सामाजिक प्रश्न
सामाजिक प्रश्न
रमा जुहू बीचवर हातात पुस्तक घेऊन वाचत होती. शुध्द हवा, सुंदर परिसर आणि शांत जागा. ती नेहमी संध्याकाळी समुद्रकिनारी बसायची. तिची जागा ही ठरलेली. एकांत स्थळाची, जिथे माणसांची वर्दळ अजिबात नसायची. प्रकाशाची सोय असायची म्हणून ती आठ साडे आठ पर्यंत बसून हवा खात वाचन करायची. तिचे घरही जवळच होते त्यामुळे लवकर जायची घाई ही नव्हती.
आज ही ती अशीच बसली होती. जवळ जवळ साडे आठ वाजायला आले होते. एवढ्यात एक तरूण धावत धावत पाण्याकडे जाऊ लागला. तिला काही कळेना हा एकटाच का धावतो? मागे पुढे कोणीही नव्हते. तरी का बरे धावतोयं आणि तेही उसळणाऱ्या लाटाच्या दिशेने! तिच्या मनात पाल चुकचुकली आणि लगेच त्या तरुणाच्या मागे तिही धावली. तो तरूण कंबरभर पाण्यात पोचला, तरी नेटाने तो पुढे जात होता. रमाने आपला वेग वाढवला आणि ती त्याच्याजवळ पोचली. तेवढ्यात त्याने स्वतःला पाण्यात झोकून दिले पण रमाने मोठ्या प्रयासाने त्याला वाचवलं. बकोटीला धरून त्याला खेचत काठावर आणलं आणि एक सणसणीत चपराक त्याच्या गालावर दिली. "मरण स्वस्त झालयं काय तुला? का मरायचंय तुला?" तेव्हा रमाचे पाय घरून तो म्हणाला, "ताई माफ करा, पण का वाचवलं मला? मी लायक नाही हो. मी इंजिनियर झालो पण एक वर्ष होत आलंय मला नोकरी नाही. वणवण फिरतोय प्रत्येक ठिकाणी पण सगळीकडे नो वेकंसी. किती दिवस मी आई बापाच्या कमाईवर जगायचे! वैतागलो जीवनाला म्हणून शेवट करायला निघालो होतो."
"अरे अशाने तू सुटशील पण तुझ्या आई बाबांचे काय? तुझं दुःख ते पचवू शकले असते?" अशा त्याच्याशी गप्पा मारत ती त्याला आपल्या घरी घेऊन आली. चहा पाणी झाल्यावर त्याची शैक्षणिक पात्रता ओळखून तिने त्याला स्वतःच्या कारखान्यात नोकरी दिली आणि दुसऱ्या दिवसा पासून कामावर यायला सांगीतले.
तो तिचे आभार मानून घरी गेला तरी रमा अस्वस्थ होती. ती विचार करू लागली, ही अवस्था एकाच तरुणाची आहे का? नाही, ही तर हजारो लाखो लोकांची आहे. बेकारी ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. आपला देश अजून पूर्ण विकसीत झालेला नाही. अजून विकसीत होत आहे. आपण एका तरुणाचा जीव वाचवला, एकाला नोकरी दिली, पण बाकीच्यांचे काय? लोक संख्येच्या मानाने लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत. बेकारी हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे. अर्थव्यवस्थाही अशी कोलमंडलेली. इच्छुकांच्या संख्येएवढे रोजगार उपलब्ध नाहीत. बेकारीमुळे गरीबी वाढत चाललीय.
शिकले सवरलेले लोक जागृत झालेत. "हम दो, हमारा एक" ह्या तत्वावर चालतात. पण हे तर फक्त शहरातच दिसतंय. अशिक्षीत मागासलेले लोक ह्या पासून अल्पितच आहेत! ह्यामुळेच तर आपल्या देशातील गरीबी नष्ट होत नाही. बाकीचे देश व आपला देश ह्या मध्ये हीच तर तफावत आहे. गरीबीमुळेच एकानंतर एक प्रश्न उभे राहतात.
सरकारने सर्वाच्या शिक्षणाची सोय केलीय. त्याच्या जेवणाची सुध्दा व्यवस्थ केलीय. तरी सुद्धा शाळा ओस पडतात? आईवडील शेतकरी असतील तर त्यांची पोरं त्यांना शेतात मदत करतात नाहीतर घरी छोट्या भावंडाना सांभाळतात. चौदा वर्षां खालील मुलांना काम करता कामा नये असा कायदा असूनही कितीतरी मुले छोट्या मोठ्या कामात गुंतलेली असतात. ती सरकारने दिलेल्या शिक्षणापासून वंचीत राहतात. शिकलेल्यांना इथे नोकरी मिळत नाही मग अडाणी अशिक्षितांचं काय होणार? विचार करून रमाचं डोकं भणभणू लागलं. आज तिची जेवायची सुद्धा इच्छा राहिली नाही. ती तशीच विचार करतच पलंगावर आडवी झाली.
देश प्रगती पथावर जायला हवा तर ह्यावर काही ठोस तोडगा कढायलाच हवा. नाही तर गरीब आणखीन गरीब होईल आणि फक्त श्रीमंतच श्रीमंत होईल. आपल्या सारख्या समविचारी लोकांना एकत्र आणायला हवं. काहीतरी करायला हवं. असे विचार सतत रमाच्या डोक्यात चालूच होते. झाल्या प्रकाराने ती खूप शीणली होती. तिचा कधी डोळा लागला तिला कळलेच नाही.