Rahul Mohite

Others

3.5  

Rahul Mohite

Others

सायकलवारी पुणे ते मुंबई

सायकलवारी पुणे ते मुंबई

6 mins
318


मनात विचार आला आणि सुरु झाली पुणे ते मुंबई सायकलवारीची. ऑफिसमध्ये नाइट शिफ्ट केली आणि सकाळी मुंबईकडे जाण्यासाठी निघालो. मनामध्ये खूपच एक्सासाइटमेंट होती ती म्हणजे पुण्यावरून मुंबईला सायकल चालवणे या आधी बाईक, कारने खूप वेळा प्रवास केला होता मुंबई तसे नवीन काहीच न्हवते. या आधी शाळेपासून ते कॉलेजमध्ये असताना आम्ही अॅटलास, हर्क्युलससारख्या सायकली घेऊन फिरायला जायचो. त्यामुळे सायकल चालवणे तशी जुनी हौस अंगात होतीच. 


सकाळी स्वारगेट जवळून मुंबईला निघण्यासाठी सुरुवात केली. थंडीचे दिवस असल्याने सायकल चालवण्यासाठी वातावरण खूपच अनुकूल होते. सुरुवात झाली गुगल मॅप आणि हेडफोनवर गाणे ऐकत ऐकत बाणेर-बालेवाडीवरून जुन्या हायवेला लागलो. हायवेवरून खूपच जोराने वाहने जात होती तसाच मी एका कडेने आपला प्रवास सुरू ठेवला. बघता बघता पहिला स्टॉप कार्ला लेणीजवळ घेतला. आर के हॉटेलमध्ये मस्त असा चहाचा भुरका मारला आणि परत सुरुवात केली पुढच्या प्रवासाला. शनिवार असल्यामुळे वाटेमध्ये खूप सारे सायकल प्रवासी येता-जाता भेटत होते. या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते येता-जाता ओळखीचे असो वा नसो ते एकमेकांना अंगठा दाखवून प्रोत्साहन देत होते. यामुळे मी खूप प्रोत्साहित झालो आणि माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. कार्ला लेणीपासून पुढचा टप्पा हा लोणावळा शहर. या शहराची माझी ही पहिलीच सायकलवारी होती. लोणावळा ओलांडून पुढचा टप्पा थोडा खडतर होता तो म्हणजे खंडाळा. घाटामध्ये मध्यभागी येताच निसर्गाचं नयनरम्य असं दर्शन झालं. काय तो सोसाट्याचा वारा, काय ते दाट धुके मन अगदी तृप्त झाले. या शहरी जीवनातून खूप दिवसांनी घेतलेला हा वेगळाच अनुभव तोही सायकलवर. खंडाळा घाटामध्ये फोटोचा मोह न आवरल्यामुळे मीही बाकीच्या पर्यटकांसारखा घाटामध्ये उभा राहून फोटो घेत होतो. तितक्यात वाऱ्याचा मोठा झोत आला आणि काही क्षणांत मला आणि माझ्या सायकलला जोराचा धक्का देऊन गेला. आम्ही दोघेही पडता पडता वाचलो.


घाट उतरायला सुरुवात केली. घाटामध्ये दाट धुके, सोसाट्याचा वारा, थंडीची झुळूक, अप्रतिम वातावरण या सर्वांचा मी खूप दिवसांनंतर अनुभव घेत होतो यातूनच मला आणखी प्रोत्साहन मिळाले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. घाट उतरत असताना बाजूने जोराने जाणारी वाहने आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून बचाव करत करत प्रवास सुरु होता. असा हा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. लोणावळा-खोपोली जुन्या हायवेवरून जात असताना मध्येच एक्सप्रेस वे वर जोडला जातो आणि परत तिथून डाव्या बाजूला बाह्यवळण आहे तसे सगळ्या वाटसरूंसाठी गुंतागुंतीचा रोड म्हणणे वावगे ठरणार नाही. थोडा रोड चुकला की एक्सप्रेस वे वर दोन चाकींना टोल फाडण्यासाठी पोलीस मामा हे २४ तास उभेच असतात आणि कमीतकमी १००० रुपये दंड आकारतात. या बाह्यवळणाजवळ खूप सारे दुचाकीवाले द्विधा मनस्थितीत उभे होते. गुगलची रस्ता सांगणारी मावशीही त्या ठिकाणी काम करत नव्हती, किंवा खूप वेळा तीही द्विधा मनस्थितीमध्ये जो दिसेल तो रोड दाखवत होती. मीही १०-१५ मिनिटे तिथे चुकलो. सगळे रोड फिरून पाहिले पण काही समजायला वाव नव्हता. तेवढ्यात तिथे खोपोली गावातील एक दूध विक्रेता आला त्याला आम्ही रोड विचारून खोपोली शहराकडे निघालो. जाता जाता जंगलाचा आणि घाटाचा अनुभव हा खूपच मस्त होता. जसे खोपोली शहर ओलांडले तसे मुंबईचे दमट वातावरण सुरू झाले. बघताबघता खलापूर शहर आले आणि आमचा दुसरा नाष्ट्याचा स्टॉप आला. हॉटेल संदेशमध्ये फ्रेश होऊन आम्ही मस्त असा मिसळ आणि पोह्यांवर ताव मारला आणि पुढच्या टप्प्यासाठी प्रवास सुरु केला. त्या उष्ण दमट वातावरणाची सवय नसल्याने तसा सायकल चालवताना त्रास होत होता पण मनामध्ये आणि डोक्यामध्ये एकच ध्येय होते ते म्हणजे मुंबई गाठणे. थोड्या वेळात नवी मुंबईचे बोर्ड दिसायला लागले मनामध्ये आनंद होत होता आणि एकच विचार येत होता कधी एकदा मुंबई गाठायची. पनवेलजवळ येताच पुन्हा एकदा गुगल मावशीनी रोड चुकवला. रोडचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गाने मुंबईकडे जाण्यासाठी सांगितले होते. तेवढ्यात आम्ही रोड चुकलो आणि सरळ जेएनपीटी रोडने मुंबईकडे जायला निघालो. रोड तसा पूर्ण शांत... रोडवर फक्त अवजड वाहने जात-येत होती. आम्ही ही नवीन, काही समजायला मार्ग नाही. ३५-४० किमी गेल्यावर तिथे पोलीस भेटले त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर समजले की आम्ही रोड चुकलो आहोत. तशी ती दुपारची वेळ त्यामध्ये उष्ण वातावरण, डोक्यावर सूर्य, काही समजायला तयार नाही. तेवढ्यात त्यांनी आम्हाला एक पर्यायी मार्ग सांगितला. पाम बीच रोडवरून कसेबसे आम्ही मुख्य मार्गावर आलो. तेव्हा समजले की आम्ही अजून नवी मुंबईमध्येच फिरत आहोत. साधारण ५.३०-६ तास झाले होते सायकल चालवत होतो. नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये एक ब्रेक घेतला आणि जेवणासाठी थांबलो. मुंबईच्या पद्धतीचे मस्त पोटभर जेवण केले. खूप भूकही लागली होतीच.


जेवून झाल्यानंतर निर्णय घेतला की जेथे आहे तिथे थोड्या वेळासाठी विश्रांती घ्यायची. तेवढ्यात आमचा जिवाभावाचा एक मित्र भेटला त्यांनी विश्रांतीसाठी योग्य ती जागा मिळवून दिली. तिथपर्यंत १५१ किमी सायकल चालवणे झाले होते. तरीही मनामध्ये एक चुनचुन सुरूच होती ती म्हणजे गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स पाहण्याची. एक वेळ मनामध्ये विचार आला की बस आता मुंबईमध्ये आलो इथून पुढे न जाता परत पुणे गाठू. इतक्यात माझ्या मित्राने मला धीर देत बोलला भावा इतक्या जवळ येऊन परत जाणे आपल्याला शोभत नाही. आपण रात्रीच्या मुंबईचा अनुभव घेऊ. ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री १२ वाजता आमच्या मुंबईमधील स्थायिक मित्रासोबत पुढचा प्रवास सुरु केला. बघताबघता सायन-दादर आले. रात्रीची वेळ लोक म्हणतात ना की मुंबई ही कधी झोपत नाही याचा आम्ही जिवंत अनुभव घेतला. रोडवरून जाताना गर्दी होतीच. सोबत मुंबईचे टॅक्सीवाले न झोपता २४ तास सेवा देत होते. पुढे आम्ही बघताबघता भेंडी बाजारमध्ये आलो. बघतो तर काय पुढच्या दिवसाची बाजाराची तयारी रात्रभर सुरूच होती, कोणी पालेभाज्यांची निवड करत होते, एका ठिकाणी तर चिकनवाले होलसेल भावात कोंबड्या घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावून उभे होते. पुढे निघालो आणि पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. ते बघताच डोळ्याचे पारणे फिटले, मन बहरून आले, पहिलं म्हणजे मुख्य मुंबईमध्ये पोहोचलो म्हणून आणि दुसरे म्हणजे छ.शिवाजी महाराज टर्मिनसचे रात्रीच्या लाइटमधील डोळे भरून येणारा अप्रतिम नजारा. समोर पाहिले तर मुंबई महानगरपालिका एक से बढकर एक अशा ऐतिहासिक इमारती सगळं पाहून डोळ्याचे पारणे फिटले अंगातील सगळा थकवा निघून गेला. जितके फोटो घ्याल तितके कमीच कोणत्याही प्रकारचा कोणत्याही ठिकाणावरून फोटो घेतला की तो एक वेळा दिवसाचा. तेवढ्यात तिथे आम्हाला एक चहावाला भेटला. मस्त चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो आणि पोहोचलो फोर्ट परिसरात. जिकडे बघावे तिकडे जुन्या इंग्रजकालीन इमारती... असे वाटत होते की खरोखर मी भारतामध्ये आहे की दुसऱ्या देशामध्ये आलो आहे. एरव्ही या रोडवर इतकी गर्दी असते मान वर काढून बघण्यासाठी पण जागा नसते. तिथे आम्ही निवांत असे फिरत होतो. सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होतो. बघताबघता पोहचलो गेट वे ऑफ इंडियाच्यासमोर. पहाटेची वेळ तरी पण तो परिसर रोजच्यासारखा गजबजलेला. पोहचताच मन भारावून गेले ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडियासमोर खूप फोटो काढले मस्त मजा केली आणि निघालो मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या लाइनकडे. तिथून २.५ किमी अंतरावर मरिन लाइन्स तोही परिसर पहाटे गजबजलेला असे वाटत होते. इथे लोक रात्री झोपत नसावेत. काय ती स्ट्रीट लाइट, वेगळ्या आकाराचे दगड आणि दर्या आहाहाहा... खूपच सुंदर अनुभव. इथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. नाइट प्रवास हा कधी ५०किमी ओलांडून गेला समजलेच नाही. 


परतीचा प्रवास सुरू असताना सायकल काही तांत्रिक बिघाडामुळे नवी मुंबईमध्येच मित्राकडे सोडून यावी लागली. या प्रवासामध्ये मला खूप मोलाची साथ भेटली ती म्हणजे जिवाभावाचा भावासारखा मित्र ओंकार गोरुले, मुंबईची नाईट सफर ज्याच्यामुळे शक्य झाली तो म्हणजे माझा मामा प्रवीण, आणि मला या प्रवासाला प्रोत्साहन दिले ते माझे सर्व अपोलो हॉस्पिटलचे सहकारी, सायकल घेण्यासाठी आणि असे प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा माझा भाऊ आशिष आणि माझे सर्व मित्रमंडळी यांचा मी मनापासून आभारी आहे. असेच प्रोत्साहन, सहकार्य, सपोर्ट देत राहा ही विनंती. पुढील सायकल प्रवास हा खुप वेगळा आणि विलक्षण असेल.


Rate this content
Log in