Shobha Wagle

Others

1  

Shobha Wagle

Others

सांजवेळ

सांजवेळ

2 mins
678


सांजवेळ, दिवसभराचे काम संपल्यावर घरी परतण्याची वेळ. सूर्य पश्चिमेला क्षितिजापलीकडे जाण्यास आतुर झालेली वेळ. निर्सगाचे विलोभनीय, मनाला मोहून टाकणारे दृष्य समुद्रकाठी साकारते ती सांजवेळ. थंडगार वारा, त्याच बरोबर पाण्याचे तुषार उडवणाऱ्या उंच लाटा, किनाऱ्याकडे धावणाऱ्या आणि मनमुराद त्यांचा आनंद लुटणारा जनसमुदाय व त्याचबरोबर खवय्यांना आपल्याकडे तोबा गर्दी करुन घेणारे खाद्यपदार्थाचे स्टॉल चौपाटीवर पहा सांजवेळेलाच.

रानीवनी चरायला गेलेली जनावरे वासरांच्या ओढीने आपल्या गोठ्यात परतण्याची वेळ. पाखरांचे थवेही चारा घेऊन परततात आपल्या घरट्यात. मोकळ्या मैदानातले खेळ संपवून घरी परतणारी मुले. बाग-बगीच्यातली फुलापानांची सळसळ शांत होण्याची वेळ. मात्र बकुळ फुलांचा अन् प्राजक्त फुलांचा सडा अंगणात घालण्याची वेळ व रातराणीची बहरण्याची वेळ.

सांजवेळी तुळशीसमोर निरांजन लावण्याची व देवघरात दिवा-अगरबत्ती लावण्याची वेळ. आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची वेळ.

शुभंकरोती, श्लोक, पाढे पाठ करून वाड वडिलांना आदराने वंदून आशीर्वाद घेण्याची वेळ. दिवसभर काम करून थकल्यावर आप्तजनांना भेटण्याचे व गुजगोष्टी करण्याची वेळ. माजघरात रात्रीच्या जेवणाच्या तयारीच्या धांदल गडबडीची वेळ. मुलांच्या अभ्यासाची व म्हाताऱ्या आजी आजोबांची दूरदर्शन व टीव्हीचे कार्यक्रम पाहण्याची वेळ. प्रियकरांची प्रेक्षणीय स्थळी भेटण्याची वेळ, अशी ही सांजवेळ.

सूर्य उदय, सकाळ, दुपार आणि रात्रीच्या अगोदर येते सांजवेळ. येते ती घेऊन रात्रीची चाहुल. चला, कामे आटपल्याने शरीर थकले, त्यास विश्रांतीची गरज आहे आता, म्हणून रात्र येते.

माणसांच्या जीवनातही अशी सांजवेळ येते. संध्याछाया येते त्या अगोदरच सगळी कामे निपटायची असतात. रात्रीची शांत झोप घेण्यास पूर्ण दिवसाची कामे करायची असतात. दिवसभराची सगळी कामे व्यवस्थित आटोपली असतील तरच रात्रीची शांत झोप लागते आणि जर झाली नसतील तर मनाला हुरहुर लागून झोप कुरकुरते. सांजवेळची जाणीव ठेऊनच ती कामे निपटायची आणि रात्री शांत झोपायचे.


Rate this content
Log in