प्रगती सोबत अधोगती
प्रगती सोबत अधोगती
प्रत्येक माणसाला आपआपल्या आवडीच्या क्षेत्रात आपली खुप मोठी प्रगती व्हावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे सर्वकाही साध्य होते असे कधीच घडत नाही. परंतु एखाद्या आशीर्वादाने, सहकार्याने किंवा मध्यस्थीने जर आपले भले झाले, कल्याण झाले तर त्या पदाचा सदुपयोग आपण जनसामान्यांच्या कल्याणासाठी केला पाहिजे.
एकदा का माणूस मोठा झाला की तो मागे वळून पाहताना दिसत नाही. खरे तर मागे वळून पाहणे ही चांगली सवय आहे. जो आपल्या प्रगतीच्या काळात मागे वळून पाहतो, आपल्या हातून बरे होते आहे का बुरे होते आहे हे तपासतो. अशा लोकांचा भविष्यकाळ चांगला जातो. परंतु आज उद्याची चिंता कोणालाही नाही. आज जी संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा जास्तीत जास्त दुरुपयोग करून घेणारे लोकनेते अधिक झाले आहेत. त्यामुळे अशांच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्याने दिसून येतात.
जेव्हा माणूस स्वत:च्या कष्टाने किंवा दुसऱ्याच्या मदतीने प्रगती करतो त्याच सोबत त्या प्रगती बरोबर त्याचीअधोगतीही ठरलेली असते. माणूस जन्मतो, जीवन जगतो. जेव्हा तो रात्रंदिवस फिरत राहतो तेव्हा त्याच्यासोबत त्याची सावली असते. जीवन जगताना सावली असते याचा अर्थ असा स्पष्ट आहे की ती सावली म्हणजे त्याचा तो मृत्यू होय. म्हणजेच जीवन जगताना त्याच्या म्हणजे माणसाच्या सोबत मृत्यू सदैव सोबत असतो. अगदी त्याचप्रमाणे जो प्रगती करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो त्याच्या प्रगतीचा काळ एक ना एक दिवस संपत असतो आणि असा काळ जेव्हा संपतो त्या दिवशी त्याची अधोगतीही सुरू असते. परंतु प्रगतीच्या काळात म्हणजेच सुखा_समाधानाच्या काळात जो दुसऱ्याला सहभागी करून घेतो त्याचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी होते.
आपण कावळा हा घाणेरडा आहे असे आपण संबोधतो. परंतु कावळ्याला एखादी खायची वस्तू दिसते मग ती वस्तू अन्नाची असो किंवा मांसाहारी असो अशा प्रकारचे खाद्य तो कावळा एकटा कधीच खात नाही. त्याचे खाद्ये त्याला दिसल्या बरोबर तो काव-काव करून आपल्या नातेवाईकांना, परिवाराला तो बोलावत असतो. खाताना दुसऱ्या कावळ्याला कधीही चोंची मारत नसतो. जे कोणी येतील त्या सर्वांना त्यात सहभागी करून घेतो. आणि सर्वजण मिळून मिळेल तेवढे अन्नाचा घास घेतो. माणूस असा कधी करतो. अनेक वेळेला घराच्या दारात येणाऱ्या मित्र परवाराला, पाहुण्याला, सोयऱ्याला आपण जेवण करताना तो जर आला असेल तर या जेवण करु या अशी म्हणायची सुद्धा माणुसकी शिल्लक राहिली नाही.
माणसा-माणसात प्रेम आदरभाव राहीला नाही. आपल्या स्वार्थासोबत दुसऱ्याचा ही स्वार्थ जपला पाहिजे. अशी समजूत, असे विचार आज दूर्मिळ झाले आहेत. आपण जीवन जगत असताना दुसऱ्याच्या जीवनाचा विचार करायला हवा.दुसऱ्याचे दु:खात सहभागी होणे, एखाद्याचा मुलगा हुशार झाला तर त्याचे कौतुक करणे, दुसऱ्याच्या चांगल्या गुणांची प्रशंसा केली पाहिजे.याला म्हणतात माणुसकी. वामन मार्गाने कमावलेले धन काही काळानंतर टिकत नाही. म्हणून प्रगती सोबत अधोगती असतेच.!!!!!.
