The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sangieta Devkar

Others

4.0  

Sangieta Devkar

Others

फुलले रे क्षण माझे

फुलले रे क्षण माझे

7 mins
736


सकाळचे आठ वाजले आणि सगळं घर रिकाम झाले. विराज ऑफिसला गेला मुग्धा आणि वरूण कॉलेजला आणि घरी राहिली एकटी सुचिता. सुचिताने न्यूजपेपर घेतला आणि न्यूज वाचत राहिली. त्या तिघांच्या टिफीनसाठी भाजी चपाती सकाळी बनवायची त्यातलेच थोडं सुचिता आपल्यासाठी बाजूला काढून ठेवायची. नाष्टा विराजसोबत व्हायचा. वरुण एम बी बी एस करत होता आणि मुग्धा बारावीला होती. त्यामुळे सकाळी सगळे बाहेर पडत मग दुपारनन्तर मुलं घरी येत आणि विराज संध्याकाळीच. दिवसभर सुचिता एकटी असे सगळं घर तिला खायला उठत असे. काम तर सकाळीच उरकत असे नन्तर भांडी झाडलोट करणाऱ्या मावशी येत. मग त्यांच्यासोबत जरा गप्पा मारत सुचिताचा थोडा वेळ जायचा. बाकी दिवसभर काय करायचे हा मोठा प्रश्न होता तिच्या पुढे. ती बीकॉम झालेली होती, माहेरी आई आणि भाऊ होते वडील तिच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे जेमतेम बी कॉम ती झाली होती आणि शेजारी एक संगीत शिकवणाऱ्या बाई होत्या त्यांच्याकडे आवड म्हणून गाणं शिकायला जायची.


लग्नानंतर घर मुलं यांच्याकडे पाहायला कोणी नाही म्हणून तिने नोकरी नाही केली तशी गरजही नव्हती. विराज चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर होता. सुचितानेही जास्त लक्ष नाही दिले या गोष्टीकडे ती घर मुलं आणि विराजचं सगळं करण्यात गुंग झाली. यातच गाण्याची आवड कुठेतरी मागे पडत गेली. मुलं चांगली शिकत होती विराजचा काही त्रास नव्हता पण आता मुलं मोठी झाली आपआपल्या विश्वात रममाण झाली. विराजचे प्रमोशन झाले होते त्यामुळे त्याचे काम वाढले होते अधुनमधून तो बाहेरगावी ऑफिसच्या कामासाठीही जात असे. पण सुचिता मात्र एकटी झाली होती. तशा मैत्रिणी होत्या तिला... पण मैत्रिणींसोबत किती वेळ घालवणार ना? संध्याकाळी मुलं घरी आली खाणंपिणं आवरून आपआपल्या रूममध्ये गेली. विराजही आला चहा घेत तो सुचिताला म्हणाला, उद्या मला जावे लागेल बाहेरगावी. आजच माझी बॅग भरून ठेव. हा रात्री भरते ती बोलली. तिचा चेहरा उतरला होता ते पाहून विराज म्हणाला, काय झाले सुचिता बरे वाटत नाही का? नाही मी बरी आहे पण अलीकडे मी खूप एकटी असते. मुलं कॉलेजला तुम्ही ऑफिसला मी काय करू असा प्रश्न पडतो मला. माझा वेळ जातच नाही उगाच मग उदास वाटत राहतं, ती म्हणाली. हो, अगं मुलं मोठी झाली त्यांचे व्याप त्यांना आहेत तू तुझं मन रमव मैत्रिणींना भेट, फिरायला जा मी कुठे अडवले आहे का विराज म्हणाला. तसे नाही विराज पण एक प्रकारचा एकटेपणा जाणवतो माझी गरज नाही राहिली का आता घरच्यांना असे वाटते, सुचिता बोलली. हे बघ असे काहीही मनात आणू नको तू आहेस म्हणून आपलं घर आहे ओके मी जरा माझ्या फाईल्स चेक करतो असे म्हणत विराज उठुन गेला. सुचिता आपल्या कामाला लागली.


सकाळी विराज लवकरच गेला. आज शुक्रवार होता तो आता डायरेक्ट सोमवारी येणार होता घरी. बरे झाले उद्या परवा मुलांना सुट्टी निदान घरी असतील मुलं माझ्यासोबत असे सुचिताच्या मनात येऊन गेले. थोड्या वेळाने मुल त्याचं आवरून कॉलेजला गेली. सुचिता उगाच काही काम काढत वेळ घालवू लागली. आज शनिवार मुलं उशिरा उठली त्यानंतर त्यांचा नाष्टा झाला. वरुण म्हणाला, आई मी मित्राकडे चाललो आहे माझा एक प्रोजेक्ट करायचा आहे, उद्या संध्याकाळीच येईन घरी. तसे मुग्धाही म्हणाली, आई मी पण सिनेमाला जाणार आहे आता आवरून. तसे सुचिता म्हणाली, तुमचं सगळं शेड्युल ठरले आहे. मी काय घरीच असते ना माझी कामं आणि मी मला कशाला वेळ द्याल? तुम्ही आता मोठे झालात तुम्ही तुमच्या कामात बिझी. मी राहते घरी एकटी, माझा विचार कोणीच करू नका, असे काहीसे सुचिता बोलत राहिली. तसा वरुण म्हणाला, अगं आई आज अचानक काय झाले असे का बोलत आहेत तू... मी कायम जातो मित्राकडे आणि मुग्धाही जातेच ना सारखं सिनेमा आणि शॉपिंगला नवीन नाही हे काही. तू असे का आज रिऍक्ट होतेस? काही नाही वरुण जा तुम्ही. पण मुग्धाला आईचे बोलणे मनाला लागले. ती विचार करू लागली, मग तिच्या लक्षात आले की आपण आईचा विचार करतच नाही. ती दिवसभर कंटाळत असेल. एकटी असते तिला कोणताच विरंगुळा नाही त्यामुळे ती चिडचिड करत आहे. आईसाठी काहीतरी करायला हवे असा विचार करत मुग्धा बाहेर पडली आज ती मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणार होती. सिनेमा बघून झाला, थोडं शॉपिंग करू असा विचार करत मुग्धा आणि तिच्या मैत्रिणी असंच फिरत होत्या. एके ठिकाणी एक बॅनर मुग्धाला दिसला त्यात लिहिले होते की पुढच्या महिन्यात एक सिंगिंग कॉम्पिटीशन होणार आहे, सर्व वयोगटांसाठी ती स्पर्धा होती. नाव नोंदणी लवकर करा आणि बाकी डिटेल फोन करून विचारा असे लिहिले होते. मुग्धाला अचानक क्लिक झाले की तिच्या आईला गाण्याची आवड आहे. लग्नाआधी ती थोडं गाणं शिकली होती, असे एकदा बोलता बोलता तिला म्हणाली होती. मग मुग्धाने तो नंबर घेतला आणि घरी आली आईला सरप्राइज दयायचे असे तिने ठरवले. मुग्धाने आईला बोलावले आणि म्हणाली आई तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. आई म्हणाली, काय आज एकदम सरप्राईज वैगरे काय विशेष? आई तू बस आधी आणि मी जे सांगते ते ऐक आणि मुग्धाने त्या गाण्याच्या स्पर्धेबाबत सुचिताला सांगितले. तसे सुचिता म्हणाली, नाही गं मुग्धा मी काय नॉमिनल शिकले आहे गाणे. आता कुठे मला काय जमणार? नको बाई खूप हुशार आणि चांगले गाणारे असतील तिथे. माझा निभाव नाही लागणार आणि मुळात मला धाडस नाही इतकं की मी स्टेजवर गाणं म्हणेन. नको, मुग्धा मी नाही भाग घेत यात. आई अगं अजून एक महिना अवकाश आहे. तू गाण्याचा क्लास लाव, रियाज कर चांगला, तुला सगळं जमेल, प्रयत्न तरी कर... आधीच का हार मानतेस? एक महिना शिकून बघ, नाही जमले तर मग विचार करू, आता मला तुझ्या नावाचं रजिस्ट्रेशन करू दे, मुग्धा बोलली.


बरं तू म्हणतेस तसे करू, सुचिता म्हणाली. मग मुग्धाने तिचे नाव नोंदवले आणि गाण्याचा क्लास कुठे असेल याचा ती शोध घेऊ लागली. नेटवरून बरीच माहिती गोळा केली आणि हे सरप्राइज गुपित ठेवायचे आताच वरुण आणि विराजला सांगायचे नाही असे त्यांनी ठरवले.


घराजवळच एक क्लास मिळाला तिथे सुचिताने जायला सुरवात केली. दुपारची वेळ तिने निवडली जेणेकरून सगळं काम आवरुन जाता येईल. तिथे तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी आणि काही लहान अगदी मुग्धाच्या वयाच्याही मैत्रिणी मिळाल्या. एकत्रित पुन्हा गाणं शिकणं हा नवीन छंद सुचिताला मनापासून आवडला. आपण नवीन काहीतरी शिकत आहोत, आपला वेळ चांगला जात आहे आणि मन प्रसन्न राहतं हेच खूप होतं तिच्यासाठी... ती अगदी मनापासून गाणं शिकू लागली, मन रमवू लागली. घरी कोणी नसताना ती रियाज करू लागली, खूप छान आणि पॉझिटिव वाटत होतं सुचिताला. आपणही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास तिला मिळाला होता. पुन्हा एकदा ती स्वतःला नव्याने अनुभवत होती. मुग्धा सोबत होतीच. त्यामुळे खूप हुरूप सुचिताला आला होता. आपण स्टेजवर गाणं म्हणू शकतो इतका आत्मविश्वास तर क्लासमधून मिळाला होता. तशी तयारीही करून घेतली होती. चार दिवसांनी गाण्याची स्पर्धा होती. उद्या गुढीपाडवा होता. नवीन वर्षाची सुरुवात होणार होती. मुग्धा आईला म्हणाली की, उद्याच्या शुभ मुहूर्तावर आपण ही गोष्ट बाबांना आणि दादाला सांगू. दोघांना सरप्राईज देऊ. ठीक आहे, सुचिता म्हणाली.


सकाळी सगळे लवकर उठले. छान तयार झाले. आज नवीन वर्षाची सुरवात गुढी उभारून करायची होती. सुचिता छान पैठणी नेसून तयार झाली. वरुण आणि विराजने कुडता घातला होता आणि मुग्धाने लेहंगा घातला होता. सर्वांनी पूजा केली. मग विराज आणि वरूणने गुढी उभारली. गुढीला नैवेद्य दाखवला आणि सर्वजण जेवायला डायनिंग टेबलपाशी आले तसे मुग्धा म्हणाली, सर्वांनी लक्ष देऊन ऐका माझ्याकडे एक सरप्राईज आहे. वरुण म्हणाला, कसले सरप्राईज सांग पटकन. हो हो तर परवा दिवशी एका संगीत अकॅडमीतर्फे गाण्याची स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेत आपल्या लाडक्या आईने भाग घेतला आहे. तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते आपली आई छान गाते, तिला संगीताची आवड आहे म्हणूनच मी तिला या स्पर्धेत भाग घ्यायला भाग पाडले. तसा विराज म्हणाला, अरे वा सुचिता दॅट्स ग्रेट. पण आई तुझी प्रॅक्टिस कुठे आहे आता, वरुण म्हणाला. मुग्धा म्हणाली, गेल्या एक महिन्यापासून आईने गाण्याचा क्लास लावला आहे. मी हे आईलाही घरी सांगू नको बोलली होते कारण आम्हाला सरप्राईज दयायचे होते. आई मस्तच, वरुण म्हणाला. मुग्धा म्हणाली, आपण सगळे आपल्या व्यापात मग्न होतो, जो तो बिझी असतो, आई मात्र घरी एकटीच असते, तिला ही कंटाळा येतो. बोलायला कोणी नाही, ना काही काम असते की त्यामुळे तिचा वेळ जाईल आणि ही गोष्ट आपल्या कोणाच्याच लक्षात नाही आली की तिच्यासाठी काहीतरी करावे, पण जेव्हा आईचा एकटेपणा मला जाणवला तेव्हा मी आईला तिचा गाण्याचा छंद पुन्हा सुरु करण्याचा सल्ला दिला.


विराज म्हणाला, सुचिता ही गोष्ट माझ्याही लक्षात नाही आली, आय एम सॉरी. आई मी पण सॉरी, वरुणपण म्हणाला. तसे सुचिता म्हणाली, अरे सॉरी काय म्हणता, मीच हे विसरून गेले होते की मला गाण्याची आवड आहे. नुसते घर आणि काम यातच मी अडकून राहिले. माझा छंद, माझी आवड मी विसरून गेले, पण आता पुन्हा एकदा मी माझ्यातल्या "मला" शोधले आहे. तेव्हा हा माझा छंद मी आता जोपासणार आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात होतेय तशीच माझ्यातील मीची पण नव्याने मला ओळख झाली आहे. तेव्हा आता मला मी काय करु, हा प्रश्न नाही पडणार. माझं गाणं आणि रियाज कायम सोबत ठेवणार. नवीन वर्षाचा हा माझा संकल्प आहे. माझा छंद मी आनंदाने जोपासणार आणि माझ्या छंदासाठी, फक्त माझ्यासाठी काही क्षण तरी भरभरून जगणार.


विराज म्हणाला, मी कायम तुझ्या सोबत आहे सुचिता. आणि आम्हीसुद्धा आई... असे म्हणत वरुण मुग्धाने सुचिताला मिठी मारली आणि मोठ्याने ओरडले... ऑल द बेस्ट आई. विराजनेही कौतुकाने हसत सुचिताकडे पहात थम्स अप केले..


Rate this content
Log in