Shobha Wagle

Others

5.0  

Shobha Wagle

Others

रंग माणसांचा

रंग माणसांचा

3 mins
523


    बस थांब्यावर संध्या नेहमी लवकरच यायची कारण बसचे वेळापत्रक बरोबर नसायचे. कधी लवकर तर कधी खूपच उशीरा यायची. तिच्या ऑफिसला जाणारी तिच एकमेव बस नंबर 12. आजही ती लवकर पोचली. अर्धा तास झाला तरी बसचा पत्ता नाही. आता वेळेवर कशी पोहचू ह्या चिंतेत ती होती. एवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले. "मॅडम येताय का? तुमच्या ऑफिसच्या बाजूलाच माझं ही ऑफिस आहे." रिक्षात बसलेल्या माणसाने तिला विचारले. दोघंही नेहमी एकच बस पकडत होते, पण एकमेकांना ओळखत नव्हते. क्षणाचाही विचार न करता संध्या पटकन त्यांच्या बाजूला जाऊन रिक्षात बसली. तिला तिचच नवल वाटलं, जरा ही विचार न करता आपण ह्या परपुरुषा बरोबर रिक्षात स्वार झालो, आणि ती हसली. "का हसलात?" त्याने विचारले. "काही नाही. मला आज खूपच उशीर झाला व तुम्ही विचारल्या बरोबर काही ही आढेवेढे न घेता मी रिक्षात बसले ना, म्हणून हसू आले." "त्यात काय? आपण गेले तीन महिने एकमेकांना बघतो ना. नाव माहीत नसेल तरी ओळखतोच की."

अर्ध्या तासत ती कामावर वेळेवर पोचली. नेहमी एकाच बसने प्रवास करून ती फक्त एकमेकांना बघत होती. पण आता ओळख वाढली. आता प्रवासात गप्पा रंगू लागल्या. एकमेकांच्या घरी येण जाणं वाढलं. मैत्रीचे प्रेमात कसे रुपांतर झाले दोघांनाही कळले नाही. दोघही मध्यम परिस्थितीची व दोघांच्याही आईवडिलांच्या संमतिने लग्नाच्या जाळ्यात अडकली. महेशचे घर लहान होते. आता लग्ना नंतर दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यावा असा विचार महेशच्या मनात आला. त्याने संध्याला ऑफिसमधून लोन काढायला सांगितले. स्वतः ही काढणार, तरी भागत नाही म्हणून तिच्या आईवडिलांकडून ही बरेच पैसे कर्ज घेतले. आपल्या मुलीच्याच संसाराला उपयोगी पडतील म्हणून त्यांनी ही दिले. सगळे सोपस्कार झाल्यावर फ्लॅट ही मिळाला व सगळे नवीन घरात रहायला गेले. पण फ्लॅट त्याने आपल्या आईवडिलांच्या नावावर घेतला. तिला व तिच्या आईवडिलांना थोडे खटकले. तरी ती गप्प राहिली. तिच्याशी सगळे गोडगोड बोलत होते व त्यांच्या गोड बोलण्याच्या रंगाना ती भुलत गेली.

एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर महेशने सांगितले की पुढच्या महिन्यात त्याला कंपनी अमेरिकेला दोन वर्षांकरता पाठवत आहे. तेव्हा संध्या ही त्याच्या बरोबर जायचा विचार करत होती. पण महेशने हप्ते भरायचे आहेत, तेव्हा नोकरी सोडून कसं चालेल असा विचार करून तिला थांबवलं व त्याचं तेथे राहणं लांबलं तर नंतर विचार करू असे सांगितले. 

त्याच्या तिथल्या वास्तव्यालाही दोन ची चार वर्षे झाली. पण त्याने काही ना काही कारण सांगून संध्याला बोलावलं नाही. 

संध्याची ही बदली दूर झाली. रोज अप डाऊन करणे शक्यच नव्हते. मग ऑफिस जवळच एक रूम घेऊन ती तिथे राहू लागली. असे सहा महिने गेले. तिचे सासू सासरे आम्ही गावी जाऊन राहतो थोडे दिवस म्हणून गेले. ही एकटी पडली. आईवडिलांचे कर्ज काही परत करू शकली नाही याची खंत मनात राहिली. त्यांनी ही पैशावर पाणी सोडले होते. आपण फसवले गेलो याचे दुःख करत राहिले पण पोरीला झळ लागू दिली नाही. 

एक दोन महिन्यांनी ती आपल्या फ्लॅटवर आली तेव्हा त्या फ्लॅटमध्ये दुसरेच कोणी राहत होते. महेशच्या आईवडिलांनी तो त्यांना विकला होता, ते ही महेशच्याच सांगण्यावरून. तिचे सासू सासरे ही अमेरिकेला महेशकडे गेल्याचे तिला कळले. महेशने तेथे दुसरे लग्न केल्याचेही तिला कळले. हे सगळं एकुन संध्या हताश झाली. जुन्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिला हे ही कळले की तिची बदली महेशच्या विनंती वरूनच केली होती. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर ती अर्धमेल्यासारखीच झाली. म्हाताऱ्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून तिने सगळ्या गोष्टी स्वतःशीच ठेवल्या. साधा सरळ दिसणारा माणूस पैशांकरता रंग बदलत तिला फसवत राहिला व त्याच्या फसव्या प्रेमात ती फसत गेली. स्वतःलाच नाही तर तिच्या आईवडिलांना ही फसवले याचे तिला खूप दुःख झाले. महेशच नाही तर त्याचे आईवडिल ही तसेच! एकाच माळेचे मणी. त्यांच्या त्या फसव्या रंगाच्या माळेत ती गुरफटत गेली. मैत्रिणींनी कोर्ट कचेरीचा सल्ला दिला. पण कोर्ट कचेरी करून फक्त आपले पदरचे पैसे जातील आणि आपली बेअब्रू होईल म्हणून ती गप्प राहून नशीबालाच दोष देत राहिली.

     


Rate this content
Log in