पळवाट
पळवाट


साधारण १९७९-८० ची गोष्ट. औरंगाबादला शिक्षणासाठी आलेलो होतो. शहरात येऊन २-३ वर्षे झाली होती. बऱ्यापैकी रुळलो होतो.
वसंतराव नाईक कॉलेज त्या काळात अगदी शहराच्या बाहेर, जंगल असलेल्या जागेत. ग्रामीण भागातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अतिशय सहज सुलभ शिक्षणाची सोय असलेलं कॉलेज म्हणून ओळखलं जाणारं कॉलेज. शहरात जायचं म्हणजे पायी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण दुसरी कुठली स्वस्त साधनं नव्हती. ऑटोसारख्या वाहनाने प्रवास करण्यासाठी खिसे तेवढे गरम नसायचे.
ग्रामीण भागातून शहरात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांविषयी गावाकडे फार मोठा आदर त्या काळी असायचा, गावात गेल्यानंतर प्रत्येक जण आदराने चौकशी करायचा, शहरात काही काम असल्यास हक्काने सांगायचे.
त्या काळी १० वी पास झाल्यावर एम्प्लॉयमेंट ऑफिसला नावनोंदणी करावी लागत असे. गावाकडून तेवढ्यासाठी येणे परवडत नव्हते. एक तर खर्च यायचा, दुसरे म्हणजे गावाकडील कामही बुडायचे. म्हणून मग गावातील मुले हक्कानं आमच्याकडे कागदपत्र द्यायची आणि नोंदणी करायला सांगायची. आम्हाला मोठं भूषण वाटायचं हे काम करताना, वाटायचं आपण कुणीतरी मोठे आहोत, कुणाच्या तरी उपयोगी पडतो याचा अभिमान वाटायचा. भलेही त्यासाठी खूप त्रास का होत नाही.
असंच एकदा एका मित्राच्या नावनोंदणीसाठी गेलो. भली मोठी रांग लागलेली. होस्टेलवरून उपाशीच आलेलो. नंबर लागला तोवर दुपार झालेली. साडे बारा वाजले असतील, तेव्हा नाव नोंदणी झाली.
बाहेर निघालो. पोटात कावळे काव काव करत होते. खिशात दहा रुपये होते. पण त्यात महिना पार पडायचा होता. खर्चून जमणार नव्हते. जवळच पाहुण्यांची खोली होती. तिथे जाण्यासाठी निघालो. पायी जात असतांना अचानक एक अनोळखी व्यक्ती भेटली.
"राम राम" समोरून त्या व्यक्तीने नमस्कार केला. मी मागे पाहायला लागलो, "अहो तुम्हालाच" असं म्हणत
त्याने माझं लक्ष स्वतःकडे वेधलं.
"नमस्कार" म्हणत मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागलो.
"नोकरीसाठी फिरताय वाटतं" माझ्या हातात असलेलं कागदाचं वेटोळं बघत त्याचा प्रश्न.
"हो"
" कुठल्या गावचे?"
"लांब तिकडं गणपतीच्या राजूरजवळ गाव आहे माझं, नळणी नावाचं."
"असं का? बरं झालं मी तिकडचाच की! दाभाडीला आरोग्य केंद्रात मी नोकरीला आहे आणि तुमचं नशीब चांगलं, एक जागा खाली झालीय, साहेबांना सांगून तुमचं काम करू शकतो मी"
माझं मन स्विकारायला तयार होईना तसंच सोडायलाही तयार होईना. माझी द्विधा मनःस्थिती त्यानं ओळखली आणि लगेच म्हणाला,
"काळजी करू नकोस, चल आमचे साहेब येथे आलेलेच आहेत भेटून घेऊ" असे म्हणत त्याने एका बंद बंगल्याजवळ नेलं.
"अरे यार! साहेब कुठे बाहेर गेले असतील, येतील थोड्याच वेळात. चल तोवर आपण चहा घेऊत."
त्याने चहाचं नांव काढलं अन् पोटातल्या कावळ्यांनी आवाज करायला सुरू केलं. वाटलं 'आता काही तरी खायला मिळालं तर किती बरं होईल? पण त्याला खाऊ घालायचं आपणही खायचं एवढे पैसे कुठे आहेत?'
विचार करेपर्यंत हॉटेलमध्ये येऊनसुद्धा पोहोचलो होतो. आता पर्याय उरला नव्हता. खिसा रिकामा होणारच होता.
हॉटेलमध्ये बसल्यावर विचार करायला लागलो, 'बेटा, काहीतरी पळवाट शोधलीच पाहिजे. खिसा सांभाळलाच पाहिजे'
भूक लागलीच होती. फरसाण मागवले, खाल्ले. पुन्हा चहा मागवला.
तेवढ्यात समोरच्या रोडवर सिटी बस येऊन उभी राहिली अन् मी डाव साधला. बसच्या पलीकडून सायकल स्वार चाललेले दिसले आणि मी ओरडलो,
"अरे, लोखंडे, लोखंडे थांब."
"आपलं पैशाचं काम झालंच. लई पैसेवाला माणूस" असं म्हणत मी होटेल सोडलं अन् बसच्या पलीकडून बसमध्ये शिरलो. बस सुरू झाली अन् मी सुटकेचा श्वास घेतला.
भूकही भागली होती अन् खिसाही सुरक्षित होता.