणत आपापल्या घरी निघालो. खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आजही ते क्षण पुन्हा अनुभवावेसे वाटतात व त्या सुखद आठवणीत पुन्हा रमून जावेसे वाटते. असे म्हणतात ना कॉलेजच्या दिवसांची मजाच काय वेगळी असते!
(क्रमश:)
