अक्षता कुरडे

Children Stories Romance

3  

अक्षता कुरडे

Children Stories Romance

सौंदर्य साधेपणातलं

सौंदर्य साधेपणातलं

3 mins
310


निळ्याशार सुंदर ड्रेसमधे सिंड्रेला राजकुमारा सोबत नाचत होती. ती त्याच्या व तो तिच्या डोळ्यांत दोघेही अगदी हरवून गेले. तिच्या नजरेतल साधेपणाच सौंदर्य राजकुमाराने पाहताक्षणी हेरल होत. दोघांना अस पाहून तिथल्या इतर मुली, तसेच सिंड्रेलाची सावत्र आई व बहीण साऱ्यांचा अगदी जळफळाट होत होता पण दोघेही नाचण्यात इतके मंत्रमुग्ध झाले होते की त्यांना जगाची तमा नव्हती. 


परीच्या सांगण्याप्रमाणे तिला बारा वाजायच्या अगोदर तिथून निघून जायचे होते. तिला ह्याची जाणीव होती. राजकुमाराची सोबत तिला खुप सुखावत होती म्हणून तिचा तिथून पायच निघत नव्हता. परीचे बोल आठवून ती तिथून निघण्याची घाई करू लागली. राजकुमार सिंड्रेलाला तिथे अजून काही वेळ थांबण्यास विनंती करत होता. पण सिंड्रेला काही ऐकेच ना. त्याने तिला गळ घालून तिला इतक्या घाईत निघण्याचे कारण विचारले. सिंड्रेलाने सारे काही खरेखरे सांगून टाकले. ते ऐकून राजकुमार चकित झाला. दोघांचे बोलणे सिंड्रेलाच्या सावत्र आई आणि बहिणीने ऐकले होते. बारा वाजण्यास काहीच मिनिटे बाकी होती. राजकुमार काही बोलणार तितक्यात सिंड्रेला तिथून जाऊ लागली. पण तितक्यात तिच्या सावत्र बहीणीने तिला बोलण्यात अडकवले आणि तिच्या आईने तेथील शिपायाला राजकुमाराचा आदेश आहे असे सांगून महालाचे दार बंद करण्यास लावले. दोघींनी त्यांचा डाव साधला होता. मधेच बोलणे अर्धवट टाकून सिंड्रेला तिथून जाणार तितक्यात तिथे लक्ष दारावर जाते. ते बंद झालेले असते. सिंड्रेला खूप काळजीत पडते. ह्या सगळ्या गोंधळात बाराचा ठोका पडतो. सिंड्रेलाचे खरे रूप राजकुमारासमोर येताच राजकुमार तिचा अपमान करून तिला हाकलून देईल व आता खरी गंमत येईल असे म्हणून दोघी गाल्यातल्या गालात एकमेकींकडे पाहून हसू लागतात. बाराचा ठोका पडताच सिंड्रेला तिच्या मूळ रूपात आली. मळकटलेले जुनाट कपडे, सुंदर असलेली केशरचना आता अस्ताव्यस्त झाली होती. 


तिथे असलेल्या प्रत्येकाची नजर सिंड्रेलावर पडली. सारे तिला पाहून हसू लागले. तिची सावत्र आई व बहीण तिचा सगळ्यांसमोर अपमान करू लागले. सिंड्रेलाने भरल्या डोळ्यांनी नजर उचलून राजकुमाराकडे पाहिले. तो लगेचच तिथून निघून गेला. त्याला असे जाताना पाहून सिंड्रेलाचे आता काही खरे नाही असे साऱ्यांना वाटून गेले. सिंड्रेलाचा अपमान अजूनही होतच होता. ती निमूटपणे सारे काही ऐकुन घेत होती. सिंड्रेलाचे डोळे पाण्याचे डबडबले आणि ती हमसून हमसून रडत तिथून निघून जाऊ लागली. तितक्यात राजकुमाराने तिला आवाज देऊन थांबविले. सिंड्रेलाने पाठी वळून पाहिले आणि ती थक्क झाली. महागड्या सुंदर वेलवेटचा कोट घातलेला राजकुमार आता साध्या खाकी पोशाखात आला होता. 


"खरे सौंदर्य म्हणजे ते आपलं स्वच्छ निर्मळ मन आणि ते निखळ मन असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांत झळकतं. ते पाहण्यासाठी आपलं मनदेखील तसच काहीसं असावं लागत. मळके कपडे असावेत पण मळक मन नसावं. ते साधं आणि सरळ मार्गी असावं. कारण साधेपणात खरे सौंदर्य दडले असते."

असे म्हणत, त्याने सिंड्रेलाचा हात धरून तिला राजमहालाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या झुंबराखाली आणले आणि गुडघ्यावर बसून त्याने सिंड्रेलाला लग्नासाठी मागणी घातली. दोघेही साध्या कपड्यात होते तरीही दोघांचे सौंदर्य खुलून दिसत होते. सारेजण टक लावून ते दृश्य अवाक् होऊन पाहात होते. सिंड्रेलाने होकार देताच सारीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. तिच्या आई व बहिणीने येऊन दोघांची माफी मागितली. दोघांनीही मोठं मन करून त्यांना माफ केलं. राजकुमाराने पार्टी सुरू ठेवण्यास सांगून सगळे पुन्हा त्याचा आस्वाद घेऊ लागले. सिंड्रेला आणि राजकुमार दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत पुन्हा हरवून सुखी आयुष्याची स्वप्ने पाहण्यात दंग झाले.


Rate this content
Log in