पॅ
पॅ


शाळेतून येताच सोफ्यावर दप्तर फेकत मी आरोळी ठोकली,'आई, जेवायला वाढ! कडकडून भूक लागली आहे.'
'हो,तू हात पाय धुऊन घे तोपर्यंत मी पाने वाढते.'
जेवण आटोपत आले तेव्हढ्यात किरट्या आवाजातला शब्द ऐकू आला.....'पॅ'
माझ्या कपाळावर आठी उमटली.मी चिडूनच आईला म्हटले,'काय ग आई ही 'पॅ',धड जेवूही देत नाही'.
पण आई लगबगीने उठली.हात धुवून तिने दार उघडले.दारात ती उभी होती...'पॅ'
रापलेला चेहरा,अस्ताव्यस्त केसांचा बांधलेला बुचडा, हातात एक एक काचेची बांगडी,विटकी साडी गुंडाळलेली आणि चेहऱ्यावर कमालीचा दीनवाणा भाव!
आईने तिला थांबायची खूण केली आणि आई आत आली.पोळ्यांच्या डब्यातून दोन पोळ्या काढून त्यात तिने थोडी भाजी घातली व ती गुंडाळी 'पॅ'च्या पसरलेल्या ओच्यात घातली.'पॅ'ने नजरेने च खुषी व्यक्त केली आणि ती ओच्यातील पोळ्या सांभाळत जायला वळली.
'बिच्चारी',दार लावता लावता आईने सुस्कारा सोडला.'कशी करत असेल संसार कुणास ठाऊक! दारुडा नवरा,चार कच्ची बच्ची,घरदार नाही, रस्त्यावर मुक्काम!'
'वरून मुकीबहिरी', मी फटकन म्हटले.
'असं म्हणू नये गं,'आई दटावत म्हणाली.
'आपल्यात दोष नाही ही त्या परमेश्र्वराची कृपा!त्यात आपले कर्तृत्व ते काय! म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी आणि ज्यांच्यावर त्याची मर्जी खप्पा झाली आहे त्यांना मदत करावी.'
आईने हात जोडून कुठलासा श्र्लोक पुटपुटला.तिचा सात्त्विक भावाने भरलेला लोभसवाणा चेहरा बघून मी अगदी हरखून गेले.
'पॅ'ची हजेरी दर एक दोन दिवसाआड असे.आई तिला कधी खायला देईन, कधी कपडे तर कधी आमची जुनी खेळणी तर कधी आमची पुस्तके.वार्षिक परीक्षा झाल्यावर वह्यांची कोरी पाने काढून त्याची वही करून तिला देत असे.
आमचे शेजारी पाजारी ही त्यांच्या मुलांची खेळणी, कपडे, पुस्तके,स्कूलबॅग्ज अशा त्यांना नको असलेल्या वस्तू 'पॅ'ला देण्यासाठी आणून देत.
आईचा आणि 'पॅ'चा कुठला ऋणानुबंध होता कुणास ठाऊक!पण त्या दोघींमधील खाणाखुणांच्या गप्पा, दोघींना एकमेकींबद्दल वाटणारी आपुलकी सर्वांनाच अचंबित करीत असे.कारण 'पॅ'ला एकच शब्द उच्चारता येत असे आणि तो म्हणजे 'पॅ', आणि तो शब्द उच्चारताना तिला जे कष्ट पडत ते पाहून आईच्या म्हणण्याची प्रचिती येत असे.
हळूहळू 'पॅ'ही आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.तिचे असणे आमच्या अंगवळणी पडले. तिचा तो इरिटेट करणारा 'पॅ'हा किरट्या आवाजातला शब्दही आताशा खुपेनासा झाला.
आज आई बाहेरून आली आणि हात-पाय धुवून डायरेक्ट कामाला लागली.सहसा असे होत नसे.बाहेरून आल्यावर चपला काढता काढताच ती सर्व इत्थंभूत बातमी सांगत असे.त्यामुळे तिचे असे गप्प गप्प रहाते पाहून आम्हाला आश्चर्यच वाटले. त्यातून ती तिच्या मैत्रिणीच्या आजारी सासूबाईंना पहायला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली होती.
बाबांनी पेपराआडून खुणेनेच 'आईला काय झाले 'असे विचारले. मी आणि भावाने 'काय की बुवा'असे खुणेनेच उत्तर दिले.
आज जेवण मुकाट्याने झाले.आईचे काहीतरी बिनसले होते नक्की!
बाबांनी घसा खाकरला,'काय पिंकीच्या आई आज अगदी गप्प गप्प! मैत्रिणीच्या सासूबाईंची तब्येत बरी आहे ना?'
आईने मान डोलावली आणि तिला कंठ फुटला.'
'आज वसूच्या सासूबाईंना बघून मी सिव्हिल हॉस्पिटलमधून येत होते. वाटेत बैठ्या चाळी लागतात बघा, तिथे बाहेर नळावर पाणी भरायला हंडे,बादल्या घेऊन बायका जमल्या होत्या आणि त्यांचा एकच कालवा चालला होता.'
'त्या बायकांमध्ये सर्वात मोठ्या आवाजात भांडणारी कोण होती माहितीये? आपली 'पॅ'!
'काय?'आम्ही तिघेही ओरडलो.
'हो! मी तिला बघून थांबले. तिचे लक्ष माझ्याकडे गेले तशी ती डोक्यावरचा पितळेचा हंडा सावरत चटचट समोरच्या घरात अदृष्य झाली.'
आम्हाला हसावे का रडावे तेच कळेना.
मात्र आईच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या 'पॅ'ला चांगले ठोकून काढावे असे मात्र मनोमन वाटले.