Ashutosh Purohit

Others

3  

Ashutosh Purohit

Others

पाऊस एक कलाकार

पाऊस एक कलाकार

1 min
15.7K


तसा सगळ्यांच्या कलाकलाने घेणाऱ्यातला नाही तो. पण आला, की मात्र प्रत्येकाची धांदल उडवण्याची कला जन्मजात आहे त्याच्या अंगात. कोणी त्याच्यावरच्या प्रेमापोटी लगबगीने कामं उरकतात तर कोणी त्याच्यावर वैतागून. पण सगळ्यांपाशी तितक्याच आतुरतेने जायची कला मात्र त्याला चांगलीच अवगत आहे. अगदी तळ्यातल्या होडीपासून छत्रीतल्या मिठीपर्यंत प्रत्येकात सामील होतो तो. तरीही प्रत्येकापासून अलिप्त राहण्याची कला त्याला चांगलीच अवगत आहे. त्याच्या येण्याची चाहूल देणारा सोसाट्याचा वारा कधीकधी देवघरातलाआजीपुढला दिवा विझवतही असेल, पण त्याच आजीच्या तुळशीवर तो असा काही बरसतो की अगदी तृप्त होऊन जाते ती. आजी आणि तुळसही. प्रत्येकाचा विचार करून त्याच्या आयुष्यात आनंद पेरण्याची कला त्याला चांगलीच अवगत आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट अशा राजेशाही थाटात तो येतो. शेतकऱ्याचे कान आणि डोळे याच्या आगमनासाठी आतुर असतात. त्याच्यासाठी खरंतर हा परमेश्वरच. प्रत्येकाला असं 'आपलंसं' करून घेण्याची कला त्याला पूर्वीपासून अवगत आहे. तो किती जुना, हे खरंतर कोणालाच माहिती नाही. तरीही तो दरवर्षी तरुण बनून येतो आणि प्रत्येकाला तरुण करून जातो थेंबासोबत तारुण्यही वाटण्याची कला त्याला फार पूर्वीपासूनच अवगत आहे! पागोळ्यांच्या रुपात ओंजळीत आठवणी पकडताना मोहरणारी ती असो किंवा मुलाच्या आठवणीनं जिच्या डोळ्यात हा भरून येतो अशी आजी असो. प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो तो. सगळ्यांचा असा 'मनमित' होण्याची कला त्याला पूर्वीपासून अवगत आहे. असं अवचितपणे येऊन हे सगळे विचार माझ्या मनात आणण्याचं कामही खरंतर तोच करत असतो. लेखणीच्या रूपातून कागदावर उतरण्याची त्याची कला पूर्वीपासून अवगत आहे.


Rate this content
Log in