Shobha Wagle

Others

2  

Shobha Wagle

Others

शिवबा

शिवबा

4 mins
489


श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


जिजाऊ पोटी बाळ जन्मला

शिवनेरी दुर्गावर, महाराष्ट्राचा

हिन्दवी स्वराज्याचा नायक

शिव छत्रपती पुत्र भोसल्यांचा.


शिवबा तुम्ही आजही हवे होते. तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता.

शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच्या काळासारखी आजची जनताही तशी नाही. इमान, सच्चाई, नियत, प्रामाणिकपणा काही काही राहिले नाही. या उलट भ्रष्टाचार, खोटेपणा, बेईमानी, फसवणूक, लबाडी, माणसातली माणूसकीच शिल्लक राहिली नाही.


शिवबा तुमच्या कडक शिस्तीचे पालन आठवते. तुमची शिस्त रयतेलाच नाही तर शंभू राजेंना ही त्याच कायद्यात बसवते. शंभू राजे एकदा गाणे गाणाऱ्या बाईच्या गाण्यावर मोहीत झाले होते. तुम्हाला ही गोष्ट कळताच, परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहिले म्हणून शंभू राजेचे डोळे फोडून टाकण्याचा हुकूम फर्मावला. पण न्यायाधिश रामशास्त्री प्रभूणेंच्या सांगण्यावरून बिचारे शंभू राजे सुटले ते बाईवर मोहित नसून, तिच्या गाण्यावर आकर्षित झाले होते, हे कळल्यावर.


तुमच्या राज दरबारात कधी नाच गाणी असे कार्यक्रम झाल्याचे इतिहासात नोंदच नाही.

परस्त्री तुम्ही माते समान मानली व तुमच्या कार्यकारिणीत असलेल्या लोकांस ही ते मानायला भाग पाडले. सुभेदारांच्या सुनेला मोठ्या सन्मानाने खण नारळाने ओटी भरून पाठवल्याची गोष्ट अजरामर आहे.


पण शिवबा आता स्त्रीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदललाय. आजच्या स्त्रिला शील रक्षण करणे महा कठीण झालंय. आज तिच्याकडे फक्त एक भोग वस्तू म्हणून पाहिले जाते. मग ती स्त्री कोणत्याही वयाची असली तरी ती चालते त्या नराधमाना. अशी विकृत माणसे समाजात आहेत. सरकारने कायदा कानून ही काढलाय, पण पैशाच्या जोरावर काही काळा नंतर ती जनावरे मोकाट सुटतात व पुन्हा आणखी सावजाचा बळी घेतात. शिवबा, अशा वेळेला तुमचा कायदा लाख मोलाचा ठरला असता. काय बिशाद होती त्या लोकांची वाकड्या नजरेने स्त्रीकडे पाहण्याची? डोळे छाटून त्याचे नामोनिशाण ठेवले नसते. खरंच तुम्ही आज हवे होते.


शिवबा, आजच्या युगात खूप सुधारणा झाल्यात. मोठमोठे प्रकल्प उभारलेत. जग प्रगतीपथावर चाललंय असे सगळे म्हणतात. पण एक सांगू, आजचा शेतकरी सुखी नाही हो. देशाला अन्नधान्य पुरवणारा स्वतःच आपल्या बायका पोरासकट उपाशी असतो. त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो व नंतर असहाय होऊन तो आत्महत्या करतो. त्याच्या कुंटुबांचे हाल बघवत नाही हो. ह्या निराधार लोकांना आधार देण्यास सरकार पैशांचे आश्वासन देते, पण ते पैसे त्यांना मिळतील की नाही हे देवालाच माहीत असते.


तुमच्याकाळी शेतकरी शेती आनंदाने करायचा. तुम्ही ही डोळ्यांत तेल घालून त्यांची काळजी व निगराणी ठेवायचे. तुमचा हुकुमच तसा होता. तुमचे हे मावळे शेतात पिकांची कापणी करायचे व "हर हर महादेव" म्हणत हातात तलवार घेऊन शत्रूंची ही कापणी करायचे. तुमच्या आदेशाचे पालन करायचे. जिवाला जीव द्यायचे. आता ही ते तसेच आहेत. पण शिवबा, फक्त तुम्ही नाहीत. त्याच्यां करता तुम्ही हवे होता.


तुमच्या सैन्यात जसे प्रामाणिक सैनिक होते तसे आज ही सैनिक आहेत. पण तुम्ही त्यांची जशी काळजी घेत होता तशी आता ह्यांची घेतली जात नाही. शिवबा, तुम्हाला आठवत असेल रायबाच्या लग्नाची ओवळीक द्यायला आलेला तानाजी मालुसरे "आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं" असे म्हणून घरचं लग्न सोडून कोंडाणा किल्ल्यावर स्वारी करून गेला व धारातिर्थी पडला व त्यावरून "गड आला पण माझा सिंह गेला" असे तुम्ही संबोधून त्या गडाला "सिंहगड" नाव दिलेत. तसे आज ही आमचे जवान घर, दार, संसार सोडून डोळ्यांत तेल घालून आमच्या देशाच्या सीमारेषेवर तैनात राहून पहारा देतात.

दिवस, रात्र, थंडी, पाऊस कशाची ही पर्वा न करता देशातल्या जनतेला सुखाने झोपू देतात.

गेल्या वर्षी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या चाळीस सैनिकांचे बळी गेले. शिवबा, ह्या अशा काळात तुम्ही जर असता तर हे अतिरकी हल्ले करणाऱ्यांचा नायनाट केला असता.


शिवबा, आठवतं, औरंगजेबाला सतत २५ वर्षे लढावे लागले दक्षिणेला यायला. जो प्रर्यन्त तुम्ही होता तो प्रर्यन्त त्यांचा टिकाव लागला नव्हता. साऱ्या दुनियेचे तुम्ही हिरो होता. शिवबा, तुम्ही आता हवे होता.

आपल्या देशाला ह्या अतिरेक्यांपासून जास्त नुकसान भोगावे लागते. ह्या अतिरेक्यांचे ही चांगले फावते. आपलेच काही घुसखोर, लालची, भ्रष्टाचारी, नालायक, देशद्रोही, माणूसकीला काळीमा लावणारे हरामखोर आहेत, तेच त्यांना फूस देतात. ह्या दळभद्र्यांना कळत नाही की थोड्या पैशाच्या हव्यासापोटी आपण आपल्या देशाचे किती नुकसान करतो. शिवबा, तुम्ही असतां तर ह्या हरामखोरांना निपटून काढले असते व एकेकाला सूळावर चढवले असते.

जर तुम्ही असता तर कुणाचीही वाईट नजर गेली नसती व अशी अघोरी कृत्ये झालीच नसती. शिवबा तुम्ही आज हवे होता.

फिरून जन्म घ्यावा तुम्ही, असे फार फार वाटते आम्हां. शिवबा तुम्ही आजही हवे होता!

    


Rate this content
Log in