Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

प्रवास

प्रवास

18 mins
991


लातूरचे राज्यस्तरीय काव्य संमेलनात पुढील काव्य संमेलन दीपक सकपाळ यांच्या गावी घाटंजी येथे होणार हे निश्चित झालं, आणि तेंव्हापासूनच मनात हे गाव नेमकं कुठं आहे याचा शोध सुरू झाला. खर्चाच्या दृष्टीकोनातून, तेथील परिसरातील परिस्थितीचा आढावा आणि रेल्वे की, खाजगी गाडीने कोणता रस्ता जवळचा यावर चर्चा सुरू झाली. त्यात भरीस भर म्हणजे दिवाळीच्या सणाचे दिवस. मग रेल्वेचे तिकीट मिळेल का? तर याच उत्तर नाही असं आलं. मधून मधून दीपक दादांचा फोन येई. दादा कसं ठरलंय. कोण कोण येणार म्हणजे तसे नियोजन करायला. हो सर...आमचं येन तर नक्की , पण रेल्वेचे तिकीट मिळत नाही म्हणून खाजगी गाडीने येण्याचा विचार सुरू आहे. गुरू सर आणि बाविस्कर सर आणि मी यासाठी एकमेकांच्या संपर्कात आहोत. आता किती कवी येतील हे आताच सांगता येणार नाही. म्हणून थोडं मनातलं सांगतो. 

रेल्वेचं तिकीट मिळालं असतं तर, येणारी संख्या वाढली असती. त्यात दूरचा प्रवास, म्हणजे प्रवास खर्च आला. दगदग होणार, आणि तिथं जाऊन फक्त एक कविता वाचणार मग एका कवितेचा खर्च होणार चार-पाच हजार असे नाना विचार मनात येऊ लागले. आता लोक येतो म्हणतील आणि ऐनवेळी अचानक काही कारण सांगून यातले काही आले नाही तर? म्हणून गुरू सरांना व्हाट्स अप न करता फोन केला. असं व्हाट्स अपवर टाकलं तर, लोक म्हणतील तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? झालं का.... म्हणजे फुकटचा वाद आणि चर्चेला उधाण येणार म्हणून हा खुसकीचा मार्ग बरा... गुरू सरांना हे माहित नव्हतं असं नाही पण, सर्वानुमते निर्णय झाला म्हणजे बरं दुसरं काय?

सतरा आसनाची खासगी बस करण्याचे नक्की झाले आणि या बसमधून कोण-कोण प्रवास करण्यास तयार आहेत किंवा कोण येणार आहेत, त्यांनी आपली नावे आणि दोन दिवसात गुरू सरांच्या खात्यात २००० रुपये जमा करावे असा व्हाट्स अपवर गुरू सरांचा संदेश आला. आता चर्चा संपली होती. काही कवींनी त्वरित पैसे खात्यावर जमा केले, पण सर्व पैसे आल्याशिवाय बस मालकाला कसं सांगणार हा प्रश्न होता.....


झाले नाव तर सतरा लोकांची आली पण पैसे तर, दहा बारा लोकांचेच आले आता. बस ठरवली असे सांगून झाले होते. गुरू सरसारखे संदेश पाठवीत होते पण, लोक आपापली करणे देत होते. प्रत्येकाला अडचण असते हे आम्हालाही माहित होते. प्रश्न आहे पैशाचा. रक्कम मोठी आहे. संख्या मर्यादित आहे. यातून एक कवी जरी कमी झाला तर, तो आर्थिक भार इतरांवर येणार होता म्हणून गुरुसरांनी आज संध्याकाळ पर्यंत पैसे खात्यात जमा झाले नाही तर, बसने जानं रद्द करून दोन वेगवेळ्या गाड्या किंवा यातलेही काही ऐनवेळी आले नाही तर एक गाडी करून आम्ही चार पाच लोक जाणार....असे कळविले....त्यांतर आणखी एक दोन कवीचे पैसे आले. तरी गोंधळ आहेच. मग नाशिक येथून दोन कवी येणार असे समजले. आता बुडत्याला काडीचा आधार मिळावा असं झालं, आणि आता आकडा पंधरा झाला. आणि सोळावा कवी हे राज्यपातळीवरील सभासद असल्याने ते नक्की येणारच असे त्यांनी कळविले. 


सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तस्स झालं आणि खरंच तसंच झालं अचानक तब्बेतीच्या कारणास्तव त्यांचे येणे रद्द झाले तरी, आम्ही ठरल्याप्रमाणे चौदा कवी ठाणे, मुंबई, नवीमुंबई महाड येथील कवी एकत्रितपणे शाळेतल्या मुलाना जसं स्कूल बस एकेक मुल घेत-घेत निघते, तसं गुरूसर एकेक कवी मुंबईतून.. परेल, दादर, ठाणे, असे घेत घेत भिवंडी बायपासला सकाळी सव्वा सहा वाजता कल्याण उल्हासनगरच्या कवींना घेण्यासाठी आले. आम्ही सकाळी सहा वाजताच तिथं हजर होतोच. आता शहपूरचे दोन बालकवी आणि पाण्याच्या बाटल्या घेणं बाकी होतं. रस्ता एकदम टकाटक असल्याने त्यात बस चालक तरुण मग काय वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करावी तशी गाडी धावू लागली. त्याच बरोबर बसमध्ये मी कसा आणि मी कशी सकाळी उठून इथपर्यंत आले या चर्चेला उधाण आले होते. कोण काय बोलतो हे काहीच कळत नव्हतं पण, जसं काही कुठल्या तरी, युद्धभूमीवर लढाई जिंकून आल्याच्या अविर्भावात प्रत्येक कवी आपल्याला रात्रीच्या झोपेपासून ते सकाळी मी कसा जागा झालो किंवा झाले याची कहाणी जीव तोडून सांगत होते. मला किती त्रास झाला. मी किती अडचणींवर मातकरून आलो आणि आले या गप्पा संपायच्या आताच शाहापुर आलं, आणि अर्धवट लढाई सोडून आपापली शस्त्र बसमध्ये ठेवून सर्वच खाली उतरले.


मग आमच्या बसच्या प्रवास उदघाटन सोहळा पार पडला आणि बाविस्कर सर पुढील सीटवरून मागील बाल्कनीतल्या सीटवर बसतो म्हणाले. मलाही खूप आनंद झाला. कारण लहानपणी शाळेच्या सुरुवातीपासून मी पहिल्या बाकावर बसत असे पुढे ही महाविद्यालयात आणि नोकरीत असताना ज्या ज्या वेळी काही कार्यक्रम समारंभ असतील तेंव्हा पुढेच बसत असे, काही वेळा प्रोटोकॉल का काय म्हणतात त्यानुसार जागा बदलावी लागे. असो तर सांगासयचा मूद्दा असा की, आता आमच्यात दोन बालकवी सामील झाले होते. आता त्यांची लग्न होऊन त्यांनाही बालके होती. म्हणजेच आता कोणा बाप झाले होते पण, वयाने आमच्यापेक्षा लहान म्हणून तसं म्हटलं. ही दोन्ही बालकवी जेवढे वयाने लहान होते तेवढेच ते आचार विचारनी मोठे होते. हे फेक नाही हो खर आहे. कारण या दोघांना मी दोन तीन वर्षापासून अनेक संमेलनात पाहत आलो आहे. ते माझ्यापेक्षा खूप लहान म्हणजे माझ्या मुलाचे वय आणि त्यांचे वयोमानसारखेच असेल मी, त्यांना कधी वय विचारले नाही. कारण त्याच्या विचारात आणि माझ्या विचारात साधर्म्य असावे असे वाटले. माणसं एकमेकांचे मित्र होतात केंव्हा होतात. जेंव्हा त्याचे विचार एकमेकाशी जुळतात. नाही तर, माणसाना शत्रू जास्त असतात. आणि समविचारी माणसं एकमेकांचे मित्र होतात हे मला माहित आहे. नव्हे मी अनुभवले आहे. 


या जीवन प्रवासात अनेक माणसं भेटतात आणि पुन्हा आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतात पण, इथं तसं झालं नाही. म्हणून म्हणालो.


अजूनही गाडीमध्ये कवी-कवयित्रींच्या गप्पा सुरूच होत्या. सकाळी कशी धावत सुटले, अचानक गाढ झोप लागली, कोण म्हणतो मला झोप आलीच नाही, अ रे मग अलार्म लावायचा, तर त्याच वाक्य तोडत अ रे बाबा आराम वाजलाच नाही तर?.... गेली का बस म्हणजे एकामुळे सर्वांना त्रास.. नको ना.. त्यापेक्षा एक दिवस जागे राहील तर, काय झालं.

आता आपण सर्व बसमध्ये आलोत ना झालं तर, त्या गप्पा जरा बाजूला ठेवून बसमधील कवी संमेलन करू या. बुजुर्ग कवी अशोक जाधव सरांनी सुचविले. आता मैफिल जमलीच आहे तर, होऊन जाऊ दे सगळ्यांनी होकार दिला, कविता म्हणायाची की, गाण्याच्या भेंड्या खेळायच्या यावर तू तू मै मै सुरू झाले. आणि मग दोन गट करून गाण्याच्या भेंड्या खेळूया असं ठरलं आणि ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरस्करांच्या अंगात देवानंद संचारला.... एका चढ एक गाणी दोन ओळींची का होईना पण सारेच गाऊ लागले. कवी अशोक जाधव आणि बाळासाहेब तोरस्कर यांनी तर कमाल केली. एकेक अफलातून गाणी, गझल, कधी हिंदी तर कधी मराठी सिनेमातील गाणी जीव ओतून गात होते. या वयात ही मांडळी खणखणीत आवाज गात होते. ही सारी गाणी ऐकून आम्ही पुन्हा बालपणीच्या त्या रम्य आठवणीत रमलो. प्रत्येक कवी आपापल्या गटाची बाजू सावरून धरीत होता. जसं काही कोणी मोठं बक्षीस आपल्याला प्रदान करणार आहे. एक प्रकारची स्पर्धा वाटावी अशी भेंड्याची मैफिल रंगली. कोणीच मागे हाटेना. 


आता घशाला कोरड पडली होती म्हणून जरा घसा शेकवावा अन छानसं हॉटेल पाहून बस थांबून चहाच आस्वाद घेऊ या असं ठरलं. पण गप्पा मात्र भेंड्यातील गाण्याच्या सुरू होत्या. आपापली वय विसरून आम्ही आता लहान बालके झालो होतो. कुरघोडी करण्याचं ते बालपण पुन्हा एकदा या प्रवासात जगत होतो. चहा पिण्यासाठी उतरले पण खुर्चीत कोणीच बसले नाही उभ्या-उभ्याच गप्पा करत चहाचा आस्वाद घेतला. सकाळचा थंडगार वारा अंगाला झोंबत होता आणि चहाची गरम वाफ त्या वाऱ्याच्या झुळकीन लयदार डुलत अवकाशात विलीन होत होती. 


कसारा घाटातला थंडगार वारा आणि चहाची ती गोड चव तोंडात जिभेवर असताना बस घाटातील वाकडी तिकडी वळणे बेदरकारपणे पार करीत धावत होतो. निसर्गातील फुल झाडांचा आणि गवताचं गंध दरवळ होता. पाऊस पडून बरेच दिवस झाले होते म्हणून निसर्गाने आता बाळसे धरले होते. हिरवीशाल पांघरून जसं नव्या नवरीन नटावं तसा निसर्ग नटला होता. हे सारं निसर्गाचा देखणं रुपडं बसमध्ये बसून आम्ही पहात होतो.

आता घाट संपला होता. आणि घोटीपासून सिन्नर मार्गे बसने फिरली तसं आम्ही फिरलो. बस जशी हलू डोलू लागली. आणि तिच्या तालावर आम्ही ही डोलू लागलो. रस्ता असा नंबरी होता की, खड्डा कुठला आणि रस्ता कुठला हे बस चालकाला कळेना म्हणून बस खड्डे चुकविताना डान्स करीत होती त्यामुळं मनात नसतानाही आम्हालाही गरबा करावा लागत होता. असं वाटायचं एकदाच पायी चालावं. आपण सगळ्या प्रकारचे कर देऊनही सरकार आपलं काम धड करीत नाही म्हणून सरकारवर आगपाखड सुरू झाली. एकेका धोक्याला एकेक शिवी सरकार नावाच्या गेंड्याची कातडी पांघरलेला नेत्यांच्या नावानं लाखोली वाहून झाली. तोंडातल्या शिव्या-शाप देणं संपलं पण रस्ता काही संपायचं नाव घेईना. बस चालकाची ही खरी परीक्षा होती चुकून एकदा खड्डा चुकविताना पुढच्या गाडीला धडकण्याची किंवा बाजूच्या खड्यात पडण्याची भीती होती. अशी जीवघेणी तारेवरची कसरत म्हणजे जसा काही डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता.


एकदाच सिन्नर आलं आणि पंधरावा कवी आपलं साहितत्याची पिशवी घेऊन बसमध्ये चढला. आता आमच्या कवींची संख्या तरुणपणात पदार्पण करती झाली होती. हा कवी तसा जास्त परिचित नव्हता पण, अजून कॉलेजमध्ये शिकतो आहे. म्हणजेचं तरुण मूलं साहित्याकडे वळू लागली आहेत. असं वाटल. त्यांला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून मस्ती सुरु होती. नाही तर, ते मन मोकळं कसं करणार. एकूण पंधरा कवी-कवयित्रींना काफिला सोबत घेऊन आमची बस घाटंजीच्या दिशेने निघाली पण, रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक अडथळ्यांना समोर जात धक्के खाऊन अंग चांगलंच ठेचून आणि शेकून निघत होत, त्यामुळे वेळ वाया जात होता. या धक्का-धक्कीच्या आणि गाडीच्या हेलकाव्याने पोटात कावळे कोकलू लागले म्हणून प्रत्येकाने दिवाळीचा सोबत आणलेला फराळ म्हणजे कोणी शेव, चिवडा, भेळ, चकली, लाडू, जे काही आणले होते ते. आपापल्या पोतडीतून हळू हळू एकेक पदार्थ बाहेर येऊ लागले. आणि काही कालावधीत संपले ही, मग मोर्चा वळाला प्रमोद बाविस्करांच्या इडली चटणीकडे, पहिल्या घासात चव समजल्यावर गाडी जरा साईडला घेण्यात आली, कारण आम्ही पंधरा लोक रानात जनावर चरायला सोडावी तसे चरत होतो. आणि बस चालक बिचारा उपाशी होता हे दृश्य बरे दिसले नाही. म्हणून त्याच्या पोटात दोन घास जातील. इतक्या चविष्ट इडली चटणी खाऊन झाल्यावर जीभ आणखीन चवताळली, पण इडली संपली होती. मग मस्त पाणी पिऊन पुन्हा नव्यानं प्रवासाला सुरुवात झाली.....आणि काही अंतर गेल्यावर आता ऊसाच्या रसाची रसवंतीगृह दिसू लागली. मग पुन्हा एक झाडाखाली गाडी उभी करून ताजा ताजा रस पिऊन घेतला. जरा पाय मोकळे करून झाल्यावर पुन्हा बस निघाली ते थेट औरंगाबाद गाठलं. 


कवी अशोक जाधव सरांनी थांबण्यासाठी सांगितलं म्हणून एक चहाच्या टपरी जवळ थांबलो. तिथे त्यांचे जुने मित्र त्यांना भेटण्यासाठी येणार होते आणि जाता जाता जुन्या भेटीत उजाळा मिळणार होता. जाधव सरांचे मित्र सांगितल्याप्रमाणे खरोखर आले पण, येताना बिस्लरी पाण्याच्या बाटल्या घेऊन आले. सर्वांच्या गाठी भेटी झाल्या आणि म्हणाले, आता आपण चहा घेऊ या... आमच्या जवळ जेवण तयार होतं, म्हणून त्यांचा इतर पाहुणचार न घेता आम्ही निघालो. पुढे आम्हाला जेवणासाठी थांबायचे होते. आमच्यातील एक ज्येष्ठ कवी ज्यांना आम्ही आदराने नाना म्हणतो त्यांच्या पत्नीने म्हणजे, नानीने सकाळी प्रवास सुरु होण्या अगोदर रात्री तीन वाजता उठून ८० गरम गरम चपात्या करून दिल्या होत्या. नाना-नानीच्या प्रेमाच्या चपात्या आमची वाट पक्षात होत्या पण, आम्हाला रस्त्याच्या कडेला जेवणासाठी चांगली जागा मिळत नव्हती अखेरीस राजा शिव छत्रपतींच्या आईचे गाव सिंदखेड राजा गाव आले, तरी म्हणावी अशी जागा मिळेना सिंदखेड गेल्यानंतर काही अंतरावर एक मोकळी जागा दिसली आणि नानीच्या चपात्या आणि तरुण बालकवी मुकेश विशे यांनी आणलेली बटाट्याची भाजी बरोबर इतरांनी आणलेल्या चटणी, लोणची, मिरचीचा ठेचा यावर सपाटून ताव मारला. 

हो... खूप जोराची भूक लागली होती आणि वेळी खूप झाला होती. दुपार केंव्हाच तळून गेली होती. दिवस मावळतीकडे झुकला होता. जवळ जवळ संध्याकाळचे चार वाजून गेले होते. गप्पा गोष्टींच्या नादात हे कळले नाही पण, अजून बराच पल्ला गाठायचा होता. म्हणून पटापट जेवण उरकले आणि पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे गेल्यावर अनेक गाव शहर लागली त्यात सध्या झी टीव्हीवर जी बाळूमामा ही सिरीयल सुरू आहे, ते बदनापूरगाव लागलं. तिथं न थांबता पुढील प्रवास सुरु केल. 

गावा मागून गाव मागे टाकत करंजा गावात गबस उभी केली. तेंव्हा रात्रीचे आठ वाजले असतील. तिथं आम्ही चहा घेतला. आता थोडी थोडी थंडी जाणवू लागली होती. उबदार कपडे होते पण ते गाडीच्या मागील बाजूला डिकीत होते. काहींनी निघतानाच उबदार कपडे जवळ ठेवली होती. त्याचा त्याना उपयोग होत होता. साडेपाच वाजता निघाले होतो पण आता रात्रीचे नऊ वाजले तरी, नियोजित स्थळ येईना मिट्ट काळोख दाटला होता. मधूम मधून दीपक सकपाळ सरांचे फोन बाविस्कर सरांना येत होते. आपण कुठे आलात, याची विचारपूस होत होती. रस्ताही चांगला होता. 


यवतमाळ येथे दीपक सरांचे मित्र श्री. पठाण सर आम्हाला नेण्यासाठी थांबले होते. म्हणून जरा जीवात जीव आला. कारण तिकडे म्हणतात एका वाघिनेने खूप लोकांचा जीव घेतला होता. ती मेली पण तीच पिल्ले आणि वाघ असेल तर?.....रस्ता निर्मनुष्य होता. कधीतरी एखादे गाडी येई. गुरूसरांनी इंटरनेट जोडून रस्त्याचा नकाशा पाहून कुठं-कुठं डाव्या की उजव्या बाजूला वळायचे, कसे जायचे कसे ते सांगत होते. आता कोणाला कविता आठवत नव्हती मनातेकच विचार होता घाटंजी बस्स ....


एकदाचं यवतमाळ आलं दीपक सरांचे मित्र ही भेटले. आता आपण जवळ-जवळ आलो आहोत हे मनाला पटत होत. एकामागे एक गाड्या निघाल्या होत्या.....२२-२३ तासांचा प्रवास करून दीपक सरांच्या घरी पोहचलो. तेंव्हा रात्रचे एक वाजला होता. तिथं दीपक सरांचे सर्व कुटुंबीय आमच्या स्वागतासाठी रात्रीच्या एक वाजता उभे होते. सोबत पी नंदकिशोर सर, राज्य सदस्य, नवनाथ गाडेकर, अध्यक्ष-पुणे जिल्हा ही मंडळी उपस्थित होती. दिवाळी सणाचे दिवस असल्याने दीपक सरांचे घर, घर कसले एक प्रकारचा बांगला होता तो. लाईटच्या रोषणाईने खूप सुंदर सजविला होता. आम्ही आल्याचा आनंद रामयणातल्या भरत भेटी सारखा अनुभवला. आम्ही बसमधून खाली जमिनिवर पाय ठेवतो ना तोच कडकडून मिठी मारून दीपक सर आणि पठाण सर यांनी आलिंगन दिले. मनाचे मनाशी मिलन झाले. खूप आनंद झाला. 

    

एवढ्या रात्री आम्हाला गरम गरम जेवण वाढले मनसोक्त जेवलो आणि एक सुंदर अशा बंगल्यावर सर्वांची राहण्याची सोय केली होती तिथं जाऊन गाढ झोपी झोपलो ते सकाळी रानातल्या चिमण्या पाखरच्या किलबिलाटाने जाग आली. रात्री आलो तेंव्हा काही कळले नाही. पण आता पहातो तर एका सुंदर राज महालात असल्याचा भास झाला. हिरव्यागार वनराईत एका टेकडीवर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे रिसोड होते. त्यामुळे तिथं कसलाही गडबड गोंधळ नव्हता. ती निरव शांतता, पक्षांचे मंजुळ आवाज. झाडाच्या अडून उगवतीकडून सूर्यदेव मंगलमय वातावरणातील परिसरावर आपली सोनेरी किरण पसरवीत होता. आणि आमच्यापैकी काही कवी त्या सोनेरी क्षणाचे फोटो काढण्यात मग्न ते तर काही सकाळचा प्रत्यविधी उरकून अंघोळीसाठीची लगभग सुरू होती. मी ही त्या उंच बंगल्याच्या सज्यातून हे सर्व पाहात होतो. आमचे मित्र प्रमोद बाविस्कर सर, छानपैकी ड्रेस करून एखाद्या लग्नात नवऱ्या मुलाच्या बापाने सजावे तसे भासत होते. त्यांच्या सोबत राज्यातून आलेली काही कवी मंडळी त्या नयनरम्य परिसरात मनसोक्त सकाळच्या गुलाबी थंडीचा गोडवा अनुभवत तिथच फेरफटका मारत होते. हे मी पाहिलं आणि मी ही पटकन अंघोळ करून त्यांच्या मैफिलीत सामील झालो.

   

आता सकाळचे आठ साडे आठ वाजले होते. सर्व राज्यातून आलेली कवी मंडळी संमेलन स्थळी जथ्या जथ्याने येऊ लागली होती. दीपक सरांनी कॉलेजच्या आवारात चहा नाश्त्याची सोय अगोदरच करून ठेवली होती, आणि स्वतः सर्वांच्या आधी सन्मा. आनंद घोडके सरांच्या सोबत तिथे स्वागतासाठी उभे होते. केवढे आदरातिथ्य. आज सख्या नात्याचा माणूस जवळून गेला तरी, एकमेकांची तोंड पाहात नाहीत की साधं कसा आहेस भाऊ... एवढं विचारीत नाही... तिथं कोण हे.... आनंद घोडके सर, ....कोण दीपक सर, ....रामदास सर, ....कृष्णा सर, ...सोनवणे सर, ...काय त्यांचं आमचं नातं होतं..... पण माणसं मनाची मोठी होती..... दीपक सरांनी त्यांच्या वडिलांची ओळख करुन दिली.... आणि माझ्या गतकाळातील आठवणी जाग्या झाल्या. मनात गलबलून आलं पण, व्यक्त करण्याची ती जागा नव्हती. संत गाडगेबाबा यांची परंपरा आणि वारसा चालविणारे दीपक सर हे गाडगे बाबांचे नातू. आजच्या काळात बाप हरवत चाललेल्या जमान्यात दीपकसरांनी प्रथम आपल्या बापाची ओळख करून दिली. या वयात म्हातार्या बापाला आणखी काय हवं असत. दीपकसर माझा सलाम आहे. आपल्या पितृ प्रेमाला. आज असा दुर्मिळ होत चालला आनंद, ..... आनंद घोडकेसरांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे प्रेरणेने अनुभवायला आणि डोळ्यांनी पहावयास मिळतो आहे. या सारखे दुसरे सुख ते कोणते.

    काही लोक म्हणतात दोन-तीन मिनिटाची कविता सादरीकरणात चार-पाच हजारखर्च करण्याचा म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. पण हे वेडेचं इतिहास घडवितात. हे माहीत असूनही ही लोक असं बोलतात म्हणजे वेड घेऊन पेडगावाला जाण्यासाख नाही का? 

    

संमेलनाच्या हॉलमध्ये सनईचे मंजुळ स्वर आता ऐकू येऊ लागले होते. चहा-नाष्टा करून सर्व कवी मंडळी आपापल्या जागेवर आसनस्थ झाली होती. संयोजक स्टेजवरील माईक तपासून घेतला. आणि नमस्कार मंडळी...... असा पुकारा झाला.

कविसंमेलनासाठी आलेले काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे सन्मा आनंद घोडके सर प्रमुख राज्य प्रशासक आणि सर्व राज्यसदस्य मंडळी स्टेजवर विराजमान झाले. सभागृहात टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली. 

आता सर्व मान्यवर सरस्वती पूजनासाठी व्यासपीठाच्या खाली आले आणि अचानक माझ्या नाव पुकारून मलाही त्या सरस्वती पूजनात समाविष्ठ करून घेतलं एवढंचं नाहीतर सरस्वतीपूजनांतर मी माझ्या जागेवर सभागृहात बसलो असताना पुन्हा ज्येष्ठ कवी राजेशजी साबळे सर आपण व्यासपीठावर यावे अशी सन्मानाने बोलविण्यात आलं मलाही सारं नवीन होतं. त्या व्यासपीठावर बसण्याचा मान माझा नव्हता. पण हा अचानक झालेला माझा सन्मान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अनेकांच्या यामुळे भुवया उंचावल्याही असतील तर, काहींना मनोमन आनंदही झाला असेल. मला अजूनही हे कळलं नाही की, मला हा मान का दिला? याबद्दल सन्मा आनंद सर आणि दीपक सर यांचा मी, शतशः आभारी आहे. धन्यवाद सर!!!

   

आता राज्यातून आलेल्या कवी मंडळींच्या स्वरचित कविता सादरीकरण कार्यकम सुरू झाला होता. पुन्हा जिल्हा प्रमुख कवींना व्यासपीठावर यावे असे संयोजकांनी सुचविले आणि ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून मी, व्यासपीठावर आलो. आणि काय आश्चर्य इथंही मला प्रथम कविता सादर करण्याचा मान मिळाला. 

मी, गोंधळून गेलो होतो. मला वाटले. सर्व जिल्हा प्रमुख व्यासपीठावर बसून कविता सादर करणाऱ्या कवींचा सन्मान करण्यासाठी आम्हाला इथे पाचारण केले आहे, पण झालं वेगळंच. आता कोणती कविता सादर करावी माझी बॅग तर, खाली सभागृह होती. काय करावं सूचना तेवढ्या दीपक सर, सभागृहातून उभे राहून म्हणाले.

सर, दणका होऊ द्या. आता आली का पंचाईत. शर्टाच्या खिशात हात घातला दोन तीन कागद हाताला लागले मनात म्हटलं जो पहिला नजरेत येईल ते म्हणू या आणि हाती कागद आला तो 'तिरंगा कसा दिसावा'.....आज माझं भाग्य माझी पाठ सोडीत नव्हतं. लोकांच्या पाठी दुर्भ्ग्य लागत माझ्या पाठ्शी भाग्य धवून येत होत. एकामागून एक आनंदाचे धक्के बसत होते. 

कविता दमदार झाली हे सभागृहातील वरवरणावरून जाणवले होते. दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम होता. दुपारची जेवण झाली. आणि पुन्हा माझ्या नावाची व्यासपीठावरून घोषणा झाली. ती होती दिवाळी सणाच्या निमित्ताने काव्यप्रेमी शिक्षक मंचने आयोजित केलेल्या कवितेच्या निकालाची. तिथं ही माझ्या कवितेला सर्वोत्कृष्ठ पुरस्कार प्राप्त झाला. क्रिकेटच्या मैदानावर जसं एखादयाने धावांचा डोंगर रचावा अगदी तस्स झालं. खूप खूप आनंद झाला. आज माझ्या कवितेचा सार्वत्रिक सन्मान झाला होता. यापेक्षा कवीला दुसरे काय हवे असते.

संमेलन रंगात आले होते आणि आता त्याची सांगता होण्याची वेळ होत आली होती. सूर्य मावळतीकडे झुकला होता. पश्चिम दिशाला तांबूस लाल रंगाने वेढले होते. आणि आम्हाला ही आता माहूर गडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेण्याची आस लागली होती. असे कळले होते की, या घाटंजी स्थळापासून जवळ माहूर गडावर रेणुका मतेच मंदिर आहे. आणि देवतांच्या साडेतीन पीठांपैकी हे एक अति महत्वाचे स्थान आहे. आता इकडे आलोच आहोत मग मातेचं दर्शन घेऊन पुढील परतीचा प्रवास करावा आणि आम्ही सायंकाळी पाच वाजता कवी संमेलनातून सर्व मान्यवरांचा निरोप घेऊन रेणुका मातेचं देर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झालो. 


मजल दर मजल करीत गडाच्या पायथ्याशी रात्री आठ वाजता सुखरूप पोहचलो तर, कळले की,मंदिर साडेआठ वाजता बंद होते. मग आधी दर्शन मग राहण्या-खाण्याचे पाहू असे सर्वसनुमते ठरले आणि आमची बस गडाच्या चढणीला लागली....

बरेच अंतर आल्यावर गडाच्या पायऱ्या दिसू लागल्या. चालकाने बस बाजूला उभी केली आणि आम्ही सर्व गडाच्या पायऱ्या एकदम दमात चढून गेलो. थोडासा थकवा जाणवला पण, मातेचे नाव घेऊन पुन्हा एकेक पायरी पार करीत मंदिराच्या आवारातून सरळ गाभाऱ्यात प्रवेश केला. कुठेच रांग लावण्याचा प्रश्न आला नाही. मनात असेल सारं कसं मनासारखं होतं म्हणतात त्याचा पुन:प्रत्येय आला. 


रेणुका मातेचं दर्शन झालं आणि आठवलं की, आज आपली साडेतीन पिठाची यात्रा पूर्ण झाली. या अगोदर असच मित्रांच्या सोबतीने, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, ही पूर्ण पीठ आणि वणीची सप्तशृंगी माता हे अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. आता माहूर गडाची माता रेणुका हे पूर्ण पीठ पाण्याचा दर्शनाचा योग जुळून आला......

आता वेध लागले जेवणाचे आणि झोपण्यासाठी राहण्याची जागा. गडावरून खाली येताना एका कोपऱ्यावर ठाकूर लॉज दिसले तिथं गुरूसर, प्रमोदसर आणि मी, चौकशी करण्यासाठी गेलो. आणि आमची राहण्याची चिंता मिटली...


सकाळी सहा वाजताच ही माहूर सोडले आणि परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. आणि काही अंतर आल्यावर बाळासाहेब तोरस्कराना त्यांना सासूबाईंनी भेट दिलेले किंमती ब्लॅंकेट विसरल्याचे लक्षात आले. गाडीत एकच हश्या पिकाला. त्यावर अनेकांनी नको नकोत ते प्रश्न विचारून तोरस्कराना भंडावून सोडले. खूप मजा आली एक ब्लॅंकेटवरून एवढी मजा येते, हे ही अनुभवले आणि प्रमोदसरांच्या लक्षात आले की, रात्री आनंद घोडकेसर आणि त्याचे सोलापूरचे सहकारी माहूर येथे आले आहेत, कारण आम्हीच त्याची खोली आमच्याच लॉजमध्ये बुक केली होती. प्रमोदसरांनी तातडीने घोडकेसरांना फोन लावला. आणि घडलेली घटना सांगितली. त्यांनीही ताबडतोब जाऊन ते तोरस्करांच्या सासूचे म्हणजे आता तोरस्करांचं ब्लॅंकेट ताब्यात घेतल्याचे कळविले. ...पण आमचं कवी मंडळ एवढ्यावर गप्प बसेल तर ना... आता ब्लॅंकेट मिळाले म्हणून तोरस्कारांनी सर्वाना पार्टी द्यावी यावर चर्चा रंगली ती इतकी की, या कालावधीत आम्ही जगप्रसिद्ध लोणासर सरोवराच्या आसपास केंह आलो हे कळले नाही. सकाळ पासून पोटात काही नाही. एका चहाच्या कपावर हा प्रवास सुरु होता. मग चहाची टपरी पाहून आम्ही थांबलो चहा-नाष्टा झाला आणि पुढे आल्यावर रस्त्यावर एक बोर्डवर लोणार १६ किमी असे होते. आता जवळ आहे तर, पाहून घेऊ पुढे आणखी काहीतर गेल्यावर एक चौक लागला तिथं चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, डाव्या बाजूला १० किमी अंतरावर हे सरोवर आहे. 


आम्ही मुख्य रस्ता सोडून लोणार गाठले. निसर्गाचा अदभुत चमत्कार डोळे भरून पाहिला. हे कसं घडलं असेल त्यावेळी इथं वस्ती असेल का मग असेल तर त्या मानवाचे काय प्राणी, पक्षी झाड लहान मोठे जजीव जिवाणू याचं के झालं असेल या विचारात आम्ही तिथून बाहेर पडलो. त्याचा पुरावा म्हणून काही फोटो काढले होते. 

आता पुन्हा १० किमी मागे जायचे की, पुढे हे तेथील व्यक्तीला विचारून घेतले तर ,असच सरळ जावा म्हणे, हा शॉर्टकट सिंदखेड राजकडे जाणारा रस्ता आहे. दुधात साखर म्हणतात हे हेच आम्हाला माता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते आणि रस्ताही तिकडेच जाणार होता. आता रस्ता जात नाहीतर आम्ही त्या रस्त्यावरून जाणार होतो.

एकदाचे सिंदखेड आले. गुरूसर, प्रमोदसर, आणि मी आधी बसमधून उरलो, लगेच जिजाऊंच्या समाधी स्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच आपण शीतलताई सोबत आहेत का? अनोळखी व्यक्तीने प्रश्न केला. 


‘हो हो पण आपण कोण? ‘आम्ही ओळखलं नाही. मी म्हणालो.

‘मी, शिवाजीराजे जाधव जिजाऊंचे १७ वे वंशज’ अनोळखी व्यक्तीने अशी ओळख दिली की, आम्हीच धन्य झालो. प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. शिवाजीराजे जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत संपूर्ण परिसर, जिजाऊंचे समाधिस्थान या बद्दल आम्हाला माहीत नसलेली माहिती ही सांगितली. पुष्कळ गप्पा गोष्टी झाल्या. 


या अगोदर जिजाऊंच्या समाधी मंदिराच्या आवारात "राजा कोहिनुर हिरा" ही माझी स्वरचित कविता सर्वांसमोर सादर केली. सदर कविता लगेच तेथील मंडळींनी फेसबुक वर टाकली हा साधासा सोहळा पण, माझ्या जीवनात अतिशय सुखद अनुभव देऊन गेला. धन्य ती जिजाऊ आणि धन्यते शिवराय!!! आज त्यांचे वंशज प्रत्येक्ष भेटले. आणि डोळ्यातून आनंद अश्रू ओघळू लागले. हिंदी स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या या माणसांच्या वंशजांनी मोगलशाही, अदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि टोपीवाला इंग्रज याना त्यांची जागा दाखवून दिली.त्या पराक्रमी घराण्यातील माणसं भेटली. नुसती भेटली नाही तर, शितलताईमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला. जवज जवळ एक तास आम्ही त्यांच्या सोबत होतो. सकाळी मुंबईला निघालेले शिवाजीराव शितलताईच्या एका फोनवर आमच्यासाठी एक-दीड वाजे पर्यंत थांबले आम्हाला भेटले विचारपूस केली. सर्वाला एक मोठ्या वृक्षच्या छायेत बसून स्वतः आमच्या सोबत गप्पा मारल्या पाणी चहाची सोया केली. अशी माणसं जीवाला देणारी भेटली मन भरून पावलं. 


मध्येच त्याच्यापौकी कोणी तरी त्यांना निरोप दिला की, पुण्याचे नाव बदलाचे आहे आपली प्रतिक्रिया पाहिजे. तेंव्हा ते म्हणाले एक अर्धा तास थांबा महाराष्ट्रातून आपल्याला भेटण्यासाठी आलेल्या कवी मंडळीसोबत थोडं बोलतो. मग आपण पुण्याच्या नावाबद्दल बोलू. बघा याला म्हणतात माणुसकी...ही कुठे शिकायला मिळाली.. ती सिंदखेड राजा येथे तीही प्रत्येक्ष जिजाऊच्या माणसांकडून वा रे पठ्ठे जय जिजाऊ... जय शिवराय... अशा विचारी माणसांमुळे जिजामातेने शिवबा घडविला. आणि तो किर्तीमान ही झाला. आज सारं जग शिवरायांचा जय घोष करत आहे....


तेथील मातीची धूळ कपाळ लावून आम्ही सिंदखेदराज सोडलं पण मनात अजूनही त्याच त्याच आठवणीं पिंगा घालतात आणि मन सैरभैर होत....सध्या काही लोक फक्त निवडणुका, किंवा जयंत्या जन्मतिथीला शिवरायांचा आणि जिजाऊंचा जय घोष करतात पण वागणं मात्र तस्स नाही याचा खेद वाटतो.


आम्ही आता औरंगाबाद सोडलं होत. आता जेवायचं होत पण रस्त्याला चांगलं हॉटेल मिळेना सायंकाळचे चार वाजायला आले होते. मला वाटते रस्ता रुंदीकरणामुळे आजू-बाजूची हॉटेल तुटली असावीत. एका ठिकाणी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन मग चौकशी केली तर म्हणे पुढे १०-१२ किमी अंतरावर शिवनेरी ढाबा आहे. बघा, पुन्हा शिवरायांचंच नाव असलेला ढाबा. नावात काय असत.. आपण म्हणतो पण, आज त्याच नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही आमची भूक भागवत होतो....

जेवण आटोपली आणि मुंबईकडे प्रयाण केले. येवला नाशिक, इगतपुरी शहापूर सोडल्यावर आमचं उतरण्याचे भिवंडी बायपाय ठिकाण आलं मुंबईकरांचा निरोप घेत आम्ही खाली उतरलो. बॅगा हातात घेतल्या पुन्हा सर्वांना बाय केलं पण तेवढ्यात गुरूसर गाडीत चढत असताना वरील आडव्या सिटचा लोखंडी रोड गुरूसरांच्या पायाला लागला सरजोराने किंचाळे मी, त्यांना खाली बाजूला घेतलं त्यांना नीट उभ राहत येईना जरावेळ कळ जाईपर्यंत तिथं थांबलो म्हणले... फार दुखतंय हो,... पण जाईन मी, ...आता माझ्यामुळे इतरांना त्रास नको.... आम्ही त्यांना कस बस गाडीत बसवलं. पण मनात गुरसरांना शेवटी शेवटी पायाला लागावं हे पाहून बर वाटलं नाही. गुरसरांच्या अथक परिश्रमामुळे आम्ही आज कवीसंमेलन, माहूरची देवी रेणुकामाता, जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि सिंदखेड राजा येतील शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकलो होतो. मी, घरी पोहचल्याबरोबर गुरुसरांना फोन केला तर म्हणाले सर्वांना व्यवस्थित सोडून आता घरी आलो आहे. ‘आ हो पायाच विचारतोय मी’...

‘हा हा पाय दुखतो हो!! अजून कळ मारतोय मधून मधून’ मी म्हटलं आता घरात हळद मीठ असेल तर, गरम करून लेप लावा, आणि सकाळी डॉक्टरकडे जाऊन या. अंगावर काढू नका. तर, वर मलाच म्हणतात 


‘तुमच्या डोक्याला दुपारी गाडीत चढताना टीव्हीचा कोपरा लागला होता. आता कसं आहे.’ मी म्हटलं ‘आता लागलं म्हणजे थोडफार दुखणारचं की’, मग किंचित हसून म्हणाले. तेवढं सोडलं तर, राजे.... सफर मस्तच झाली ना? आज पुन्हा रात्राचा एक वाजला आहे. कालही आपण रात्री एक वाजताच घाटंजीत पोहचलो होतो. आता झोपा...नाही तर पुन्हा घाटंजी कविसंमेलन सुरू होईल...


Rate this content
Log in