सध्याची पिढी
सध्याची पिढी


सध्याची पिढी प्रचंड हुशार आहे. मी इयत्ता पहिली ला या वर्षी शिकवत आहे. दररोज नवीन नवीन अनुभव मला येतात. आणि खरोखरच ते अनुभव वा खाणण्यासारखे आहेत. एक विद्यार्थी त्याचा दररोज नवीन अनुभव. काही गोष्टी त्यांच्याकडून मलाही शिकायला मिळतात. जसे की इंस्टाग्राम वरती बाई तुम्ही पोस्ट टाकली का. तुमचा आयडी आम्हाला दया.आम्ही तुम्हाला जॉईन करतो. इंस्टाग्राम खाते जर का मी हे काढलेलेच नाही तर मी त्यांना कसा नंबर देणार. त्यानंतर मुलं चल बी चल असतात.म्हणजे त्यांना हे माहित आहे ते हे पाहतात.
त्यांना कविता नेटवर्क सर्च करून लावून दिली असता, शांत बसतात. पण ते झाले की बाई आम्हाला आमच्या आवडीचे गाणे तुम्ही लावा. मग कोणते हे सर्च कसं करायचं, हे ते मला समजून सांगतात. मग मीच जरा असं दाखवते की मला काहीच येत नाही. चार-पाच मुलं पटकन पुढे येतात, चित्र दिसलं की त्यावरती क्लिक करतात, आणि त्यांना हवे ते गाणे लावतात.
मुलांना वाचायला येत नसते पण निरीक्षण क्षमता जबरदस्त असते. हा गेल्या कित्येक वर्षांचा मला अनुभव आहे. पण यावर्षी पहिलीचा वर्ग दिलेला असल्याने, जास्त नवीन अनुभव मला यायला लागलेले आहेत.
एकतर करोना काळात मोबाईल मुलांच्या हातात असल्यामुळे, त्यातील खूपसे ज्ञान मुलांना मिळालेले आहे. निरीक्षण क्षमता मुलांची जबरदस्त असते. आई,बाबा, मोठी भावंड काय करतात हे पाहत असतात. त्या निरीक्षणातून त्यांना बरेच काही समजत असते.
आणि हाच अनुभव मला आता सध्या येत आहे. मी फळ्यावर लिहून झाल्यावर एक मला सवय आहे म्हणण्याची "हं आता लिहा बरं."
मुलं इतकी चणाक्ष झाली आहेत की त्यांना पाचव्या दिवशी माझा शब्द परफेक्ट पाठ झाला. आणि माझे फळ्यावर लिहून संपते तोच मुलेच म्हणतात "हं आता लिहा बर "मीच हसत बसते.
मला ह्या पिढीचे खरंच आश्चर्य वाटते. शिक्षकांना न घाबरता पुढे येतात, हवे ते विचारतात. अगदी अभ्यास करायचा कंटाळा आला तर "बाई आता अभ्यास करणार नाही,तुम्ही घरी अभ्यास पाठवा.
हात दुखायला लागला आहे. कंटाळा आला आहे. चॉकलेट देणार का मग आम्ही लिहितो." अशा अनेक अटी ह्या लहान मुलांच्या असतात. पण मजा येते हे सर्व करताना. आनंदाने मी पण यामध्ये सहभागी होते. मुलांना रोज चॉकलेट्स वाटते. खाऊ वाटते.
यामुळे तरी मुले खरंच छान अभ्यास करतात हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. खूप कंटाळा आला की सरळ त्यांना उभा करते,व्यायाम घेते. गाण्याचे तालावर नाचायला लावते. मी पण नाचते. तेवढाच माझा ही व्यायाम होतो.
पण ह्या चाणाक्ष मुलांपुढे आपण खूप तयारीने जावे लागते. हे मात्र खरे.
मुलांना नेट सर्च माहिती आहे.मुलांना कुठे,काय,कसे करायचे म्हणजे आपल्याला हवे ते ज्ञान समजते.हे सर्व माहित आहे.
माझी पिढी म्हणजे 1966 ची द पिढी आहे,त्या पिढीला हे काहीच माहित नव्हते. शिक्षण शिक्षक सांगतील ती पूर्व दिशा होती. शिक्षक म्हणजे अगदी दुसरा देव होता. शिक्षकांनी सांगितले हे असेच आहे ते आपण तसेच धरत होतो. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास होता. आणि होते ही तसेच. त्यांनी शिकवलेल्या क्लुप्तीतनं गणित आणि विज्ञान विषय हे आजतागायत आपल्या डोक्यामध्ये आहे. इंग्रजी शिकवण्याची पद्धत त्यांची पूर्णतः वेगळी होती. वार,महिने, शब्दांचे स्पेलिंग तयार करण्याची पद्धत , आजही तीच डोक्यामध्ये आहे. आपणही शिकलोच.
पण हल्लीच्या शिक्षणामध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये जमीन असमानचा फरक आहे.
जस जसे फोनचे शोध लागत गेले तसे तसे मुलांच्या शिक्षणात बदल होत गेले. माझ्याकडे मोबाईल आला 2013 नंतर. माझ्या शिक्षणामध्ये तसा फरक पडत गेला. आपल्याला जे येत नाही ते आज आपण आत्तापर्यंत पुस्तकं मधून शोधून काढत होतो. पण आता एक सर्च केलं आपल्याच मोबाईल वरती की आपल्याला तो शब्द ते वाक्य पटकन कळते. पूर्वी एखादा शब्द अडला तर तो आपल्याला शब्दकोशामध्ये पहावा लागत असे. आता सरळ नेटवर सर्च केलं की त्या शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला समजून जातात.
घरामध्ये 25 वर्षांपासून असलेली पुस्तके मी यावर्षी काढून टाकली. पुस्तकालयाला भेट दिली. कारण आता सगळं नेट सर्च आपल्याला मिळत आहे तर हे का ठेवू मी. घरात त्याची पानं खिळखिळी व्हायला लागली आहेत. इतर कोणाला त्याचा उपयोग होईल या विचारांने पुस्तकं मी पुस्तकलयात दिली.
आपण आपले ज्ञान वाढवण्यासाठी नेटचा उपयोग करावा फक्त तो वाह्यात उपयोग न करता त्याचा छान मार्गानं ज्ञान देण्यासाठी उपयोग करावा ज्ञान घेण्यासाठी उपयोग करावा. हे मात्र मी नक्कीच या पुढच्या पिढीला नेहमीच सांगत असते.
आजचे हे पिढी घडवण्यात मला खूप आनंद वाटतो त्याचबरोबर काही नवीन नवीन शिकण्यातही आनंद वाटतो आणि सलाम या आजच्या पिढीला.