Shobha Wagle

Others

2.4  

Shobha Wagle

Others

साहित्य संमेलन कशी असावी!

साहित्य संमेलन कशी असावी!

3 mins
228


अखिल भारतीय ९३ वे मराठी साहित्य संमेलन येत्या जानेवारीत उस्मानाबाद येथे होणार आहे. त्याची जय्यत तयारी ही चाललेली आहे. अशा साहित्य संमेलनातून एका नवख्या साहित्यिकाला बरेच काही शिकायला मिळते आणि तशा अपेक्षेनेच एक साहित्यिक आपली हजेरी संमेलनामध्ये लावत असतो.


अखिल भारतीय संमेलन आणि आजकल गावो गावी होत असलेली संमेलनं ह्या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक दिवसीय संमेलन ठेवतात. मोठे पुढारी किंवा नेते अध्यक्ष पाहुणे असतात. त्यांचं वेळेवर न येणं व त्यामुळे सगळ्याच कार्यक्रमाचा गोंधळ होणं हे ठरलेलंच. ते आल्यावर त्यांचं आगत स्वागत लांबलचक असतं. नवोदितांच्या पुस्तकांचे प्रकाशन, अध्यक्ष पाहुण्यांचे विषय सोडून लांबलचक भाषण आणि लगेच त्यांचं संमेलनातून निघून जाणे यामुळे नियोजनाचे बारा वाजतात. एक नवोदित कवि कवयित्री साधी अपेक्षा ही ठेऊ शकत नाही का, की आपल्या कवितेचे सादरीकरण हे महान व्यक्ती ऐकतील!


संमेलनात गेल्यावर मोठे लेखक-कवी आपले लेखनाचे प्रकार किंवा दर्जेदार साहित्य कसे असावे ह्यावर काही बोलले तर नवोदितांना त्या संमेलनाचा फायदा होईल. वेळेचे बंधन सर्वांनीच पाळायला हवे तरच नियोजनानुसार सगळे कार्यक्रम सुरळीत होतील. नाही तर सगळा सावळा गोंधळ होताना बऱ्यांच संमेलनात दिसतो.


आज नवोदित साहित्यिक लेखन करतो व स्वतःच्याच पैशांनी पुस्तकांची छपाई करतो. पुर्वी पब्लिशर स्वतः साहित्यिकांकडे साहित्याची मागणी करायचे. आता जो तो उठतो, आपलं लिखाण प्रसिध्द करायला बघतो. त्या साहित्याचा दर्जा कुणालाच माहित नसतो आणि त्या साहित्याला लोकांचा प्रतिसाद ही कमीच असतो. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, जयवंत दळवी, विश्वास पाटील, वि. स. खांडेकर अशा महान साहित्यिकांच्या लेखनाच्या नखाची ही सर आजच्या साहित्यात आढळत नाही. तरी उठसूट सगळेच पुस्तक छापल्याने आपण साहित्यिक म्हणून मिरवत असतात. 

आज मराठी पुस्तकांची मागणी कमी आहे, तेवढा वाचक नाही, अशी आपण चर्चा करतो पण साहित्य कसे हवे, त्याचा दर्जा कसा आहे, हे ही आपण पाहायला हवे. आजचे स्वतःचे साहित्य स्व पैशाने छापून बाजारात आणले, पण त्यात भाषा ही अशुध्द असेल तर कोण विकत घेईल? बाजारात येणाऱ्या साहित्याचा दर्जा उच्च असायलाच हवा. बघता क्षणीच पुस्तकाचे कवर पाहून ते उघडण्याचा मोह व्हायला हवा आणि आत दर्जेदार लेखन असायला हवे.


अशा नवोदितांना साहित्य नीट कळावं ह्या करता साहित्य संमेलनात कार्यशाळा असाव्या असे मला वाटते. संमेलनातून एका नवोदित साहित्यिकाला एक भली मोठी साहित्याच्या जाणीवांची शिदोरी मिळायला हवी. लेख, ललित लेख, प्रवास वर्णन, कथा, लघु कथा, कादंबरी असे साहित्याच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. ह्या मध्ये सर्वांनी भाग घ्यावा. एकमेकांचे विचार, साहित्य म्हणजे काय, हे नवोदिताला कळेल. तसेच काव्याचे वेगवेगळे प्रकार ह्यावर ही चर्चा असायला हवी. एक एक काव्य प्रकार वेगवेगळ्या कवीकडून सादरीकरण झाल्यावर त्यावर विद्वानांनी चर्चा करावी. म्हणजे नवोदिताला त्रुटी कळून तो सुधारणा करू शकेल. श्रेष्ठ कवि, लेखक ह्यांनी आपल्या भाषणातून नवोदितांना सुधारकरण्या सारखे भाष्य करावे.


सादरीकरणामध्ये कविता सादरीकरणा करता निवडकच कविता घेतात. अखिल भारतीय संमेलनामध्ये कवेतीची निवड होणेच एक अभिमानास्पद गोष्ट ठरते आणि ती असेलही. त्याबद्दल दुमत नाही. मी अजून अखिल भारतीय संमेलनात पोचले नाही तरी सादरीकरणा करता प्रत्येकाला ठराविक वेळ दिलेली असते. नुसती कविता वाचणे ही ही एक कला असते. कवितेचा भावार्थ, आशय, आपले शब्द हे ऐकणाऱ्याच्या हृदया पर्यंत पोचवणं ही कला असते. कधी कधी आपण बघतो कवि कविता गाण्यातुन सादर करतात आणि त्यात ही काही हरकत नाही. कविता गण्यातून सादर करायला जास्त वेळ लागतो तेव्हा त्या कविने त्याची अगोदर सूचना द्यायला हवी. आणि त्या नुसार आयोजकांनी त्यांची वेळ त्यांना द्यायला हवी. आता कविता गाण्यातून सादर करणार म्हणजे ताल, सूर, आवाज ही तितकाच गोड असायला हवा. त्या करता अशा सादर करणाऱ्यांचे ऑडियो आयोजकांनी अगोदर स्वतः ऐकूनच सिलेक्शन करावे. म्हणजे बेसूर, कर्कश आवाज ऐकून नको हे संमेलन असं व्हायला नको.


आता संमेलनात नुसती रटाळ भाषणे व सादरी करणामध्ये थोडे हास्य विनोदही असायला हवे. त्याकरता थोडा वेळ आयोजकांनी द्यावा म्हणजे संमेलनाला लज्जत हमखास येईल. तसेच संमेलनामध्ये महान, श्रेष्ठ साहित्यिकांच्या पुस्तकांचे स्टॉल लावावे जेणेकरून नवोदितांनी ते विकत घेऊन वाचन करता येईल म्हणजे साहित्य काय हे नीट कळेल.


लेखक गरीब असतो. अवाढव्य खर्च त्यांना झेपत नाही. तेव्हा मला वाटते सरकारने थोडा मदतीचा हात द्यावा. गावो गावी होणाऱ्या संमेलनातला दर्जा थोडा वाढवायला सरकारने किंवा दानशुरांनी थोडी आयोजकांना मदत करावी म्हणजे त्यांचा थोडा उत्कर्ष होईल व साहजीकच साहित्यिकाला मदत होईल.


Rate this content
Log in